कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
मार्च
महिन्यातील तापमानाप्रमाणे आता निवडणुकीचा ज्वरही चढत चालला आहे. एप्रिल महिन्यात
पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत. खरे तर मार्चच्या अखेरीपासूनच निवडणुका सुरु
झाल्या आहेत. पहिल्या फेरीचे मतदान काही ठिकाणी झालेही. त्यामुळे पूर्ण एप्रिल
महिना निवडणुकीच्या धामधुमीत जाणार हे नक्की. या सर्व राज्यांच्या निवडणुकांचे
निकाल २ मे ला जाहीर होणार आहेत. ह्या निवडणुकांपैकी सर्वच ठिकाणी भाजप लक्ष देत
असले तरीही प.बंगालची निवडणूक ही अटीतटीची ठरणार हे नक्की.
सध्या
महाराष्ट्र दोन कारणांमुळे गाजतोय. एक म्हणजे अंबानींच्या घराजवळील स्फोटके असणारी
गाडी आणि त्यानंतर निघालेले अनेक प्रश्न आणि दुसरी म्हणजे कोरोनाची स्फोटक
परिस्थिती. सरकार ह्या दोन्ही परिस्थितींचा सामना करीत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या
आटोक्यात आणण्याला सरकारला यश यायला हवे हे नक्की.
मार्च महिन्यात
भारतात जसे वातावरण तापले होते तसेच ब्रिटन मध्येही तापले असावे. मेघन मार्कल हिने
ओप्रा विनफ्रे हिला दिलेल्या मुलाखतीत काही वादग्रस्त विधाने केली. त्यातील
वर्णभेदाचा मुद्दा महत्वाचा खराच. सर्व जगाला उपदेशाचे डोस पाजणारे काही देश
आपल्या देशांत भेदाभेद पाळत असतात हेच यातून स्पष्ट झाले.
ब्रिटनच्या
पार्लमेंटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चर्चा करण्यात आली. ह्यावर भारताने
तीव्र निषेध नोंदवला. गेल्या काही वर्षात भारताच्या परराष्ट्र नीतीत काही महत्वाचे
बदल घडून आले आहेत. लोकशाही असलेल्या देशातील निर्णयांबद्दल इतर देशांनी आपल्या
पार्लमेंटमध्ये अशा प्रकारे चर्चा करू नयेत असे भारताने खडसावून इंग्लंडला
सांगितले आहे. त्याच प्रमाणे अमेरिकेतील फ्रिडम हाउस या संस्थेनेही एक अहवाल
प्रसिद्ध केला. त्यात भारतात एकूणच लोकशाहीचा स्तर खाली आला आहे असे निरीक्षण
नोंदवण्यात आले आहे. ह्यावर विचार होणे गरजेचे असले तरीही ह्यामागेही राजकारण आहे
हे ध्यानात घेतले पाहिजे.
भारत, अमेरिका,
जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रांत QUAD ह्या समूहाची
स्थापना केली आहे. विविध मार्गांनी सहकार्यातून, जगात स्थैर्य निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकेल. भारताच्या दृष्टीने
हा समूह महत्वाचा आहेच. भयरहित हिंदी-प्रशांत टापूच्या विकासासाठीचे हे महत्वाचे पाऊल ठरू शकते. आपल्या संरक्षण क्षेत्रासाठीही हा समूह
गरजेचा आहे. अद्ययावत तंत्रज्ञान या समूहातर्फे आपल्या संरक्षण क्षेत्रासाठी मिळू
शकते. चीन मात्र ह्या घडामोडींमुळे नाखूष आहे हे स्पष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडीत म्यानमार मधील लष्कराचे सामान्य जनतेवरील अत्याचार
वाढत चालले आहेत ही काळजीची बाब आहे. आंतरराष्ट्रीय समूहाने निषेध नोंदवूनही तेथील
लष्करी राजवटीची दडपशाही वाढतच आहे.
नुकतेच आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात
आल्याचे वाचले. ह्यावर काय लिहीणार? हा 'पुरस्कारा'चाच सन्मान झाला असे म्हणावेसे
वाटते. त्याचप्रमाणे ह्या महिन्यात 'श्रीकांत मोघे' ह्या लोकप्रिय आणि देखण्या
नटाचे निधन झाले. अनेक नाटक आणि सिनेमातील त्यांचे ते प्रसन्न व्यक्तिमत्व
अनेकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी अजरामर केलेल्या दोन व्यक्तिरेखा म्हणजे लेकुरें’तील ‘राजशेखर’ आणि ‘रविवारची सकाळ’मधील कडवेकरमामा. दोन्ही भूमिकांत संगीत हा त्या व्यक्तिरेखांचा
अविभाज्य भाग होता. सुरांचे आणि शब्दांचे पक्के भान असल्याने गायकाइतक्याच उत्कटतेने, सहजतेने ते गायले. त्यांना कट्टा
टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
सध्यातरी इतकेच.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment