मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

गेल्या कट्ट्यात 'मधले पान' चा शेवट करताना मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी कोरोना चीन पर्यंत सीमित होता. इतक्या लवकर तो आपल्या देशांत हातपाय पसरेल हे अनपेक्षित होते. पण १०/१२ मार्च पासून चित्र बदलायला लागले. सुरवातीला परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळावरच करायची ठरली. पण शेवटी सरकारने मोठा निर्णय घेऊन हा येणारा लोंढाच थांबवायचा ठरवला.
आपली लोकसंख्या आणि आपल्या इथल्या सुविधा व्यस्त आहेत. तरीही सरकारने केलेला लॉक डाऊन बऱ्यापैकी यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. तरीही अजूनही स्थलांतरित कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. अनेक शाळांतून आता त्यांची राहण्याची आणि जेवायची व्यवस्था केलेली आहे. 'स्वविलगीकरण' ही संकल्पना अनेकांना आता समजली आहे. आणि लोक त्याप्रमाणे वागायचाही प्रयत्न करत आहेत.

कोरोना वर आपण अनेक पाने लिहू शकतो. पण त्या व्यतिरिक्तही अनेक घटना गेल्या महिन्यात घडल्या.

सर्वात मुख्य म्हणजे निर्भया प्रकरणातील दोषींना शेवटी फाशी झाली. ह्या केस मध्ये कायद्याच्या अभ्यासकांनीच जो कायद्याचा खेळ मांडला तो निन्दनीय होता. खरोखर वकीलपत्र घेतले की माणूस माणुसकीही विसरतो का असं मला प्रश्न पडला. न्यायालयाचे अभिनंदन अशासाठी की ह्या सर्व प्रकाराला तोंड देऊन त्यांनी शेवटी ही शिक्षा कायम ठेवत त्याची अंमलबजावणी केली. 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' अशी आपल्याकडे म्हण आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्याला कठोर शिक्षा हवीच.


हीच म्हण एका वेगळ्या पद्धतीने काँग्रेस पक्षाबाबत ही लागू होते. ज्योतिरआदित्य सिंदियांनी अखेर काँग्रेस पक्ष सोडला. त्याचबरोबर मध्यप्रदेशातील सरकारही बदलले. गेली काही वर्षे काँग्रेस मधील अनेक नेते नाराज आहेत. मिलिंद देवरा, संजय निरुपम हे महाराष्ट्रातील नेते तर सचिन पायलट, ज्योतिरआदित्य सिंदिया, दिपिंदर हुड्डा असे उत्तरेतील अनेक नेते नाराज असूनही हा पक्ष त्यावर काही उपाययोजना का करत नाही हे अनेकांना समजत नाही. अगदी खरे सांगायचे तर समोर तगडी टीम असताना आपले मोहरे सांभाळायला हवेत. मात्र काँग्रेस चे शीर्ष नेतृत्व ह्या बाबीकडे लक्ष का देत नाही हे समजत नाही. आता ह्या परिस्थितीत काळ सोकावणारच.

सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई ह्यांनी राज्यसभेचे खासदार पद स्वीकारले ह्यावर ही बराच
गदारोळ झाला. अर्थात हे प्रथम घडले नाही आणि शेवटचेही घडले नाही हे ही तितकेच खरे. गोगोई यांची मुलाखत ही गाजली. स्वतःची मते त्यांनी अगदी ठामपणे मांडली.

बोरिस जॉन्सन आणि प्रिन्स चार्ल्स 

परदेशातही कोरोनाचे थैमान चालूच आहे. ब्रिटिश पंतप्रधान आणि युवराज चार्लस ह्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. थोडक्यात हा रोग कोणालाही पकडू शकतो. इटली, स्पेन ह्या देशांत अनेक हजार मृत्युमुखी पडले आहेत. वेगवान जगाला ह्या रोगाने एकदम खीळ घातली आहे जणू. 

आपल्या इथल्या अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. थोडक्यात 'आजचा दिस गोड झाला' असे म्हणत राहायचे आहे. आता ह्या परिस्थितीतून आपण धीराने आणि शांततेने मार्ग काढणे एवढेच आपल्या हातात आहे.

स्नेहा केतकर


No comments:

Post a Comment