महाप्रसाद अहवाल

स्मरणिका २०१९


दिलगिरी 
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. त्या स्मरणिकेमध्ये काही  गोष्टी चुकीच्या छापल्या किंवा छापायचा राहून गेल्या आहेत.  
"पूर्वसुरींचे आभार" ह्या पानामध्ये सौ संगीता केसकर यांचे नाव राहून गेले आहे.  
श्री प्रशांत खांडेकर यांचे नाव Life members  च्या यादीत छापायचे ऐवजी चुकून Annual members  च्या यादीत छापले आहे. 

"डेड मेड ब्लॅक डॉग" ह्या कथेचे लेखक श्री संजय तांबवेकर आहेत. 

अंतरंग म्हणजेच अनुक्रमणिका च्या पानावर काही आकडे चुकीचे तर काही आकडे इंग्रजीत छापले गेले आहेत.

ह्या अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल स्मरणिकेचे संपादक मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. पुढच्या वेळी अश्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घेतली जाईल.

--- मित्रमंडळ स्मरणिका संपादक मंडळ



महाप्रसाद अहवाल

मित्रमंडळ बेंगळुरूच्या गणेशोत्सवातील महाप्रसादाचा दिवस म्हणजे उत्साह, वैविध्य यांची परिसीमा. या  वर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा झालेला हा दिवस उपस्थितांच्या नक्कीच लक्षात आणि अनुपस्थितांनी काय गमावले हे लक्षात रहावे म्हणून हा रिपोर्टचा प्रयत्न! 

या वर्षी सेवानिवृत्त  एअर मार्शल पी. पी. खांडेकर सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. बरोबर १०.१५ वाजता खांडेकर सर सपत्नीक ओडूकत्तूर मठात उपस्थित होते.
श्री गणेशाला वंदन करून व श्रींची आरती करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्वेताने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्री परेश यांनी मित्रमंडळाच्या मागील वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांची झलक दृक्श्राव्य माध्यमातून पडद्यावर छान दाखविली. हा नवीन विचार नक्कीच स्तुत्य आहे. 
मावळत्या अध्यक्षा नीना वैशंपायन यांनी आपल्या सुसूत्र भाषणातून वर्षभराच्या कार्यक्रमांचा, मित्रमंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला. पुढील वर्षांची जबाबदारी शशिकांत काळे यांच्याकडे सुपूर्त केली.

सर्व कार्यकारी मंडळाला व्यासपीठावर बोलावून त्यांचे कौतुक करण्यात आले. भगवे फेटे घातलेले सर्वच कार्यकारी मंडळांचे सदस्य वर्षभराच्या कामाच्या जबाबदारीच्या पूर्ततेने आणि नवीन वर्षाचे स्वागतोत्सुक असल्यामुळे जास्तच डौलदार दिसत होते.

१० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच या वेळचा माननीय श्री. शरद द्रविड पुरस्कार कु. अनीश चेरेकर याला देण्यात आला
राज्यस्तरावर त्याने Athletics मध्ये कांस्य पदक मिळवले.

अनेक वर्षांची परंपरा कायम राखत मित्रमंडळाच्या २०१९ सालच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते झाले. 
लेख, कविता, जाहिराती, मुलांचे साहित्य, चित्रकला अशा विविधतेने नटलेल्या स्मरणिकेचे या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार, कलाकार श्री. अच्युत पालव सरांनी काढलेले मुखपृष्ठ! 
स्मरणिका संपादक राधिका, सारंग व विशेष साहाय्य करणारी गंधाली यांचे मनापासून कौतुक आणि आभार! 
लेख स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मानसी आणि मधुरा यांना पारितोषिके देण्यात आली. लेख स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अपर्णा जोगळेकर व स्नेहा केतकर यांचाही सत्कार करण्यात आला. 

यानंतर सगळ्यांचे डोळे ज्या कार्यक्रमाकडे लागले होते त्या मित्रमंडळाच्या लेझीम पथकाने खास वऱ्हाडी भाषेतील पयल नमन...या गाण्यावर लेझीम सादर केले. खास नऊवारी साडीत, पारंपरिक आभूषणांनी नटलेल्या सुंदर ललना, धोतर-कुडता घालून नृत्य करणारे संगमनेरकर, सारंग असा २० जणांचा लेझीमचा ताफा म्हणजे सगळ्या रंगांची उधळण होती. 
शब्द, स्वर, ताल यांचा उत्कृष्ट मिलाफ, वेगवान, लयपूर्ण हालचाली यांच्या जोरावर लेझीम पथकाने साऱ्यांची मने जिंकून घेतली व घालीन लोटांगणच्या तालावर प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. २५ ते ६५ वयोगटामधील सर्वांकडून उत्तम लेझीम नृत्य बसवून, सादर करून घेतल्याबद्दल पल्लवी व अनुष्का यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! भगवे ध्वज व बाल गणपती मिहीकायांनी लेझीम नृत्याला अधिकच उठाव आणला. 
यानंतर सेवानिवृत्त एअर मार्शल खांडेकर सरांची मुलाखत गंधालीने घेतली. भारतीय सैन्यातील वेगवेगळे हुद्दे ,त्यांचा चढता क्रम, निवडीचे निकष इत्यादी अनेक गोष्टी, तसेच peace time मध्ये चालणारे training, कारगिल युद्धाची पार्श्वभूमी व नियोजन याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती खांडेकर सरांनी सांगितली. भारतीय सैन्यदलातले intelligence चे महत्त्व,
अत्याधुनिक लढाऊ विमाने, शस्त्रास्त्रे यांची उपयुक्तता व वापर, nuclear nations ची मनोभूमिका यासारख्या विषयांची माहिती गंधालीने अचूकपणे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात खांडेकर सरांनी छानच सांगितली. 
मुलाखत आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे यात सुमारे दीड तास कधी संपला कळलेच नाही. सरांच्या पत्नी सौ. मनिषा  खांडेकर यांच्या सैन्यदलाशी निगडीत समाजकार्याचा थोडक्यात माहिती देण्यात आली.

मुलाखतीनंतर सात्विक, रुचकर मराठी पद्धतीच्या जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. नंतर आरती करून जड मनाने सर्वांनी बाप्पाला निरोप (विसर्जन ) दिला. पुढील वर्षाचे मनसुबे रचत सगळ्या मित्रमंडळींनी एकमेकांचा निरोप घेतला.

॥ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या॥
लेझीम कार्यक्रमाची लिंक: लेझीम


अस्मिता ओक 




No comments:

Post a Comment