मन गुंतले गुंतले
वाऱ्याच्या वेगात
मन झुलले झुलले
फांदीच्या झोक्यात...
मन रंगले रंगले
सांजेच्या रंगात
मन दंगले दंगले
पहाटेच्या किरणात
मन वाहले वाहले
नदीच्या पाण्यात
मन भिजले भिजले
पावसाच्या धारेत...
मन नाचले नाचले
पैंजणाच्या तालात
मन नमले नमले
घंटेच्या नादात...
मन गुणगुणले गुणगुणले,
पाखऱ्यांच्या गाण्यात
मन हसले हसले
बोबड्या बोलात...
मन फुलले फुलले,
चाफ्याच्या सवेत
मन गंधाळले गंधाळले
मोगऱ्याच्या कवेत...
मन उडले उडले
ढगांच्या रांगेत
मन चमचमले चमचमले,
पुनवेच्या चांदण्यात...
मन पाझरले पाझरले,
आनंदाच्या क्षणात
मन धावले धावले
माहेरच्या अंगणात...
मन पहुडले पहुडले,
मायेच्या सावलीत
मन लपले लपले,
लहानपणीच्या बाहुलीत...
मन भांबावले भांबावले,
एकांताच्या गर्दीत
मन सुखावले सुखावले
वात्सल्याच्या छायेत...
मन मोहरले मोहरले,
प्रियकराच्या मिठीत
मन विसावले विसावले
आईच्या कुशीत...
मन हरवले हरवले
दूरच्या आठवणीत
मन गवसले गवसले,
ओळींच्या शब्दात...
प्राजक्ता सरपटवार पाठक
No comments:
Post a Comment