"हे आर्टिकल वाचलंस?" संडे टाईम्सची पुरवणी दाखवत मी तिला विचारलं.
"इंटरेस्टिंग रिसर्च केलाय ह्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीने.
ते असं म्हणतायत की 'फाईन्ड युअर पॅशन' हा चुकीचा सल्ला आहे. त्याऐवजी
'डेव्हलप युअर पॅशन' असा सल्ला द्यावा."
"आज 'मानस'शास्त्राचा क्लास आहे म्हणजे", ती कॉफीचे कप घेऊन येता येता म्हणाली...
"अरे पण ह्या दोन सल्ल्यात फरक काय आहे?"
"ऐक तर. माणसांच्या दोन प्रकारच्या मानसिक धारणा,
mind set असतात - fixed mind set आणि growth mind
set. Fixed mind set असणाऱ्या
माणसांना कुठलीही नवीन गोष्ट आधी खूप आकर्षक वाटते, पण जेव्हा त्यातल्या किचकट, बारीक गोष्टी
शिकायची वेळ येते, किंवा पहिल्या-दुसऱ्यांदा ती गोष्ट नीट जमत नाही, तेव्हा त्यांचा उत्साह लगेच कमी होतो. मग त्यांना वाटतं की ही माझी आवड नाही. मग ते पुन्हा
दुसरी गोष्ट शोधायला लागतात. Growth mind set असणारी माणसं त्या शिकायच्या पद्धतीमधून आनंद घेतात आणि
ती नवी गोष्ट शिकतात. कुठलीही गोष्ट आपण चांगली करायला लागलो की आपोआप ती आपली आवडीची बनते... आता फिक्स्ड माईंड सेटचं उदाहरण द्यायचं झालं तर..."
"उदाहरणार्थ,
तिथे धूळ खात पडलेली गिटार, जी तू गेल्या वर्षी आणलीस, आणि दोन क्लास झाल्यावर कंटाळून बाजूला ठेवलीस?" तिने तत्परतेने थियरीला उदाहरणाची जोड दिली.
(स्कोर०-१).
"किंवा तू आणलेलं ते बेकिंग कोर्सचं पुस्तक? जे पहिले दोन केक फसल्यानंतर तसंच टेबलच्या कप्प्यात पडून राहलंय?"- मी.
(स्कोर१-१).
"असू दे. सारखं ते बोलून दाखवायची गरज नाहीये... पण ऐक ना. मी काय म्हणते. ही गोष्ट नात्यांमध्येही
लागू होते. नाही का? प्रत्येक नाते सुरुवातीला एक्सायटिंग वाटते. पण एकत्र राहिल्यावर त्या नात्याशी जे छान जमवून घेतात, त्यांचेच नाते
एकमेकांनाही काही शिकवून जात असते, मोठे करत असते. जे सुरुवातीच्या हनिमून पिरीयडनंतर येणाऱ्या रुटिन आणि एकमेकांच्या न पटणाऱ्या गोष्टींतच अडकतात, ते अडकून राहतात, आपल्याच
विचारांच्या पिंजऱ्यात."
"अरे वा. हे मस्त आहे. आज आपल्याकडून ही शिकायला मिळतंय मॅडम. आय लाईक इट."
"अजूनही बरंच काही शिकवू शकते मी.." तिचे डोळे अतिशय खोडकर दिसत होते. माझ्या हातून पेपर खेचून, "कॅच मी.." म्हणून मला चिडवत ती बेडरुमच्या दिशेने पळाली. शिकण्यासाठी मी सुद्धा तयारच असतो. आमच्या रविवारची सुरुवात परफेक्ट झाली होती!! ... आणि तुमची??
-मानस
(काल्पनिक. तरीही या गोष्टीतल्या पात्रांशी आपणास कोणतेही साम्य आढळल्यास तो चांगलाच योगायोग समजावा.)
No comments:
Post a Comment