पालकत्व -भाग १८

शिक्षणाच्या अनवट वाटा: होमस्कूलिंग, अनस्कूलिंग
महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यात अनेक कार्यक्रम झाले. त्यातल्या एका कार्यक्रमाला जायला मी उत्सुक होते. त्याचं नाव होतं, ‘मानवाच्या उत्क्रांतीतून घडलेली कौटुंबिक नाती’. ज्येष्ठ लेखिका मंगला सामंत बोलणार होत्या. यापूर्वी मी त्यांना कधीही ऐकलं नव्हतं. त्या बोलणार असलेला विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा आहे. 
तेव्हा पूर्ण तयारीनिशी तिथे पोहोचले. त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या, त्यातल्या मला काही ठाऊक होत्या, काही नवीन होत्या, पुढल्या अभ्यासासाठी दिशा देणार्‍या होत्या, नवे संदर्भ मिळाले. त्यापैकी एक गोष्ट मनात घर करून राहिली. लग्न ही नैसर्गिक घटना नाही, ती सामाजिक घटना आहे. गेल्या काही हजार वर्षांचाच इतिहास विवाह संस्थेला आहे. पण आपण मात्र त्याकडे एखाद्या नैसर्गिक घटनेसारखं बघतो. लग्न झालं नसलं तर काहीतरी वावगं आहे असं मानतो. नैसर्गिक आणि सामाजिक घटनांच्या विचारांचा धागा पुढे खेचला की जाणवतं, शिकणं आणि शिकत राहाणं ही नैसर्गिक घटना आहे पण शाळेत जाणं ही मात्र सामाजिक घटना आहे. आणि या सामाजिक बदलाला काही शेवर्षांचाच इतिहास आहे.
तरीही आजची मध्यम वर्गातली परिस्थिती अशी आहे की शाळेत जाणं हेनॉर्मल’! आणि स्वतःच्या किंवा पालकांच्या निवडीतून शाळेत न जाणारी आणि स्वयंशिक्षणाचा मार्ग घेणारी कुटुंबं आणि मुलं म्हणजे काहीतरी वेगळं! . हे खरंच आहे की कायनॉर्मलआणि कायअसाधारणहे कुठल्याही वेळी सापेक्षच राहिलं आहे. समाजातील अधिकाधिक लोक जे करतात ते सर्वसाधारणपणे मान्य आणि थोडी मंडळी करतात त्याला उपेक्षा, अपेक्षा आणि प्रश्नांचं वलय!
होमस्कूलिंग म्हणजे खरंतर शाळा घरात आणणं नव्हे. तर आपल्यातल्या मुळातच असलेल्या शिकण्याच्या उर्मी शाबूत ठेवणं आणि आवड, गरज यातून काय शिकायचं हे ठरवत शिकणं. पण बर्‍याचदा शाळेत जाण्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांपासून दूर जावं म्हणून होमस्कूलिंग केलं तरी अभ्यासक्रमापासून दूर जावं असं मात्र काही कुटुंबांना वाटत नाही. अशा वेळी जे मुक्त अभ्यासक्रम आहे, ज्यांचा अभ्यास घरी करून बाहेरून परीक्षा देता येतात अशांचा आधार घेतला जातो. त्यामुळे शाळेत जात नसली तरी मुख्य प्रवाहापासून ही मंडळी खूप दूर जात नाहीत. शिक्षणाच्या कुठल्याही टप्प्याला ते परत मुख्य प्रवाहात शिरू शकतात. शिकण्याची पद्धत निराळी असली तरी काय शिकायचं ह्यात मात्र आमूलाग्र बदल होत नाही. कधी काय शिकायचं, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, शिकण्याचा वेग या गोष्टी ठरवण्यामध्ये विद्यार्थ्याला थोडं तरी स्वातंत्र्य मिळू शकतं, अर्थात पालकांनी दिलं तर! 
यातूनच होमस्कूलिंग आणि अनस्कूलिंग असे जवळचे असले तरी दोन मार्ग तयार झाले.
अनस्कूलिंग मध्ये आपण वर केलेल्या नैसर्गिक शिकण्याच्या व्याख्येप्रमाणं शिकणं अपेक्षित आहे. शाळेतली शाळा नाही, घरातली शाळा नाही, आहे ती फक्त बिनभिंतीची उघडी शाळा! मुलं आपापल्या कलाने, आवडीने शिकतात आणि पालक त्यांच्या शिकण्यात अडथळा तर आणत नाही, उलट शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देतात. या मार्गाने जाताना, मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने, त्यात परत जाण्याचे मार्ग मर्यादित असतात. सर्वसाधारण सुरक्षित मार्गाने जात नसल्याने प्रचंड आत्मविश्वास, सतत शिकण्याची वृत्ती असलेल्या कुटुंबांना हा मार्ग आवडू शकतो. 
होमस्कूलिंगबद्दल बोलताना जॉन हॉल्ट आणि मूर यांचा उल्लेख न करता पुढे जाणं शक्यच नाही. त्यांनी लिहिलेली पुस्तकं मुळातून वाचली तर या संकल्पना अधिक खोलात जाऊन समजू शकतील. आता त्यांची मराठी भाषांतरंही उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामागची भूमिका, गृहितकं, त्याचे फायदे तोटे लक्षात येतील. आता इंटरनेटमुळे माहिती मिळवणं इतकं सोपं झालंय तेव्हा तीच माहिती इथे परत उद्धृत करण्याकडे माझा कल नाही. ती माहिती तुमची तुम्हीही मिळवू शकाल. या लेखाचा उद्देश एवढाच की असंही काही चालू आहे आपल्या समाजात; आणि ही लोकं आपल्यापासून खूप दूर नाही, अगदी आपल्या आजूबाजूलाच असू शकतात. 
होमस्कूलर्सचं भारतभर पसरलेलं असं एक जाळं आहे. http://homeschoolers.in/ इथे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. बाहेरच्या देशांमधूनही आता मोठ्या संख्येने होमस्कूलर्स आहेत. पण आपल्याच शहरात राहणार्‍या सहप्रवाश्यांचा या अनवट वाटेवरल्या प्रवासात खूप आधार वाटू शकतो. अशी अनेक कुटुंबं एकत्र आली तर एकमेकांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. आणि चारचौघात वेगळेपणामुळे विचारल्या जाणार्‍या त्याच त्याच प्रश्नांपासूनही थोडी सुटका होते. अर्थात, त्या प्रश्नांना समर्थपणे तोंड कसं द्यायचं ह्यासाठीही अशा समविचारी गटांचा फायदा होतो. पुण्यासारख्या शहरात होमस्कूलर्सनी एकत्र येऊन आपल्या मुलांना अशा सुसंवादाच्या आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. फेसबुकवर ‘homeschooling India’ असं शोधलं की असे काही गट सापडतात.
सजग पालकत्वावर सातत्यानं लिहिणारंपालकनीतीहे मासिक गेली सतराहून अधिक वर्षं कार्यरत आहे. पुण्यातून प्रकाशित होणारं हे मासिक अत्यंत वाजवी वर्गणीत दर्जेदार माहिती आणि दृष्टीकोन आपल्यापर्यंत पोहोचवतं. गेल्याच वर्षातला त्यांचा एक अंक आपल्या आजच्या विषयावर होता. त्यात त्यांनी प्रत्यक्ष होमस्कूलिंग करणार्‍या अनेक पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. हा अंक मिळवून जरूर वाचावा असा आहे. Palakneeti.wordpress.com.
https://otherindiabookstore.com/ या गोव्यातल्या प्रकाशनाने शिक्षणावरची, पर्यायी शिक्षणावरची अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि ती ही खूपच कमी किंमतीत उपलब्ध असतात.
नाही म्हणता म्हणता होमस्कूलिंगवर आपल्याकडे नेमकं काय चालू आहे, कोण लोकं आहेत अशा प्रकारची माहितीच या लेखात लिहिली गेली. पण या माहितीचा पाठपुरावा करावा लागेल. शोधाशोध करावी लागेल. तुमच्यातला होमस्कूलर जागा असेल तर तो तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. माणसांना संपर्क करावा लागेल. सहप्रवासी शोधावे लागतील. थोडक्यात, माणूस असल्याची सगळी चिन्हं दाखवावी लागतील. माहिती आता एकाक्लिकच्या अंतरावर आहे, पण ती वापरायलाही आपल्यातला विद्यार्थी जागा असायला हवा ना!!


प्रीती पुष्पा-प्रकाश 


No comments:

Post a Comment