नकाशात बघितलं तर साधारण चार बाय सात इंची मॉरिशसच्या पूर्व किनाऱ्याला
हाताच्या बोटाच्या नखाएवढं दिसणारं हे बेट! याला समुद्राकाठाने संपूर्ण चक्कर
मारून यायचं म्हटलं, तरी तासभर सुद्धा
लागणार नाही, इतकं ते लहान आहे. एका ठिकाणी तर पलीकडचा किनाराही
इतका जवळ दिसला की, हा समुद्र आहे, हेच
विसरायला व्हावं! दोन भूभागांच्या मध्ये ते निर्मळ पाणी आणि त्याची खोलीही किती,
तर पाणी आपल्या कमरेपर्यंत येईल इतकीच! दोन्ही भूभाग दोन्ही बाजूनी
गोलाकार घेत दूर जातात तेव्हाच दूरवर पसरत जाणाऱ्या समुद्राचा दर्शन होतं. पाण्यात
झोकून देण्याचा मोह मात्र इथे कोणालाच आवरत नाही.
त्या बेटावर अनेक प्रकारचे खेळ असलेले दिसले. लाकडी शिड्या.... वर चढून
गेलो की चालायला रोप- वें सदृष्य काही... मात्र ते सगळंच त्यावेळी बंद होतं. इथेही
काही भाग दुकानांनी व्यापलेला होता. बेटाच्या मधोमध कच्च्या रस्त्याचा छोटा चौक
होता. तिथे तर पिकअप व्हॅनही दिसली. इथे व्यवसायासाठी रोजच्या रोज लोक येतात आणि परत जातात. आपल्याकडच्या
सारखेच चिमण्या, धनेश, छोटेसे
काळे पक्षी, लालबुडे, लालगाले बुलबुल
असे पक्षी जीवनही तिथे होते. या छोट्याशा बेटावर फिरताना अगदी जगावेगळे काहीतरी
बघितल्याचा आनंद होत होता. तास दोन तास तिथे मनमुराद बागडल्यावर आम्ही पुन्हा
स्पीड बोट पकडली. आता आणखी निराळ्याच कुठल्यातरी दिशेला आम्ही एक धबधबा बघण्यासाठी
जाणार होतो. सर्वत्र दुरवर पसरलेला समुद्र... अशावेळी उंचावरून कोसळणारा धबधबा खरं
म्हणजे दूरवरून दिसायला हवा... काय प्रकार असावा?
बेटावरच्या झाडीमुळे सूर्यकिरणांचं प्रत्यक्ष दर्शन होत नव्हतं.
स्पीडबोटीमागे उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांमध्ये इंद्रधनुषी रंग दाखवून त्यांनी
आपलं अस्तित्व जाणवून दिलं खरं! सागरकिनार्यावर घनदाट जंगल दिसत होतं. समुद्रातून
स्पीडबोटीने साधारण १५ मिनिटे गेल्यानंतर पुन्हा दोन्ही हे किनारे आणि जंगल आपल्याशी सलगी करू
लागतं. त्यातूनच निर्माण झालेल्या एका खबदाडीतच लपवून ठेवल्यासारखा इलोसेफ धबधबा
अगदी जवळ गेल्यावर आपल्याला दर्शन देतो. 'ग्रँडरिव्हर
साऊथ ईस्ट वॉटरफॉल' असंही त्याला म्हणतात. तिथे थोडं
रेंगाळावं असं नक्कीच वाटतं. पण बोट चालवणारा आपल्याला काही कळण्यापूर्वीच यू टर्न
घेतो.
यापेक्षा दुसऱ्या एका गावातला, खूप
दूरवर असलेला, एकदा खालून आणि मग पायऱ्या चढून त्याच्या
पातळीवर जाऊन समोरून बघायला मिळालेला, मोठा दोन समांतर
धारांचा धबाधबा पाहाणं कदाचित अधिक रमणीय होतं. ३५/४० पायऱ्यांची ती
वाटही मोठी लोभस होती. आता मात्र हॉटेलवर परतायचे वेध लागतात.
इथेही शेवटी एका मोठ्या दुकानात शिरूनच तुम्ही बाहेर पडता. आठवण म्हणून
ठेवलेल्या स्मरणचिन्हांची तिथे लयलूट असते. वेगवेगळ्या पिशव्या, टी-शर्ट, मॅग्नेट्स आपल्याला मोह
घालतात; तरी पण मनासारखं काही मिळतच असं मात्र नाही. त्याचदिवशी भल्या
सकाळी आपण पाणबुडीची फेरी घेऊ शकतो. किनार्यावरच असलेल्या आमच्या तरीसा
हॉटेलपासून जवळच एक क्लब होता - 'वंडरलैंड सेलिंग सेंटर'.
समुद्राच्या पाण्यात तळाशी जाऊन तिथली जीवसृष्टी बघायची ही एक संधी
होती. तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन, फॉर्म भरून, आपला फोटो - बोटांचे ठसे... असं काय काय देऊन होईपर्यंत मनावर थोडा ताण
येऊ लागतो.
एका बोटीतून समुद्रात जाऊन तिथे सबमरीनच्या आत उतरायचं. लहानशी असते ती.
आतमध्ये दहा जणांसाठी २-२ च्या सीट्स असतात. दोन्ही बाजूंना आपण
नीट बघू शकतो. सबमरीनचं झाकण बंद केलं की आपण या हवाबंद बोटीत बंद! प्राणवायू आणि
वातानुकूलनाची सोय असल्याने आपण मजेत बसू शकतो. आता खिडकीतून दिसणारं पाण्याचं
खालीवर सर्वत्र असलेलं अस्तित्व जाणवू लागतं. बाजूने छोटे छोटे मासे फिरू लागतात.
पांढरे, पिवळे, रंगीबेरंगी, सोनेरी ठिपक्यांचे. एखाद्या खडकामागून छोट्या माशांची अख्खी फौजच बाहेर
पडताना दिसते; तर कधी माशाच्या नाकातून वर जाणारे पाण्याचे
बुडबुडे सरळ एका ओळीत दिसतात. कॅप्टनच्या सांगण्याप्रमाणे आपण पाण्याखाली जवळजवळ ३५ मीटर खोलवर गेलेले
असतो. मध्येच तळाशी गेलेल्या, बुडालेल्या बोटीचे
अवशेषही दिसतात. अंगावर काटाच येतो... पण पुन्हा एकदा माशांच्या सृष्टीत आपण रमून
जातो. अगदी काही वेळातच थोड्या वेळापूर्वी दिसलेले मासे, तेच
खडक दुसऱ्या बाजूला दिसू लागतात, आणि उलटा प्रवास सुरू झाला
म्हणता म्हणता आपण पाण्याच्या पृष्ठभागावरही परततो. बाहेरच्या जगाचा
विसर पाडणारा हा अनुभव मनाच्या तळाशी अगदी जपून ठेवायचा!
पोर्ट लुई शहर बघण्यामध्ये एक पूर्ण दिवस जातो. थ्रु ओ सेफ किंवा सूर्य
व्होलकानो, म्हणजे मॉरिशसचा ज्वालामुखी.
भूकंपामुळे तिथे मोठं विवर तयार झाले आहे. ही समुद्रसपाटीपासून ६०० फूट उंचीवर असलेली जागा. दूर वर पसरलेली डोंगररांग इथून बघायला मिळते. त्या डोंगरांचे
वेगवेगळे आकार आणि त्यावरून त्यांना पडलेली नावं गाईड आपल्याला सांगत असते. इथे
बहुसंख्य ठिकाणी कामांसाठी बायामाणसेच मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच उंचीवर आढळणारी
दुसरी महत्वाची जागा म्हणजे सीटाडेल फोर्ट. हा किल्ला आपल्याला बाहेरूनच दर्शन देतो. समुद्रसपाटीपासून
वर जाणारा घाटदार रस्ता, आणि तिथून होणारं
पोर्ट लुई शहराचं दर्शन सुखावणारं असतं. इथे जाता येता
आपल्याला हायकोर्ट, पार्लमेंटही सहज
बघायला मिळतं आणि तेही भर शहरात!
वरून शहराचे दोन भाग स्पष्टपणे जाणवतात. राहत्या घरांचा एक भाग आणि फॅक्टरी, कार्यालयांचा एक भाग. शिवाय इथे चर्च, मशीद, थिएटरही बघायला मिळतं. शहराबाहेर उसाची
शेती मोठ्या प्रमाणावर आढळते. मॉरिशियन मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यावरच इथलं
नागरिकत्व मिळतं. मात्र इथे कुणीही घर विकत घेऊ शकतं. आपल्याकडच्या
कितीतरी सेलिब्रिटीजचे बंगले इथे असल्याची माहिती गाईड आपल्याला देतात.
त्याचप्रमाणे घरं, फ्लॅट, रो-हाऊस, समुद्र किनाऱ्यावरील बंगले यांच्या असंख्य
जाहिराती इथे बघायला मिळतात.
शेमारेल याठिकाणी सप्तरंगी वाळूचा चमत्कार पाहिल्याखेरीज मॉरिशसची ट्रीप
पूर्ण होत नाही. हाही निसर्गाचा चमत्कार. ज्वालामुखीच्या उद्रेकातून खनिजांसह
बाहेर आलेल्या लाव्हारसाने निर्माण झालेले वेगवेगळ्या रंगांचे मातीचे - अगदी बारीक
वाळूचे खरं तर - थर इथे दूरवर पसरलेले आढळतात. त्याचा बराच मोठा भाग इथे कुंपण
घालून ठेवला आहे. त्याच्या बाजूने आपण फिरू शकतो. फिरण्याच्या वाटेवर बरीचशी झाडं, बांबू, पक्षी, १००
- १२५ वर्षांची कासवं आणि क्वचितच सापडणारी गोगलगायीची कवचेही बघायला मिळतात.
मातीचे विविध रंग मात्र चक्रावून टाकतात. पिवळसर,
लालसर, किरमिजी, चॉकलेटी,
गर्द नीळी, जांभळी, काळी...
अशा विविध मनमोहक रंगछटातून वाळू चमकत असते. उन्हामध्ये तिच्या बदलत्या छटाही रंग
उधळतात. त्यामध्ये रंगांच्या २३ छटा आढळतात, म्हणे! लांब
लांबपर्यंत पसरलेली वाळू इथून कुणाला उचलून घेता येत नाही. मात्र जवळच्याच
भेटवस्तूंच्या दुकानात परीक्षानळ्यांमधून किंवा
प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून तिचे नमुने विकत घेता येतात. याखेरीज तिथे फोटो, फोटोंची कार्ड्स, ग्रीटिंग कार्ड्स
ही तुमच्या आप्तेष्टांना देण्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता. पोर्ट लुईजवळ मिनी
ट्रेनने एक चक्कर मारायला मिळते, ती मात्र आम्ही बघितली
नाही.
सिटी टूर मध्येच एकदा भेट होते, ती
'काऊदान वॉटरफ्रंट' या मॉलला. Volkano
क्रेटर जवळ अचानकपणे आम्हाला गाडीवर मिळणारं आईस्क्रिम, नारळपाणी विकायला असलेलं दिसलं. तसच या मॉलबाहेर एक
उसाच्या रसाचं गुऱ्हाळ! सगळयाचाच आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला. दुपारचं जेवण
झाल्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो. तिथून फिरून आल्यावर रस प्यावा म्हटलं तर
संध्याकाळचे पाच वाजण्यापूर्वीच दुकान बंद झालेलं! दुपारच्या वेळी मॉलमधली बरीच
दुकान बंद होती. पण त्याने आम्हाला फार फरक पडला नाही. होतं तेवढंही बघायला खूप
होतं. खास करून शंख शिंपले, मोती यापासून तयार
केलेले छोटे दागिने किंवा खास तिथल्याच वाटतील अशा शोभेच्या दोनचार वस्तू आम्ही
घेतल्या. एक दिवस तिथल्याच जवळच्या एका हॉटेलमध्ये जेवायलाही गेलो. इतक्या सगळ्या
लोकांना जागा लहान पडली, पण जेवण अगदी रुचकर होतं.
हॉटेलमधल्या आपल्या वास्तव्याच्या काळात एकदातरी रात्रीच्या वेळी तिथे
आफ्रिकन लोकांचा सेगा डान्स असतो. तालावाद्यांचा खणखणाट हॉटेलचा परिसर दुमदुमून
टाकतो. वाद्यांच्या आवाजानेच मन तिकडे ओढ घेतं. तास दीड तास आणखी एका निराळ्याच
दुनियेचा फेरफटका होतो. शेवटच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा सागरकिनारी भटकायला
निवांतपणा होता. ही निरोपाची वेळ, हुरहूर लावणारी...
अगदी नीरव शांतता होती तिथे, बोटी जाग्या व्हायच्या होत्या.
काय पाहू.. कुठे फिरू त्या मूठभर रिकाम्या वेळात, असं होऊन
जातं... शेवटी त्या प्रसन्न वातावरणातही बारीक, खिन्न,
हलका सल बरोबर घेऊन आपण आपल्या सामानाच्या गाठोड्याजवळ परतत असताना
वाटतं, किती हळुवार, शांत, समंजस वागणूक या रत्नाकराची! मॉरिशसच्या लोकांनी त्याचा स्वभाव घेतला की
त्याने इथल्या लोकांचा? ना कधी खवळलेला समुद्र दृष्टीस पडत,
ना मुंबईसारख्या १२-१५ फुटी लाटा! तोही जणू पर्यटकांसाठीच इथे हे शांत रूप घेऊन आलेला!
उशिरानेच न्याहारी करून सामान घेऊन आम्ही गाडीत बसलो. तिथून आजची शेवटची
भेट 'सर शिवसागर बोटॅनिकल गार्डन' ला होती. तासाभरात फिरून होणार होतं, तरी चालायचं सर्वांच्याच जिवावर आलं होतं. विविध प्रकारचे पाम वेगवेगळ्या
प्रकारे वाढलेले होते, त्यांना बूढा पाम, बडा पाम, छोटा पाम अशी नावं दिलेली होती. एक झाड 3000
वर्षांचंही होतं. एका झाडाच्या खोडातून डिंकसदृष्य लालसर स्राव झरत
होता. त्या झाडातून रक्त येत आहे, असं त्यावर लिहून ठेवलं
होतं. भल्या मोठ्या लांबलचक तलावात लिलीची रोपं वाढली होती. पाण्याजवळ लहानलहान
पांढरी फुलं उमलली होती. काही बरीच उंच वाढलेली दिसत होती. खाली पाण्यावर मात्र
त्यांची खूप मोठी थाळ्यासरखी दिसणारी जाड हिरवी पानं तरंगत होती. त्यांच्या
उचलल्या गेलेल्या लालसर कडा खूप सुंदर दिसत होत्या. ही पानं इतकी मजबूत असतात की
ती तीन तीन किलोचं वजनही पेलू शकतात म्हणे! वॉटरलीलीचाच तो प्रकार होता.
इतर अनेक जगप्रसिध्द व्यक्तींबरोबर आपल्याकडच्या मोठ्या राजकारणी लोकांनीही
या उद्यानात काही झाडे लावली आहेत. त्या त्या झाडाच्या पायाशी ती कोणी, कधी लावली याची नोंद करणारी शीलाही बसवली आहे. आपले नवे,
जुने पंतप्रधान, राष्ट्रपती यांची नावे
त्याठिकाणी बघून खूप अभिमान वाटतो. या सगळ्यात वेळ खूप छान गेला. टेकायला थोडी
हिरवळ मिळाली. गप्पा झाल्या, फोन नंबरची देवाण घेवाण झाली.
त्यानंतर सकाळच्या न्याहारीसारखंच आरामात जेवणही झालं. त्यानंतर आम्ही पोर्ट लुईच्या सर शिवसागर यांचेच नाव असलेल्या विमानतळाकडे निघालो. मनात त्या सागराची आणि निसर्गाची असंख्य रूपे सोबतीस
घेऊन!!!!
स्वाती कर्वे
No comments:
Post a Comment