पालकत्व - १९


माझा राग माझा प्रश्न

अभ्यास गटातला आजचा विषय होता, राग आणि त्याचे व्यवस्थापन! अभ्यास गटात येणारे सगळे स्वखुशीने येतात. कोणी पाठवलंय, भरीस घातलंय म्हणून येत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनाच मनापासून अभ्यास करायचा असतो. अभ्यासाचे विषयही चालू आयुष्यातले असतात. शक्यतोवर सगळे जण मुद्दे काढून घेऊन येतात. ठरवलेल्या विषयावरचे आपापले मुद्दे प्रत्येक जण मांडतो. कोणी कोणाला चुकीचं ठरवणं, वाद घालणं असा हेतूच नसतो. प्रत्येकाला कळलेलं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचा प्राधान्य क्रम वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी त्यामुळे प्रत्येकाकडचे मुद्दे, सांगायच्या गोष्टी वेगळ्या असणारच. त्यावरून घेतलेला बोधही वेगळा!   

तरीही काही गोष्टी समान निघतात. त्यातून मिळणार्‍या शिकवणीचा सगळ्यांनाच फायदा होतो. रागाबद्दल बोलताना कशा कशाचा राग येतो असं सगळे जण सांगत होते. अगदी साडीला सेफ्टी पिन कशी लावली ते मंगळावर यान का सोडलं या कशाबद्दलही राग येऊ शकतो, येतो. बर्‍याचदा ज्यावर किंवा ज्या कारणांनी रागावलोय त्यावर रागवायचंच नसतं आपल्याला, पण तरीही ते घडून जातं. या सगळ्यावरून असं वाटतं की रागाचं कारण बाहेर नसून ते माझ्या मनात आहे, अगदी कुठल्याही परिस्थितीत.

रागाचं उद्दीष्ट काय आहे याकडे आपण आपलं लक्ष वेधलं पाहिजे. का त्याला काही उद्दीष्टच नाहीये आणि तो येणं जसं आपल्या हातात नाही तसंच तो न येणं ही आपल्या हातात नाही असं म्हणून आपल्याला शांत बसायचंय? कुठल्याही परिस्थितीत आपलं मन स्वस्थ राहून आवश्यक ती साद घालणं किंवा प्रतिसाद देणं आपल्याला जमावं असं आपल्याला वाटतं का? कुठल्याही गोष्टीचा राग आलेला नसताना रागाबद्दल स्वतःचा विचार काय?’ हे विचारायला हवं. त्याबद्दलचं संशोधन काय म्हणतं ही कदाचित रागाच्या अभ्यासाची पुढची पायरी असेल. आपण रागाचा जेवढा शांतपणे विचार करू शकू तेवढा तो आपला पिच्छा सोडण्याची शक्यता आहे, अर्थात त्याने पिच्छा सोडावा असं वाटत असेल तर! तरीही त्या गरमागरमीच्या क्षणामध्ये येईलच तो आपलं अस्तित्व दाखवायला पण तेवढ्याच पटकन निघूनही जाईल.

तुम्ही अशी माणसं पाहिली असतील आजूबाजूला, जी बोलत काही नाहीत,पण त्यांना सतत कशाचा ना कशाचा तरी राग आलेला असतो आणि ती रागाची आभा जणू त्यांच्यासोबत पुढेमागे करत असते, सावलीसारखी! किंवा अगदी सतत राग येणारी माणसं नसली तरी जेव्हा कधी येतो तेव्हा तासन तास त्यात खदखदत राहणारी. त्यांच्या हालचालीत त्यांचा राग जाणवतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव ओरडून ओरडून सांगत असतात,‘मी चिडलोय! मी चिडलेय! आणि अशा माणसांच्या अवतीभवती असायलाही नकोसं वाटतं. आपण जर पुरेसे संवेदनशील असलो तर आपल्या प्रकृतीनुसार त्या माणसाची भीती, राग, करूणा मनात दाटून राहते. आणि हे भावनांचं नकारात्मक (नको असलेलं) चक्र सुरू राहतं.


तुम्ही म्हणाल, या सगळ्याचा पालकत्वाशी काय संबंध? हा प्रश्न विचारता विचारताच तुमच्या डोळ्यापुढे ते अनेक प्रसंग उभे राहिले का, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर चिडला आहात, त्यांना खूप रागावला आहात,मुलांना अजिबात मारायचं नाही असं ठरवूनही कधीतरी फटकाही मारलाय, या सगळ्या नको असलेल्या आणि अनपेक्षित प्रसंगांमुळे पुढचा ठरवलेला कार्यक्रम बारगळलाय, किंवा केला तरी दुखर्‍या आणि जखमी मनानं केलाय, कधी कधी तर परत विचार करताना तुम्हाला हे ही लक्षात आलंय की तुमचं रागावणं हे रास्त नव्हतंच मुळी. आणि मग पश्चातापाचा महापूर लोटलाय, पण मुलांसमोर चूक मान्य करण्याचा चुकीचा परिणाम होईल असं वाटून,चूक मान्य असूनही तुम्ही ती मुलांसमोर कबूल करायला धजावला नाहीए. नुसतं मुलांसमोरच नाही, तर इतर कोणासमोरही तुम्हाला ते मान्य करणं अवघड जातं कारण समोरच्या माणसाचं आपल्याबद्दल काय मत होईल याबद्दल तुम्हाला अधिक काळजी आहे. 


एखाद्या प्रसंगावरून मतं तयार करणारी माणसंच आपल्या आजूबाजूला अधिक असल्यामुळे ही काळजी वाटणंही स्वाभाविकच आहे. पण मग अशी निवडक माणसं तरी आहेत का आपल्या आयुष्यात, ज्यांच्याकडे मी बिनदिक्कत चुका मान्य करू शकते आणि माझं दुखरं मन बरं करून तशा चुका परत घडणार नाही यासाठी माझं मन घडवते.

मग यावर उपाय काय? पालक म्हणून मी काय करू? असे प्रश्न मलाही पडतात आणि त्याची उत्तरे मी माझ्या समजुतीप्रमाणे सापडवत राहते. मला माझ्यासाठी सापडलेलं आणि खरंतर खूप जुनं, अध्यात्मानं पूर्वीच सांगून ठेवलेलं पहिलं उत्त्तर म्हणजे,‘माझा राग, माझा प्रश्न! हे वाक्य एकदा का नसानसात भिनलं की आपला जगण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. “माझी मुलं नीट वागत नाहीत, रागावल्याशिवाय ती सुतासारखी सरळ येत नाहीत” यातून बाहेर पडायला मदत होऊ शकते. आता राहिला प्रश्न मुलांनी सुतासारखं सरळ होण्याचा! मुळात ही अपेक्षा योग्य आहे का, हे विचारून पाहायला हवं स्वतःला! बर्‍याचदा त्यांचे उद्योग ह्या त्यांच्या शिक्षणाच्या संधी असतात. म्हणजे एकीकडे आपण त्यांना त्या शिकण्याच्या संधी नाकारणार आणि मग त्यांना म्हणणार की मूल अगदी मठ्ठ आहे, त्याला काहीच करायचं नसतं, वगैरे. कित्ती विरोधाभास असतो,आपण पालक म्हणून वागताना!

आता तुम्ही विचाराल,राग आल्यावर आम्ही काय करावं? प्रश्न महत्वाचा आणि व्यावहारिक आहे. पण रागाबद्दलचं काम करायचं असेल तर ते राग आलेला असताना कमी आणि राग नसताना जास्त करावं लागतं.तेव्हा राग आलेला नसताना काय काय करायचं असं आपण थोडक्यात परत एकदा पाहूया. दृष्टीकोनाचा भाग आपण बोललोच आहोत आणि त्यावरचं मनन-चिंतन हे राग आलेला नसताना करायचा भाग आहे. ध्यान-धारणा करण्याचाही उपयोग होतो. ध्यान-धारणा हा शब्द मी फारच सहजपणे वापरला आहे. 

आपल्याकडे पद्धतींची कमी नाही आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धती भावतात. तुम्हाला जी रुचेल, पटेल, ती स्वीकारा, त्याचा सराव करा. ही काही जादू नाही जी एका दिवसात व्हावी. मला स्वतःला विपश्यना ध्यान पद्धती रुचते, पटते. आणि त्याचा रोजच्या आयुष्यात उपयोग होताना दिसतो. त्यात नंतर मिळणार्‍या पुण्याच्या संकल्पना नाहीत. जे आहे ते इथे! अशा प्रकारे ध्यान धारणा करत असलात म्हणजे कधी रागच येणार नाही असं नाही. आपण आत्ता ज्या पायरीवर आहोत तिथून पुढे प्रगतीला सुरुवात होते. समजा, राग आल्यावर त्याचं भान यायला 1 तास जात असेल तर तो वेळ कमी व्हायला लागेल. दिवसभरात रागाचे 10 प्रसंग घडत असतील तर ते थोडे कमी व्हायला लागतील. त्या मार्गावर चालायला लागलात याचा अर्थ मंजिलपर्यंत पोहोचलो असं होत नाही. तेव्हा तुमच्या प्रयत्नांच्या विरोधात काही लोकं बोलत असतील तर त्या बोलण्याला भीक घालू नका. प्रयत्न करत राहा. लोकांना फरक दिसण्याआधी तुम्हाला स्वतःतला बदल जाणवायला लागेल.

अजून एक विचार मनात येऊन जातो,‘कोण म्हणतं अध्यात्म आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत? एकाच ठिकाणी पोहोचायचे ते दोन रस्ते आहेत मात्र! माझ्या अध्यात्मिक प्रगतीत माझा जोडीदार आणि माझी मुलं हे माझे सहप्रवासी आहेत. मला ज्यांच्याबद्दल अतीव प्रेम आहे अशा माझ्या मुलांशी मी कसं वागायचं ह्याचा नीट अभ्यास केला तर मनाची स्वस्थता, स्थितप्रज्ञता ही आयुष्याची उद्दीष्टं गाठणं अवघड नाही! 


प्रीती पुष्पा-प्रकाश

No comments:

Post a Comment