💥माझ्या गावातली दिवाळी!💥




खरंतर दिवाळी म्हटलं की मला माझ्या गावातली दिवाळीच आठवते! गावातल्या दिवाळीत जी मौज यायची ती पुन्हा नंतर कधी उपभोगायला मिळालीच नाही! 

 दिवाळीची चाहूल महिनाभर आधीच लागायची. आमच्या शाळेच्या बाजूलाच परेड ग्राऊंड हे एक मोठे मैदान होते. तिथे फटाक्याची दुकाने लागायला सुरुवात होई. मग अजून काही दिवसातच इतर दुकानांमध्ये आकाश कंदील, दिव्यांच्या माळा, पणत्या ई. साहित्य विक्रीला दिसू लागे. या सगळ्या गोष्टी दिवाळीची वातावरण निर्मिती करीत.

 

घरातीलही वातावरण हळूहळू बदलू लागे! दसऱ्यापासूनच घरात साफसफाई सुरू होई. घरातल्या अडगळीच्या वस्तू निकालात काढण्यात येत असत. आईची खूप लगबग सुरू होई. आमच्या वाट्याला मग काही काम आले की आम्ही भावंडे खूप उत्साहाने ते पार पाडीत असू. किराणा सामानाची भली मोठी यादी तयार होई आणि कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानातून सामानाच्या पिशव्या आणाव्या लागत. सगळीकडे एकच आनंदी लगबग सुरू होई. दिवाळीच्या वेळी वातावरणही खूप आल्हाददायक असे. हिवाळ्याची नुकतीच सुरुवात झाल्यामुळे गुलाबी थंडी पडलेली असे. दिवाळीच्या काळात बऱ्याच लोकांना बोनस मिळत असल्यामुळे सगळे आनंदात असत!

पण आम्हाला खरी उत्सुकता असे ती दिवाळीच्या सुट्टया लागायची! कधी एकदा शाळेला सुटी लागते आणि आपण मनसोक्त क्रिकेट खेळतो याचीच आम्ही वाट पाहत असू. त्याकाळात टी.व्ही.मोबाईलइंटरनेट या फाजील गोष्टी नसल्यामुळे सगळी मुले मस्त बाहेर हुंदडत! मित्रांसोबत भरपूर भटकणेखेळणे किंवा मनसोक्त झुंजारकाळा पहाड यांच्या रहस्यकथा वाचणे हेच आमचे सुट्टीतील उद्योग होते. सुट्या लागल्या की मग काय मजाच मजा!

 दिवाळीच्या काही दिवस आधी मग फटाक्यांची खरेदी होई. आमचे एक शिक्षकच फटाक्यांचे दुकान चालवीत असल्याने फटाक्यांचा किमतीत चांगली सवलत मिळे.

दिवाळीचे अजून एक आकर्षण म्हणजे आम्हाला नवीन कपडेही शिवून मिळायचे. गावातल्या ठरलेल्या दुकानात जाऊन आम्हाला प्रत्येकी एक ड्रेस शिवून मिळायचा. तो ड्रेस मग पुढच्या दिवाळी पर्यंत वापरावा लागे. 

 

दिवाळीच्या एकदोन दिवस आधीच घरात सकाळी सकाळी वेगवेगळे खमंग वास यायला सुरूवात होई. चिवडाशेवलाडू हे भरपूर लागणारे पदार्थ आधीच तयार होत. आमच्या गल्लीत सगळ्या घरांवर आकाश कंदील आणि दिव्यांची रोषणाई करण्यात येई. या सगळ्यामुळे एक मस्त सणाचे वातावरण तयार होई. दिवाळीच्या निमित्याने अनेक लोक गावात परत येतमग त्यांची रस्त्यात भेट होई आणि गप्पा रंगत!


मग येई दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस! बाजरीची भाकरीलोणीगुळतुप आणि गोवारीच्या शेंगाची भाजी त्या दिवशी करण्यात येई. धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापारी लोकं आपापल्या दुकानात चोपडीची वगैरे पूजा करायचे. नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मग आम्हाला उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात येई आणि आंघोळ झाली की आई गरम गरम चकल्या खायला देई. आईने केलेल्या त्या खमंग चकल्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.



लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मग खास पुरणपोळीचा बेत असे. त्यादिवशी मग नवीन कपडे घालून संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करायची! पूजा झाली की घरातल्या सगळ्यांना नमस्कार करून आम्ही फटाके फोडायला धूम ठोकायचो.


प्रत्येक जण आपापले फटाके आणून फोडायचा. अनार, चक्र, लडी, रॉकेट, लक्ष्मीछाप बॉम्ब, सुतळी बॉम्ब हे त्या काळातील प्रसिध्द फटाके! सुतळी बॉम्ब फोडायला चांगलीच हिम्मत लागायची. काहीजण बाटलीमध्ये रॉकेटही लावायचे! ते रॉकेट आपल्या अंगावर येऊ नये म्हणून आमची एकच धावपळ उडायची. पण आमचा सगळ्यात आवडता फटाका म्हणजे फटाक्यातील ट्रेन किंवा आगगाडी! दोन टोकाला दोन मुलांना काठी घेऊन उभे करत. त्या काठ्यांमध्ये दोरी बांधून त्यात ट्रेन लावीत. त्या ट्रेनची वात पेटवली की ती ट्रेन मग त्या काठयांमध्ये दोनतीन फेऱ्या मारी! सगळेजण देहभान विसरून ती गंमत पाहत!

दिवाळीचा सण मग भाऊबीज, पाडवा असा सुरूच राही. त्याकाळात विदर्भात एकमेकांना फराळाला बोलवायची पध्दत होती. फराळाच्या ताटात चिवडा, शेव, चकली, अनारसे, कडबोळे असे ठराविकच पदार्थ असत पण प्रत्येकाकडची चव वेगळी असे. 

 दिवाळीत अजून एक आकर्षण होते ते दिवाळी अंकांचे! किशोर, कुमार, मुलांचे मासिक, टारझन, बिरबल, अमृत, नवनीत, दक्षता असे दिवाळी अंक वाचायला खूप मजा येई.


गावातल्या सार्वजनिक वाचनालयात ही सगळी मासिके वाचायला मिळत. दिवसभर क्रिकेट खेळणे आणि संध्याकाळी वाचनालयात जाऊन दिवाळी अंक वाचणे हाच आमचा कार्यक्रम असे! हे दिवाळी अंक वाचतावाचताच कुठेतरी साहित्याचे बीज मनात रोवले गेले असावे असे आता वाटते.

 पुढे आम्ही मोठे झालो, वेगवेगळ्या गावी विखुरलो. पण प्रत्येक वर्षी आम्ही दिवाळीत गावाला जायचो. आमची मुले पण मग दिवाळीचा, फटाक्यांचा, फराळाचा मनसोक्त आस्वाद घ्यायची! आजी आजोबांच्या प्रेमात ती न्हाऊन निघायची!

 पण मग काळ बदलला. आम्ही गाव सोडले आणि शहरांमध्ये स्थायिक झालो. घरी राहून "हॅपी दिवाळी" असे संदेश सगळ्यांना पाठवीत, टीव्ही वरील दिवाळीचे कार्यक्रम पाहत, घरातच दिवाळीचे पदार्थ खाऊन आम्ही पण इतरांसारखी दिवाळी साजरी करू लागलो. आतातर आईपण नाही. पण तिच्या सोबतच गावातल्या दिवाळीची आठवण मात्र कुठेतरी काळजात खोलखोल रुतून बसली आहे आणि प्रत्येक दिवाळीत ती आठवण हमखास जागी होते !

 



अविनाश चिंचवडकर

 

 

 




No comments:

Post a Comment