#MeToo Movement आणि मी - प्रतिक्रिया

मुळात २००६ मध्ये लैंगिक शोषणा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरु झालेली. माञ गेल्या वर्षी हॉलिवूड मधे पुन्हा सुरु झालेली ही चळवळ, आता आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. तनुश्री दत्ता सोबत आता अनेक क्षेत्रांतील महिला आपल्या सोबत झालेल्या गैर व्यवहारांची कृत्ये उजेडात आणत आहेत. अनेक स्तरांतून या स्ञियांना पाठिंबा मिळत असला तरी ही काहीजण नावे ही ठेवत आहेत. आपल्या कट्ट्याचे वाचक सजग आहेत. आपले मत काय आहे हे जाणून घ्यायला आम्हांला आवडेल. 
तुम्हांला काय वाटते, हा लढा फक्त स्ञी-पुरुषांमधला आहे की शोषक व शोषित यांतील लढा आहे
समाजाच्या सर्व स्तरांतील होणाऱ्या या लैंगिक शोषणाला कसे थांबवायचे? कसा आळा घालायचा?

आपल्या प्रतिक्रिया आमच्याकडे गुगल मराठीत टाईप करुनmitramandalkatta@gmail.com वर पाठवा. Subject मध्ये #MeToo आणि मी असे लिहायला विसरू नका. 
प्रतिक्रिया २०० ते २५० शब्दांत असावी.

धन्यवाद. 
कट्टा समिती.

कट्टा समितीने केलेल्या आवाहनाला खालील प्रतिक्रिया आल्या. सगळ्यांनी विचार करून मुद्दे मांडले आहेत हे महत्वाचे. या आवाहनाला विद्याताई बळ यांनीही प्रतिक्रिया दिली.

विद्या बाळ - २० ऑक्टोबर
माझ्या मते ही एक ऐतिहासिक मोहीम/चळवळ आहे. स्त्री मुक्ती चळवळ १९७५ मध्ये स्पष्ट स्वरुपात भारतात आली, तेव्हा अनेक लोकांना वाटले होते, की हे पाश्चात्य देशातले खूळ आहे. इथे याची गरज नाही असेही तेव्हा अनेकांना वाटले होते. त्याचप्रमाणे #metoo चळवळ ही देखील पाश्चात्य देशातूनच आली आहे. मात्र ही साऱ्या स्त्रियांचीच कहाणी आहे एकप्रकारे. जगभरातील सर्व स्त्रियांना कमीअधिक प्रमाणात या प्रकारचा त्रास होतो आहे. प्रत्येक क्षेत्रांत संख्येने पुरुष अधिक आहेत, अधिकाराच्या जागेवर आहेत त्यामुळे हा त्रास महिलांना अधिक होतो आहे.
अर्थात फक्त स्त्रियाच शोषित आहेत असेही मला वाटत नाही. पुरुष ही शोषित असू शकतात. त्यांचे शोषण हे लैंगिक नसेल कदाचित. मात्र #metoo ही चळवळ ही प्रामुख्याने लैंगिक शोषणाविरुद्ध आहे. हे शोषण दुर्दैवाने चित्रपट, पत्रकारिता, मोठमोठ्या कंपन्या अशा ठिकाणी होते ही काळजीची आणि सुसंस्कृत समाजाला शरम आणणारी घटना आहे. यात अकबर, तेजपाल अशा व्यक्ती आहेत. हे पाहिल्यावर तर फक्त you too? असे म्हणावेसे वाटते.
काही जण असा मुद्दा उपस्थित करतात की आता इतक्या वर्षांनी या महिला हे का सांगतायत? तेव्हा अशांनी जरा सहृदयतेने याकडे पहावे असे मला वाटते. ह्यावर बोलणे इतके सोप्पे आहे का? ही घुसमट या महिलांनी इतकी वर्षे कशी सहन केली असा खरे तर आपला प्रश्न असला पाहिजे. या तक्रारी जबाबदार पदावरील महिलांनी ही केल्या आहेत. आता या गोष्टीकडे त्या धैर्याने पाहू शकत असतील. १५/२० वर्षांपूर्वी तेवढे धैर्य नसेल त्यांच्याकडे. पण त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार कमी होतो का असाही विचार व्हायला हवा.
आणि एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. मोदींनी ह्या बाबतीत काहीतरी बोलायला हवे होते. त्यांच्या मंत्री मंडळातील एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप होतो तेव्हा त्यांनी बोलणे गरजेचे आहे. सुषमा स्वराज व निर्मला सीतारमण ही काही बोलल्या नाहीत हे मला खटकले. कारण ज्याच्या हातात सत्ता असते अशांनी काही 'stand' घेणे, यातून एक महत्वाचा संदेश सगळया लोकांसाठी जातो असे मला वाटते. 

सारंग घड्याळ-पाटील
१०.१०.२०१८
"Me too" ह्या चळवळीला हॉलिवूड पासून सुरुवात झाली, त्याचे पडसाद भारतातही पडले. तूर्त अर्धविराम मिळाल्यागत बघ्यांचे आयुष्य पूर्ववत सुरू झाले. पण ज्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कधी कुठल्या क्षणी किंवा वेळी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले असेल, त्यांनी त्यांच्या मनातील ज्वालामुखीचा उद्रेग कसा थोपवून धरला असेल आणि त्याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम झाला असेल, ह्याची फिकीर फार कमी लोकांनी केली. आता बॉलिवूड मधून त्याला वाच्यता मिळते आहे. पण ही शोषणाविरुद्धची मोहीम किती दिवस टिकेल आणि ह्यातून कायद्याच्या कक्षेत काही दूरगामी कठोर निर्णय कितपत घेतले जातील ह्याची जबाबदारी आपली आहे, आपल्या समाजाची आहे. ह्याचा पाठपुरावा सतत करावा लागेल तेंव्हा निव्वळ पीडित महिलांना केवळ दिलासा, समाधान न मिळता त्यांच्याभोवती सक्षमतेचं वलय निर्माण होईल आणि लैंगिक शोषणावर सामाजिक, व्यावसायिक, राजकीय स्तरावर एक जागरूकता निर्माण होऊन असल्या हलकट वृत्तीने वागणाऱ्या निर्ढावलेल्या माणसांना आळा बसेल. 

काही ठराविक पुरुषांमधील ही विकृत मानसिकता ह्या समाजामध्ये इतक्या आत्मविश्वासाने वावरते ह्याचे कारण कधी पैसा, तर कधी पॉवर, कधी स्त्रियांची मजबुरी, तर कधी दडपशाहीमुळे मनात घर करून राहिलेली भीती, नाचक्की आणि अब्रूची जाहीरपणे धिंडवडे निघू नये म्हणून मागे घेतलेले पाऊल - पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्याची वाच्यता कायद्यासमोर करताना "हाती नसलेले पुरावे". ह्या वेगवेगळ्या थरांमध्ये भयाचे वास्तव्य असल्यामुळे झालेली घटना एका दुःस्वप्नाप्रमाणे स्त्रियांना विसरावी लागते. 

शिकल्या सवरल्या समाजात, कॉर्पोरेट जगतात, काही प्राधिष्ठानांमध्येसुद्धा अश्या घटना दिसून आल्या आहेत. काहींनी महिलांना सुरक्षा देणाऱ्या पॉलिसीज सुद्धा बनवल्यात पण त्याची कडक अंमलबजावणी क्वचितच होताना दिसते. निव्वळ कागदोपत्री अश्या पॉलिसीज फाईलींमध्ये जमा होतात. पण जर का कधी एखाद्या स्त्रीवर स्वतःची नोकरी वाचवायची परिस्थिती आली किंवा कुणी आत्मबळावर महत्त्वाकांक्षी असेल, तर कधी कुणी कॉन्ट्रॅक्ट वरून पर्मनंट होण्याच्या मार्गावर असेल तर काही वेळेस हाती पॉवर असलेल्या पुरुषांच्या सेक्शुअल ऍडव्हान्समेंटला ह्यांना सामोरे जावे लागते. मग ते कुठल्या ड्रेसवर केलेली कॉमेंट असो किंवा कधी स्त्रीसमोर केलेला आचरट विनोद असो, किंवा कधी केलेले इंडिसेंट प्रपोजल असो - ही सर्व कृत्ये लैंगिक शोषणाच्या प्रकारांमध्ये मोडतात. ह्या गुन्ह्याला प्रिव्हेन्शन समितीसमोर तोंड जरी मिळाले तरी आपल्या कायद्यातील परफोरेशन्समुळे खरी परिस्थिती न्याय नाकारून गुन्हेगाराला देशोधडीस नेण्यात अयशस्वी ठरते. शिवाय हे सर्व न्यायालयात सिद्ध करताना पुनश्च अब्रूच्या धिंडवड्याची चित्रफीत दाखवली जाते. इथे सेन्सिटीव्हीटी आणि सेन्सिबिलिटी दोघेही मात खाताना दिसतात आणि उरतो तो केवळ तार्किक युक्तिवाद. 

आकडेमोडीमध्ये जरी बव्हांशी महिला ह्या शोषणाला पीडित असल्या तरी कधी कधी पुरुषांनाही ह्याला सामोरे जावे लागते आणि अश्या केसेस मध्ये सहानुभूती सुद्धा त्यांना मिळत नाही. बेनिफिट ऑफ डाऊट ह्यावेळी स्त्रीला मिळाल्यामुळे सत्य जगापुढे येत नाही. त्यामुळे कायद्यामध्ये जरी अश्या घटना हाताळण्याचे प्रयोजन असले तरी न्याय मिळेलच ह्याची काही खात्री नाही. 

ह्या शोषणाच्या, छळाच्या, दडपशाहीच्या घटना कमी होतील, टळतील जर का त्या व्यक्तीकडे योग्य सपोर्ट सिस्टीम / नेटवर्क असेल, त्यावेळी निर्माण होणारा आत्मविश्वास वेळीच "असले ऍडव्हान्समेंट्स" नुसते थोपवून धरणार नाही तर त्या पर्व्हर्टला नेस्तनाबूत सुद्धा करेल.

प्राची वेलणकर - १० ऑक्टोबर
ह्या विषयावर मत द्यायला मी फार मोठी विचारवंत नाही पण तरी सामान्य वाचक म्हणून माझ जे मत आहे ते सांगावसं वाटलं म्हणून हे पत्र. तर मला वाटतं, हे सध्या जे चाललय ते सोशल मिडियावर प्रसिध्द होतय, ह्यातले खर किती खोट किती हे फक्त ज्या त्या व्यक्तीला ठाऊक. काही खोटे आरोप झालेले असतील अशीही शक्यता नाकारता येत नाही, पण त्याचीच दुसरी बाजू म्हणजे, त्या व्यक्तीने केलेले कथन हे त्या  व्यक्तीसाठीचे सत्यही असूच शकते. नक्की काय कसे घडले हे पुराव्यानिशी सिद्ध करता येण्याची शक्यताही बर्याच घटनांमध्ये नाही. त्रयस्थ म्हणून मला जे दाखवले गेले आहे तेवढेच दिसते, ज्या गोष्टी दिसल्याच नाहीत, त्या घडल्याच नसतील असेही नाही.
थोडक्यात  आत्तापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवर बरेच अन्याय झालेले आहेत. आणि रुढार्थाने त्याची झळ कधीच पुरुषांना बसली नाही. कायम बायकांचीच नाचक्की झाली. पण आता फासे पलटलेत. कालाय तस्मै नमः !
बरं ज्या महिला पुढे येत आहेत त्या बऱ्यापैकी सेलिब्रिटी वर्तुळातल्या आहे. खरं तर ह्या पेक्षाही भयानक प्रकारांना बऱ्याच जणींना रोजच तोंड द्यावे लागते. सेलिब्रिटींनी पुढाकार घेतल्यामुळे सामान्य महिलांना जर अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यासाठी प्रेरणा मिळाली व पुरुषी माजाला, अत्याचाराला थोडा आळा बसला तर ह्या चळवळीचा फायदाच झाला असे म्हणता येईल.
सुक्याबरोबर ओलं जळतं, त्याप्रमाणे काही चांगले लोक होरपळले जातील कदाचित.  परस्पर अंतर्गत कलहाचा बदला घेण्यासाठीही ह्याचा वापर होऊ शकतो हे मान्य आहेच, पण जर ह्यातून फायदा जास्त होणार असेल तर ही चळवळ आवश्यक आहेच असे मी म्हणेन.  

अरुंधती कुलकर्णी   - ११ ऑक्टोबर 
माझ्या मते लैंगिक शोषण हा समाजात असलेला जुना रोग आहे व जसे एखाद्या जुनाट व्याधीचे उच्चाटन करायचे तर त्यावर मुळापासून घाव घालून साकल्याने त्याचा खातमा करावा लागतो व शरीर निरोगी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तसेच समाजरुपी शरीरात व मनात वास करत असलेल्या या रोगाचे बाबतीत करणे आवश्यक आहे.
स्त्री-पुरुष, शोषक-शोषित अशी या लढ्याची वर्गवारी करायची मला व्यक्तिशः गरज वाटत नाही. परंतु सांघिक रुपाने कोणताही लढा लढला तर त्यात जो समूह जोडला जातो, सामूहिक शक्ती मिळते व समूहाचे पातळीवर मनोधारणा बदलायची ताकद प्राप्त होते त्यासाठी कोणत्या लेबलखाली का होईना, हा लढा लढला गेलाच पाहिजे.
कागदोपत्री कायदे करून व शिक्षा ठोठावून काही उपयोग नसतो. त्या कायद्याबद्दल सजगता, आपले हक्क - जबाबदाऱ्या - अधिकार व कर्तव्यांची जाणीव, आपल्या सभोवतालच्या समूहात कायदा व सुव्यवस्था पाळले जाण्याची निकड भासणे यासाठी समाजमन तसे तयार व्हावे लागते, तयार करावे लागते.
ते तयार करण्यासाठी जे कोणी आपली पीडा इतरांना सांगतात त्यांच्या अनुभवांची प्रामाणिकता व पारदर्शकता हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी ते काम सन्मानाने, आपले हक्क अबाधित राखत व सुरक्षित वातावरणात करण्याचा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
आपल्या पातळीवर "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करुन सोडावे, सकळजन" हे तर नक्कीच करता येईल.
सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यांखेरीज समाजात या विषयावर खुलेपणाने, मोकळेपणाने जेवढे बोलले जाईल तेवढी जाणिवेची व्याप्ती वाढेल. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यांपासून सुरुवात करून काय सहन करायचे, काय नाही, त्रास होत असल्यास कोणाकडे तक्रार करायची, कशा प्रकारे करायची, कारवाई होते का नाही यासाठीचा पाठपुरावा, त्रासातून मुक्तता होण्यासाठी उचलावयाची अपरिहार्य पावले या सर्व विषयांवर मोकळेपणाने संवाद साधावा लागेल. सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही कोणा एका व्यक्तीची नाही तर सर्वांची आहे हेही समाजमनावर ठसवावे लागेल.

नितीन ठाकूर - १६ ऑक्टोबर
आपणच बदलायला हवं!--
खोटारडे खर्‍याचे हालहालच करणार. हलकटपणा म्हटलं तरी बेहत्तर, पण संधीसाधू एकही संधी सोडणार नाहीत. आणि ढोंगी जोपर्यंत त्यांना स्वतःला थेट झळ लागत नाही, तोवर ह्यावर तोंड उघडणं तर सोडाच, साधी भूमिकाही घेणार नाहीत त्याबद्दल !
आपलं लैंगिक शोषण झालं, विनयभंग झाला, बलात्कार झाला असं आता तसा अनुभव आलेल्या महिला एक एक करून बोलू लागल्याचं दिसून येतंय. आधी नामदेव ढसाळांच्या कविता आणि त्यानंतर आलं बलुतं. मग रांगच लागली होती, दलित आत्मकथनांची ते पार "मला उध्वस्त व्हायचंय" पर्यंत. संवेदनशील मनं त्या वेळी ढवळून निघाली होती, त्याचीच आठवण झाली आत्ता. ते आपलं नव्हे, असं वाटून घेऊन बाकीचे तेव्हा गप्प राहिले. जसे आता समलिंगी गप्प आहेत. जिच्यावर बलात्कार झालाय अब्रूचे धिंडवडे तिचेच काढायचे, माणूस म्हणूनही तिचं जगणं नाकारायचं ही तर आपली सामाजिक परंपरा वाटावी अशी आपली स्थिती आहे. काहींना कदाचित महिती नसेल पण आपल्या देशात जे बलात्कार होतात,त्यापैकी बहुसंख्य बलात्कार त्या बाईच्या ओळखीतल्या व्यक्तींनीच केलेले असतात असं उपलब्ध आकडेवारीवरून सहज दिसून येतं. त्यामुळे आज वीस वर्षांनी का ही बोलतेय असं शहाजोगपणे विचारणार्‍यांना मी असं विचारतो,की तुमच्या नात्यातल्या बाईनं असं Metoo सांगितलं तर असंच विचाराल का?
Metoo हा विषय अत्याचार सोसणार्‍या आणि अत्याचार करणार्‍यांपुरताच मर्यादित नाही. हे दोघंही (सोसणारे आणि करणारे)  तसे का वागतात याचा विचार व्हायला हवाय. संभोग ही एक नैसर्गिक क्रिया आहे. या नैसर्गिक क्रियेला माहित नाही तेव्हापासून आपल्या समाजाने अनन्यसाधारण महत्त्व देऊन ठेवले आहे. जे संभोगाचं तेच पाळीचंही!  
हे अनन्यसाधारण महत्त्व हाच खरा प्रॉब्लेम आहे. शिंकणंखोकणं, उचकी लागणं, जांभया देणं हे जितकं नैसर्गिक आहे तितकंच पादणं सुद्धा! त्याचं कारण आपण आपल्याच शरिराच्या काही अवयवांना दिलेलं अनन्यसाधारण महत्त्व! पण व्यावहारिक पातळीवर हे मान्य करणं आपल्याला जड जातं. या आपण दिलेल्या महत्त्वामुळे संभोगही मालकी हक्क गाजवण्याची, वर तोंड करून मिरवायची बाब बनून गेलीय. हे सगळं फक्त पुरुषांसाठी. आपल्या डोक्यात हे इतकं फिट्ट आहे की आपलं नाव देखील आपण बापाचंच लावतो. आईनं नऊ महिने पोटात वाढवलं तरी!
निसर्गानेच जन्म देण्याची जबाबदारी दिलीय, पुरुष केव्हाच नामानिराळा होऊ शकतो असं या समाजाने आपल्यावर पिढ्या पिढ्या बिंबवलंय. पण ही वस्तुस्थिती नाही हे आपण सगळेच जाणतो. जसं मुलाचा नेमका बाप कोण हे त्याच्या आईलाच माहित असतं तसं.
त्यामुळे ज्या दिवशी इतर नैसर्गिक क्रियांसारखीच संभोगही देखील एक नैसर्गिक क्रियाच आहे हे आपण मनापासून मान्य करू, त्या दिवसापासून विनयभंग, बलात्कार हे मुद्दे आपोआप मागे पडायला लागतील. आणि Metoo सारखी वेळ कुणावरच येणार नाही.

Nandini Devare  - 21 October
#Metoo? Of course! Almost every woman I have spoken to has her own story. While some stories are more serious than others, there is no doubt that every women around the world lives in fear of harassment. By persons known and unknown, friends and family, seniors and juniors, men and women alike. We carry pepper spray, take care while dressing, think twice before speaking, make advance arrangements to return home after dark, wonder whether to take that night flight back after a trip, etc, and the list goes on. In spite of all the care we take, we are not free from harassment and cannot let our guard down. Finally, the world is listening. There is an audience who is  acknowledging these terrible incidents and the daily challenges we face. This is as good a time as any to speak out and be heard.

In India, since it is considered taboo to talk about sex, unfortunately it extends to complaints of sexual harassment as well. While we have several legal avenues to voice our grievances in this regard, the taboo and reputational concerns are a different story. In 2013, prevention of sexual harassment of women at the workplace was given its due worth by way of a far reaching enactment. This enactment compels employers to hear  complaints of sexual harassment at the workplace and take stringent action, provide a safe wrong environment and set up a committee to hear such cases. The criminal laws (Indian penal code) also contain several offences related to sexual assault, and outraging the modesty of women. However, without a significant change in societal behavioral patterns, these will remain paper protections.
-----------------------------------------------------------------------------------------------







No comments:

Post a Comment