🎆दिवाळी🎆

 


यंदाची दिवाळी धाकट्या अजितकडे पुण्यास होती. पण यंदाची दिवाळी जणू काही मोठया मंडळीची म्हणा अथवा सिनिअर सिटीझनची  होती. एक नात सोडली तर कोणीच नातवंडे आली नव्हती. विमलाबाईंच्या सुना, मुले, जावई व मुलगी एवढीच मंडळी एकत्र होणार होती. आपल्या दिवंगत नवऱ्याच्या फोटोकडे पहात विमलाबाई विचार करत होत्या. मधेच मनांत हसत होत्या. त्यांना फोटोतून आवाज आल्याचा भास झाला.

 

"काय ग विमल, यंदाची आपल्या कुटुंबाची दिवाळी रोडावल्यासारखी वाटतेय. नाही का?"

"हो ना! "नातवंडे म्हणजे आपली चिमणे पाखरे, पंख विस्तारून दूर गेली आहेत आणि आयुष्यात उंच उंच भराऱ्या घेतल्याच पाहिजेत ना! आता नातवंडे साता समुद्रापार त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यात व नाती त्यांच्या त्यांच्या सासरी व नातसुना आपल्या नातवंडाबरोबर दूर परदेशात आहेत. आपला काळ वेगळा होता. मुले भारतातच होती. येऊन जाऊन थोरला फक्त दूर असायचा. दूर म्हणजे सूरतला आणि का वर्षी अनिल पण बहारीनला असल्याने दिवाळीत नव्हता. आठवतंय ना?"

 

"हो. आठवतंय की. पण बाकी सर्व वर्षी मुले एकत्र होती व असायचीच. दिवाळी म्हटली की एखादं  मंगलकार्य असावे असे सर्वजण एकत्र यावयाचे. पुढे त्यांची कुटुंबे पण वाढत गेली,.....तरी सर्व नातवंडे ठरल्याप्रमाणे उत्साहाने एकमेकांना भेटायच्या ओढीने, आठवणीने यायची. एकत्र जमायची, खेळायची. पुढे पुढे फिरती दिवाळी म्हणजे प्रत्येकाकडे जावयाचे अशी दिवाळी सुरु झाली. त्यामुळे प्रत्येकाकडे जाण्यात वेगळी मजा असायची. आठवते ना? एकदा आपला पुतण्याही सहकुटूंब आपल्या दिवाळीत सहभागी झाला होता.

 

दिवाळीत एक सून, मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना पकडून अंघोळी घालण्यात, तर एक स्वयंपाकात, तर एक सून फराळाचे पहाण्यात गर्क असावयाची आणि आठविते कां ते चित्र? आपली ताई हॉलमध्ये एक पाय पसरून व तिच्या आजूबाजूला सर्वांनी आणलेले फराळाचे डबे ठेवून बसलेली, आणि तोंडाने,"अरे, मुलांना काचेच्या डिश नको, त्या कागदी डिश दे. अथवा त्या मासिकाचे कागद फाड. अजित तू काढून ठेवली आहेत ना?"असे म्हणत असायची. आणि त्यात मुलांचा गलका.

 

'मला रवा लाडू दे,' असा एकाचा हट्ट, तर दुसरा 'ए, मला रवा लाडू नको, मला बेसन लाडू दे' असे म्हणत असायचा. 'मला चकली दिलीच नाही', असा एकाचा घोष, तर मधेकोणाचा तरी 'मला दोन चकल्या दे.आणि दाल मुठ पण हवीय मला', असा गलका, गोंधळ चालू असायचा. हो! साधनाच्या दाल मुठ शिवाय दिवाळीला पूर्णता नाही.

 

त्यात मधेच ताईचे सांगणे असावयाचे, की अग, साधना त्याबाजूला अर्धा अर्धा कप चहा टाक, तुमच्या गुजराथी पद्धतीचा दुध पाणी मिक्स. एकदम झकास.

 

आणि मुलांनो, तुम्ही आधी खाऊन घ्या, मग या बाजूला या. मी पाणी देते." अशी तिची बडबड तोंडाने चालू असायची. तेवढ्यात कोणाचा तरी उठताना भरलेल्या पाण्याच्या ग्लासला पाय लागावयाचा की.,.... अरे फडके आणा तिथून ...असा गलका सुरु व्हायचा. घर कसे भरलेले असावयाचे.

 

पाडव्याला मुले आपापल्या बायकांना काही तरी भेटवस्तू, दागिना आणावयाचे. मग कोणाचा पाडवा किती भारी यावर चर्चा, चेष्टा, विनोद, गप्पा व्हायच्या. तुमच्यापासून ओवाळणीस सुरुवात व्हायची. तुम्ही नेहमीप्रमाणे हातातील अंगठी काढून ताम्हनात टाकावयाचे. आणि हो लक्ष्मीपूजनाला तुम्ही सांगावयाचे तितकी नीट पूजा कदाचित सांगत नसेल, पण धवल मात्र पुस्तक (पोथी) घेऊन नेहमी पूजा सांगतो बरं का. सर्वजण पूर्वीप्रमाणे आपापला एक-एक दागिना पूजेत ठेवतात. लक्ष्मीपूजनाला माझे अनारसे असतात व थाटाने लक्ष्मीपूजन साजरे होते. अनारसे त्याच दिवशी मी आणि साधना बनवितो.

 

भाऊबीज म्हटली की ताईची,'ए, मी दोन बोटे तेल लावते' म्हणत तेल लावणे आटपते. पण तिच्याऐवजी भाचे मंडळीकडून तेल लावून घेणे, तेल लावणे कसले? रगडून घेणे मामालोकांचे चालावयाचे. नातवंडे पण नातींकडून म्हणजे सीमा, सोनाली, अमिता, मुग्धाकडून भाऊबीज हवीय ना? मग आम्हाला तेल लावा छानपैकी..तरच भाऊबीज मिळेल..! असे म्हणून तेल लावून घेतात. अशा गमती जमतीत भाऊबीज व्हायची.

 

"दिवाळीत रात्री फटाके वाजविण्याचा कार्यक्रम असायचा."

"हो ना!"

"अजूनही आरती, साधना वाजवितात का ग फटाके ? दोघीजणी धावून धावून फटाके फोडायच्या. मनीषा मात्र वरूनच कानावर हात ठेवून घाबरत उभी असायची. एका दिवाळीत श्रेयसची बोटे भाजली होती. तरी अनिल, अजितचे 'अरे, मुलांनो सुती कपडे घाला, पायात प्रत्येकाने स्लीपर घातल्या आहेत ना?' वगैरे आदेश अथवा सूचना चालूच असायच्या. हो ना!"

 

"हो हो.. अजूनही तसेच फटाके फोडणे चालू आहे.पण आता नातवंडाऐवजी आपली पतवंडे, पणतू मंडळी असतात. नेहा, नील, ईशान, रोहन, आदित्य, अनुष्का व कधीमधी सीमा अमिता परदेशातून आल्या, तर सायली, ओजस ,सानिका यांची भर होते. पुढल्या वर्षी धवलचा निखील पण असेल. आपले जावई अरुणराव अजून पण नेमाने पणतू मंडळींना घेऊन फटाके वाजवावयास जातात."

 

दिवाळीत एक दिवस भजनाचा कार्यक्रम असतोच. पूर्वीप्रमाणेच धवल, केदारची तबल्याची साथ, सचिनची पेटीची, श्रेयसची सिंथेसायजरची साथ व माझ्या हातात झांज असे साथ संगत करत भजन रंगते. आता मुलींबरोबर मुग्धा, अमिता, सीमा, सोनू - या नातींच्याबरोबर कल्याणी, अनुजा, स्नेहा या नातसुनांकडून पण भक्तीगीते सादर होतात. या सर्व कार्यक्रमाचे चित्रण अनघा नीट करून दिवाळीच्या आठवणी ताज्या ठेवण्याचे काम करते. लगेच सोनू लगबगीने कॉमप्यूटरवर फोटो लोड करून प्रत्येकाच्या घरी झालेली दिवाळी फोटोद्वारे पोहचती करते.

आता बदल म्हणजे एक दिवस दिवाळीत औटिंगला जातो. तुम्ही असतांना थोरल्याच्या प्लॉटवर बोपालला गेलो होतो ते आठवतंय ना? तसेच एकदा लोणावळा, एकदा भिडे वाडीला तर एकदा दोन दिवसांसाठी अलिबागला, तर गेल्या वर्षी कर्जतला फार्मवर गेलो होतो. त्या योगाने शशीचे फार्म हाउस पाहिले. असे नवीन बदलत्या काळाप्रमाणे औटिंगचे प्रोग्राम करून दिवाळीची रंगत वाढवीत दिवाळी साजरी होत आहे.

 

तेव्हा सांगावयाचे काय, तर अजूनही पूर्वीसारखीच दिवाळी साजरी होत आहे. मी खरोखरी सुखी आहे हो. कारण तुम्ही घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे, सगळे एकत्र येऊन दिवाळी साजरी करत आहोत. मुले व मी एकमेकांसोबत असल्याने दिवाळी अधिकच उत्साहात साजरी होते. यंदा भले दिवाळी रोडावली असेल पुढच्या वर्षी पुन्हा दिवाळीस उधाण नक्कीच येईल.


वैशाली वर्तक




No comments:

Post a Comment