'आई ग, रवानारळाचे लाडू काही केल्या तुझ्यासारखे जमतच नाहीत...सगळं तुझ्या प्रमाणात
घेऊन, अगदी पाकला उकळी फुटताना तू मन लावून ती एकतार बघतेस अन्
एका अचूक तुटत्या तारेच्या समेवर गँस बंद करतेस...सगळं अगदी तुझ्यासारखं करुनही..रवा, नारळ दांडारल्यासारखेच दाताखाली येतात. तुझा लाडू कसा ग अगदी अलगद, मऊ जिभेवर येतो, आपलं गोडसर ओलेपण घेउन विरघळून जातो...चवही मागे रेंगाळती राहते...माझं
का असं होतं ग?'
लेकीच्या प्रश्नावर
तिच्या चेहऱ्यावर हास्यलकेर उमटून गेली. घाईच फार तुम्हांला... सगळं कसं instant हवंय...मनात आलं की केले लाडू.....त्यासाठी आधी स्वतःच्या मनापासून शेवटच्या
वेलचीच्या चिमटीपर्यंत तयारी तर करायला हवी ना. त्याचा मऊसर गोडवा जिभेवर येण्यासाठी
त्याला आधी सर्वार्थाने घोळवायला हवंच ना!
आईची तयारी ती लहानपणापासून
बघत होती. साखरांब्याची किसलेली कैरी असो वा पाकातले लाडू असोत. आदल्या रात्री साखरेत
पाणी/कैरीचा कीस घालून, सकाळी ती मंद आचेवर एकजीव झालेल्या कैरी साखरेला
आटवायला ठेवून द्यायची. कैरीच्या अंगच्याच रसात साखर पूर्ण विरघळून जाई. वर्षभर एकसंध
साखरांबा ताटात विराजमान होई. उद्या लाडू भाजायचे तर आई रात्रीच साखरेत पाणी घालून,
हलवून बाजुला ठेवून द्यायची. रात्रभर साखरपाणी इतके एक व्हायचे की, सकाळी साखरेचं पाण्यात विरघळणं अपरिहार्यच असायचं.
स्वतःचं अस्तित्व
असं पाण्यात समर्पित करणं साखरेकडुन शिकावं. नजरेसाठी ती अदृश्य होते पाकातून, पण चवीतून 'स्व' सिद्ध करत राहते.
अशा मुरलेल्या पाकाला फक्त एकतारीचा चटका द्यायचा अवकाश...रवा-नारळ तिच्या चवीत आपसूकच
सामावून जातात. अस्तिवाचं एकमेकांत मुरणं फार आवश्यक असतं...मग ते दुध-सारखेचं असो
वा माणसा-माणसातल्या नात्याचं असो. मुरणं, जिरणं जिथे जिथे आलं
तिथे तिथे वेळ देणं ही अपरिहार्यपणे आलंच. मुरलेली/जिरलेली सगळीच अस्तित्वे दृश्य अदृश्य
स्वरुपात जाणिवांना जाणवतच राहतात, फक्त आपल्या जाणीवा तेव्हढ्या
जागृत पाहिजेत.
साखरेला तिच्या
गुणधर्मानुसार पाण्यात विरघळायला लावता तुम्ही पोरी...थेट साखर पाणी आचेवर ठेवून. ती
विरघळतेच ग तिच्या धर्मानुसार. पण हे लादलेलं विरघळलेपण मग असं कुठंतरी लाडवात प्रतित
होत राहतं...आणि तुम्ही चुका शोधत बसता....विरघळणं आणि विरघळवणं..दोन वेगळ्या गोष्टी.
खुप क्षुल्लक वाटतात..पण कधी कधी फार परिणाम साधतात.
एका अस्तित्वाचं
दुसऱ्या अस्तित्वात मिसळत जाणे..मुरत्या क्षणांचा आनंद, आस्वाद एकमेकांना देणे, हीच तर पहिली पायरी उत्तम पदार्थाची
आणि नात्यांचीही!
सौ विदुला जोगळेकर
No comments:
Post a Comment