नाळ


  

मी पाहिलेल्या चित्रपटांपैकी 'नाळ' हा चित्रपट मला संस्मरणीय वाटला. दत्तक दिलेला मुलगा आपल्या आईला खरी आईच समजत सतो. त्याचे लाड, रुसवे-फुगवे सगळं काही नैसर्गिक चालू असतं. आई पण त्याच्यावर पोटच्या मुलासारखेच प्रेम करत असते. यामधे एक महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे. मुलाचा मामा या निरागस मुलाला, 'ही काही तुझी खरी आई नाही. तुझी खरी आई गावाकडे आहे' असे बेदरकारपणे सांगतो. मुलाचे भावविश्व उधळून टाकतो. खरं तर दत्तक घेतल्याविषयी मुलाच्या आई-वडिलांनीच त्याला प्रेमळपणाने सांगायाला हवे. तेवढी काळजी बाहेरची लोकं  घेत नाहीत.


सिनेमात हेच दाखवले आहे. मुलाला आईबद्दल उत्सुकता निर्माण होते. मामा काहीतरी काळेबेरे सांगून त्याला आईला भेटायची फूस लावतो. आता आई नेहमीप्रमाणे ओरडली, तरी त्याला ही दत्तक आई आहे म्हणून ओरडते असे वाटायला लागते. आपण आपल्या ख-या आईला कोण आहे ते शोधून भेटायला जावे असे त्याला वाटते. मुलाचे आणि आईचे काम अत्यंत सुंदर झाले आहे. ते इतके नैसर्गिक आहे की अभिनय केला आहे असे वाटतच नाही. हा प्रसंग आपल्यापुढे घडतो आहे असे वाटते. डोळे भरुन येतात.

 

काही दिवसांनी त्याच्या आजीचे निधन होते. म्हणून घरच्यांना भेटायला गावाकडची, नात्यातील माणसे येतात. यात त्याची खरी आई देखील असते. आपल्याला आपली 'खरी आई' भेटणार मुलाला आनंद होतो. पण त्याचे हित व्हावे म्हणून त्याची खरी आई तो कितीही बोलायला आला तरी मनाचा निग्रह करुन त्याच्याकडे बघतही नाही. पोटचा गोळा समोर आला तरी त्याच्याकडे बघता येत नाही.

त्याच्याशी बोलता येत नाही. त्याला जवळ घेता येत नाही. तिच्या मातृत्वाची तिथे सत्वपरीक्षा बघितली जाते. मुलगा वयाने लहान असतो. त्याच्या आईबद्दलच्या अपेक्षा भंग पावतात. नंतर तो आपल्या दत्तक आईचेच प्रेम स्विकारतो. आई व मुलगा पुन्हा पूर्वीप्रमाणे आनंदात रहातात.

 

भावनांचा कँलिडोस्कोप ह्या सिनेमात सुंदर दाखवला आहे. कितीही कठोर हृदयाची स्त्री असली तरी हा सिनेमा बघून तिचे डोळे पाणावल्याशिवाय रहाणार नाहीत. शेवटच्या प्रसंगात त्या मुलाच्या आईचा चेहरा फक्त.आपल्याला दिसतो. तिच्या चेहऱ्यावरची वेदना प्रेक्षकांना दिसते. पण मुलाला मात्र दिसत नाही.

 

सुंदर मांडणी, नैसर्गिक अभिनयछटा, भक्कम मध्यवर्ती कल्पना ह्यामुळे हा सिनेमा मला आवडला आणि संस्मरणीय झाला. यातील सर्व जणांची कामे नितांतसुंदर आणि कमालीची सहज आहेत. एकदा तरी आवर्जून पहावा असं हा चित्रपट आहे.


सौ मनीषा आवेकर



 

No comments:

Post a Comment