नामसंकीर्तन

संत शेख महंमद

कृतयुगी जे प्राप्त" ध्याने।
त्रेती यजने, द्वापारी" अर्चने।
ते प्राप्त सर्व"नामसंकीर्तने।

गुरूभजने कलियुगी ॥

भागवत धर्माचा पायाच "नामस्मरण" आहे. आपल्या सारख्या सामान्य माणसांना संसार सांभाळत देवाच्या चरणी लीन होण्यासाठी संतांनी सांगितलेला हा सरळ आणि सोपा मार्ग.
आपल्याला महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरेतील महत्त्वाची नावे ठाऊक असतातच. पण ज्या अनेकांनी ही परंपरा पुढे नेली, वाढवली अशा काही अल्प-परिचित संतांच्या कार्याची आणि काव्याची थोडीफार माहिती करून देण्याचा प्रयत्न "नामसंकीर्तन" ह्या लेखमालेतून मी करणार आहे.

"शेख महंमद अविंध। त्याचे हृदयी गोविंद"॥

महाराष्ट्रातील 'कबीरा'चा अवतार आणि हिंदू- मुस्लिम ऐक्याचे आध्यात्मिक मूर्तीमंत प्रतीक म्हणजे 'संत शेख महंमद'
कादरी शाखेचे सूफी तत्वज्ञान आणि भागवत धर्माचा विचार यांचा सुरेख समन्वय त्यांच्यात दिसून येतो. अनेक अभंग आणि त्या समवेत 'योगसंग्राम', 'पवन विजय', 'निष्कलंक प्रबोध' शा ग्रंथ रचना त्यांनी केल्या आहेत. योगाच्या प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन या ग्रंथात आहे. 
वारकरी संप्रदायातील एक संत असणाऱ्या शेख महंमद यांचे गाव" श्रीगोंदा'. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करून श्रीगोंदा इथे आश्रम उभारला. सर्व संतांप्रमाणे शेख महंमद यांचं आराध्य दैवत" विठ्ठल"च होतं.

"कटावरी कर चंद्रभागा ठाणा।
दावितसे खुणाI भवसिंधूच्या॥"
"पतिता कडसूत्रI भाविका पायवाट।
दावि खुणा निकटI तटी उभा"॥

शेखबाबा सांगतात, चंद्रभागा भवसागराचे प्रतीक आहे. तिच्या तीरावरील विठ्ठल देवाने आपले हात कमरेवर ठेवले आहेत. त्यांच्या भक्तांसाठी कमरेइतकीच खोल असलेल्या भवसागरात बुडण्याची भीती नाही. एरवी संपूर्ण ब्रह्मांड बुडून जाईल इतका हा भवसिंधू खोल असला तरी हा मार्ग चालत जाता येईल अशा पायवाटे इतका सोपा आहे.

"विठ्ठल" शब्दाची फोड करताना त्या अक्षरांचा शेखबाबांनी अतिशय मार्मिक अर्थ लावला आहे. पहिलं अक्षर" वि" चा अर्थ ' जो विकसला' आहे, विकारला नाही. "ठ" चा अर्थ 'जो ठसावला' असा होतो. तेथे त्याचे सर्वत्र असणे, प्रकटणे आणि व्यापणे सूचित होते. "ल" चा अर्थ ' जो आम्हा भाविकांना लवकर लाभतो'. 

"वि म्हणजे विकासला। "ठ" म्हणजे ठसावला।

या अभंगात असा अर्थ त्यांनी मांडलाय. धर्माने व जातीने मुसलमान असूनही हिंदू तत्वज्ञानावर आणि अध्यात्मावर त्यांचा अधिकार वाणीने पगडा होता. त्या काळी देखिल काही कर्मठ मंडळींनी नाकं मुरडली असणार, नावं ठेवली असणार कारण त्यांच्या काही काव्यपंक्ती हे सूचित करतात.

"बरवा झालो मुसलमान। नाही विटाळाची आठवण।" किंवा
"परमार्थाने बोलणे। शूरत्व वचने। विवेकाने जिणे। शेख महंमदा॥"

अविंध जातीत जन्मलो। कुराण पुराण बोलो लागलो।
वल्ली साधुसिध्दांस मानलो। स्वहितपरिहितागुणे॥
ही त्यांची जीवनशैली आणि ध्येय होतं.

शेखबाबा गृहस्थाश्रमी होते. त्यांचा वंश अजूनही श्रीगोंदा इथे असून कुटुंब पोषणार्थ मालोजीराजांनी दिलेली जमीन अद्यापही आहे. ते पैगंबरवासी कधी झाले याचे ठोस पुरावे नाहीत, पण त्यांच्या मठात फाल्गून शुध्द नवमीस पैगंबरवासी झाले असं मानतात .

श्रीगोंद्याला असलेल्या शेखबाबांच्या मंदिराला अथवा मठाला तेथील लोक ग्रामदैवत मानतात. गुढीपाडवा, आषाढी एकादशी, विजया दशमी( दसरा) , महाशिवरात्र आणि फाल्गून शुध्द नवमी अशा ५ दिवशी शेख महंमद यांच्या समाधीला चंदन लेपन होतं.
वर्ण, जात, वेष इ.गोष्टी बाह्य स्वरूप असून खरे महत्व अंतरंगाला आहे हाच त्यांचा सर्वांना उपदेश आहे.
"काटे केतकीच्या झाडा।
आत जन्मला केवडा।
ऐसे केले या गोपाळे।
नाही सोवळे ओवळे॥
श्री संत शेख महंमद महाराज
(१५६०-१६५०)
भजनाची ऑडिओ लिंक: काटे केतकीच्या झाडा
ज्योती कुलकर्णी


                                   


No comments:

Post a Comment