नामसंकीर्तन-९ नरहरी सोनार



..१३०० च्या दरम्यान नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरी येथे झाला. मुळात कडक शिवोपासक असलेल्या नरहरी महाराजांना वारकरी संप्रदायामुळे शिव आणि विष्णू-विठ्ठल यांच्यातील ऐक्याचा साक्षात्कार झाला. पंढरपुराकडे ते "विष्णूसहित शिव नांदतो पंढरी" असे पाहू लागले. आपल्या पारंपारिक म्हणजे सुवर्णकाराच्या व्यवहाराच्या भाषेत त्यांनी अध्यात्माचे निरूपण केले.  

रि-हर हा वाद त्याकाळी होता. नरहरी महाराज इतके शिवभक्त होते की पंढरपुरात राहून देखिल त्यांनी विठ्ठलाचं दर्शन कधीही घेतलं नव्हतं. आपली शिवपूजा, संसार आणि आपला व्यवसाय यात ते रमले होते. एकदा एका सावकाराने पुत्रप्राप्तीसाठी विठ्ठलाला सोन्याचा करदोडा/करगोटा घालण्याचा नवस केला. पुत्रजन्मानंतर सोन्याचा करदोडा बनवण्याची नरहरी सोनारांना विनंती केली. मला विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून द्या, मी तयार करून देईन असं महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे सावकार माप घेऊन आला. विठ्ठलमूर्तीला बांधू जाता तो बसेना. -याचदा कमी-जास्त माप केलं तरी बसेना म्हणल्यावर सावकाराने नरहरी सोनारांना विठ्ठल मंदिरात चलण्याची विनंती केली . मी कट्टर शिवभक्त असल्याने विठ्ठल दर्शन घेणार नाही, डोळ्यावर पट्टी बांधून येईन असं सांगितलं. मंदिरात करदोडा माप घेण्यास नरहरींनी सुरूवात करताच त्यांना ती शिवमूर्ती असल्याचे जाणवले.

शिरी गंगा, गळयात सर्पमाळ, कटीस व्याघ्रांबर आहे असेच वाटले. 'हे माझे शिवशंकर' म्हणत डोळयावरील पट्टी काढताच समोर विठ्ठलमूर्ती. परत परत तोच अनुभव आल्यावर त्यांनी शिव आणि विठ्ठल एकच आहे हे मान्य केले आणि त्यानंतर ते विठ्ठलभक्त होऊन गेले. या साक्षात्कारानंतर हरि-हर हा वाद मिटला. व्यवसायापेक्षा भक्तीमार्ग किंवा अध्यात्माकडे ओढा वाढला. मात्र या वारकरी संप्रदायाच्या संतांनी प्रपंच आणि परमार्थ यात भेद केला नाही. उत्पादनव्यवस्थेने आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय नेकीने, निष्ठेने करतच परमार्थ करायचा ही भूमिका होती, त्यामुळे प्रपंच परमार्थरूप झाला आणि व्यवहार पारमार्थिक मूल्यांना धरून करण्याचा पायंडा पडला.

नरहरी सोनारांच्या काव्यात हीच गोष्ट आढळते. नरहरी सोनारांचा प्रसिद्ध अभंग "देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार" याचे उत्तम उदाहरण आहे. सोने आटवण्यासाठी जी शेगडी असते. तिला बागेसरी म्हणतात

महाराज सांगतात, की देह हीच बागेसरी आहे.आणि देहात वास्तव्य करणारा आत्मा हे सोने आहे. सत्व, रज आणि तम या तीन गुणांची मूस करून तिच्यात ब्रह्मरस ओततो. या सोन्याचा दागिना घडविताना विवेकाचा हातोडा घेऊन ठाकूनठोकून त्याला आकार द्यावा लागतो. या हातोड्याने कामक्रोधादी हिणकसाचे चूर्ण होऊन ते बाजूला काढता येते. ही प्रक्रिया चालू असताना जिवाशिवाच्या फुंकणीतून वारा घालायचे काम सुरूच आहे. काही सुवर्णकार दागिने घडवताना सोने हडप करतात. या लोकसमजुतीचा आधार घेऊन आपण मनबुद्धीच्याच सूक्ष्म कात्रीने रामनामाचे सोने चोरतो. पण हीच दोन अक्षरे ज्ञानाच्या तराजूत तोलतो. या सर्व व्यावसायिक साधनांची आणि दागिन्यांची पोतडी खांद्यावर घेऊन भवसागर तरून जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. भजनभक्ती न सोडता कार्य केले तरच हे शक्य आहे.

"नाम फुकाचे फुकाचे। देवा पंढरीरायाचे॥
नाम अमृतसार। ह्रदयी जपा निरंतर॥
नाम संतांचे माहेर। प्रेमसुखाचे आगर॥
नाम सर्वांमध्ये सार। नरहरी जपे निरंतर ॥

अशी रचना करणारे नरहरी सोनार १३१३ च्या माघ वद्य तृतीयेला मल्लिकार्जुन देवाला वंदन करून विठ्ठलकटीमधे विलीन झाले.

"नामा म्हणे नरहरी सोनार, झाला अलंकार देवाचा हा"

नरहरी सोनारांचे मूळ आडनाव महामुनी असे म्हटले जाते. आजही पंढरपूरी महामुनी यांच्याकडे नरहरी महाराजांच्या पादुका आणि त्यांची देवपूजेतील पितळी विठ्ठलमूर्ती यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. परळी वैजनाथ येथे त्यांचा पुण्यतिथी महोत्सवही साजरा होतो.


नरहरी सोनारांना आमचे प्रणाम...

संदर्भ : निवडक सकल संत सार्थ गाथा -डॉ. सदानंद मोरे देहूकर

भजन लिंक- "सुंदर ते ध्यान कैलासी शोभले" 


ज्योती कुलकर्णी

No comments:

Post a Comment