नामसंकीर्तन – भाग 3 संत तुकडोजी महाराज


"राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या "
ही कविता आठवते? आपल्याला शाळेतल्या अभ्यासक्रमात होती. ही कविता एका संतांची आहे. ते आहेत " राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ".

"राजास जी महाली" कविता ज्योतीच्या स्वरात ऐकण्यासाठी लिंक क्लीक करा 

त्यांचं मूळ नाव 'माणिक इंगळे' आणि त्यांचा जन्म विदर्भातील अमरावती जवळ 'यावली' या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांचे वडील 'बंडोजी' शिंपी व्यवसाय करत होते. आई 'मंजुळाबाई' ईश्वरभक्त होती. व्यसनाधीन वडीलांचा व्यवसाय चालेना म्हणून ते कुटुंबाला घेऊन चांदूरबाजारला बहिणीकडे आले, पण तिथे सुरू केलेला गुळाचा व्यापारही न चालल्याने परत 'यावली'ला गेले. मुलानी शिक्षण घ्यावं म्हणून शाळेत पाठवलं तर माणिकला भजन-गायनाचा लळा असल्याने, त्याचे मन शिक्षणात रमेना. शाळेत न जाता रानात, देवळात जाऊन भजन म्हणत बसणे हाच नाद लागला होता. महादेवाच्या मंदिरातल्या 'हनवंतीबुवां' कडूनच "खंजिरी वादना" ची कला 'माणिकजी शिकले.

नंतर आईबरोबर ते 'वरखेड' ला त्यांचे मामा ' गोविंदराव वानखडे' यांच्याकडे आले. चौथी पर्यंत शिक्षण घेत असताना तिथल्या नाथपंथीय श्री. आडकोजी महाराजांचा त्यांना सहवास लाभला. माणिकजी त्यांना भजने गाऊन दाखवायचे. तेव्हाच त्यांचं "कवित्व" जन्माला आलं. 

आडकोजी महाराजांनीच त्यांना "तुकडोजी" हे नाव दिलं. कारण लहानपणी दारिद्र्यात कित्येकदा भिक्षा मागायला लागायची हे ते कधीच विसरले नव्हते. म्हणूनच ते स्वतःचे काव्य "तुकड्यादास" या नावाने करायचे. स्वतः केलेली भजने, कविता ते गोड आवाजात आपल्या गुरूला गाऊन दाखवत. आडकोजी महाराज समाधीस्थ झाल्यावर रामटेक, ताडोबा, रामदिघी अशा घनघोर अरण्यात तपश्चर्या करताना तुकडोजी "योगी" झाले. 
पुढे समाज जागृती, देव आणि देशभक्तीचा प्रसार करीत ते गावोगांव कार्यक्रम करू लागले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.

त्यांच्या कार्याचा बोलबाला वाढत गेल्यावर एकदा महात्मा गांधींनी त्यांना सेवाग्राम ला बोलावले  ( ऑगस्ट १९३६). तिथे राहून तुकडोजींनी "लहर की बरखा" हे पुस्तक लिहिले. महाराजांचं मराठी बरोबरच हिंदी भाषेवर देखिल प्रभुत्व होतं आणि त्यांनी हिंदीत लिखाण देखिल केले आहे. असं सांगितलं जातं की एकदा महात्मा गांधी सोमवारी मौन पाळत असताना तुकडोजी त्यांना " उंचा मकान तेरा, कैसी मजल चढू मै" हे भजन ऐकवत होते. महाराजांनी ते इतकं सुंदर आणि भावपूर्ण गायलं की गांधीजी मौन विसरले व त्यांना 'फिर एक बार गावो' म्हणत ते भजन परत गायला लावलं. सेवाग्रामात तुकडोजी सूत कातीत व खादी वापरत. १९३६ ते १९४२ मध्ये महाराज भजन, भाषण, अभंग, पोवाडे गाऊन लोकजागृतीचे कार्य करत होते. १९४२ च्या 'भारत छोडो ' आंदोलनात त्यांचा सहभाग असल्याने २८ ऑगस्ट १९४२ ला त्यांना अटक झाली. डिसेंबर मध्ये सुटका झाली.

गुरुकुंज आश्रम 
अमरावती जवळ " मोझरी" गावात "गुरूकुंज" आश्रमाची स्थापना आणि त्यांच्या वाड़गमय सेवेची पूर्तता असलेला"ग्रामगीता" सारखा श्रेष्ठ ग्रंथ (४१ अध्याय) हे त्यांच्या जीवनकार्यातील महत्वाचे टप्पे होय. खेडेगाव स्वयंपूर्ण होणे, सुशिक्षित होणे, सुसंस्कृत होणे, ग्रामोद्योग संपन्न होणे, गावातील उद्योगांमुळे देशाच्या गरजा भागवल्या जाणे या साठी त्यांनी योग्य उपाय योजना सुचविल्या होत्या, ज्या आजही उपयोगी आहेत. याचेच प्रतिबिंब ग्रामगीतेत आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा होणे गरजेचे आहे , निष्काम कर्मयोग करणे महत्वाचे असे संदेश देत, समाज उद्धारण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

१९४९ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचं कार्य, तळमळ, उत्साह, संघटनशक्ती, सर्वधर्म समभाव इ. गुण पाहून आणि राष्ट्रपती भवनातील त्यांचं खंजिरी भजन ऐकल्यावर त्यांना "राष्ट्रसंत" ही उपाधी दिली. महिलोन्नती, देशासाठी व समाज उद्धारासाठी तरूणांच्या सामर्थ्याचा वापर, व्यसनाधीनतेचा विरोध अशा समाज कार्यात ते सहभागी होते. २३जुलै १९५५ ला जपान मध्ये भरलेल्या विश्वधर्म परिषदेसाठी तुकडोजींची निवड केली गेली. खंजिरी भजनाने जपानी लोकांनाही त्यांनी आनंद दिला. १९६२ मध्ये देशावर परचक्र आले असताना संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांबरोबर उत्तर सीमेवर गेले व सैनिकांना भाषणभजनाद्वारे धैर्य व नवचैतन्य निर्माण करण्याला मदत केली.

पुंडलिकनगरचे पुंडलिकबाबा त्यांना "इंडिया का बादशहा" म्हणायचे तर संत गाडगेबाबा ग्रामगीतेला ' भगवद्गीता' च समजत. प्राचीन संस्कृतीचे अभिमानी असूनही ते अद्ययावत दृष्टीकोन राखून होते. ह्रदय संताचे होते पण वृत्ती शूराची होती. हिंदू धर्म हा विश्वधर्म आहे अशी धारणा असलेल्या संत तुकडोजींना भारतीय संस्कृतीचा सार्थ भिमान होता.


"पाहून सौख्य माझे,
देवेंद्र तो ही लाजे,
शांती सदा विराजे,
या झोपडीत माझ्या"
असं सांगणारे संत तुकडोजी महाराज ११ ऑक्टोबर १९६८ रोजी ब्रम्हलीन झाले.

संत तुकडोजी महाराजांनी रचलेलं " भाग्यवंता घरी भजन पूजन " अभंग ऐकण्यासाठी लिंक क्लीक करा 


ज्योती कुलकर्णी





No comments:

Post a Comment