नामसंकीर्तन:निळोबाराय


येथ तुजलागी बोलविले कोणी।
प्रार्थिल्या वाचुनी आलासी का॥
प्रल्हादा कैवारी दैत्याते दंडाया।
स्तंभी देवराया प्रकटोनी॥
तैसे मज नाही बा संकट।
तरी का फुकट श्रम केले।
"निळा"म्हणे आम्ही नोळखूच देवा।
'तुकयाचा' धावा करितसे॥

तुकाराम महाराजांसारख्या परखड संताकडून अनुग्रह किंवा गुरूमंत्र घेण्याचा आग्रह धरणारे "निळोबाराय पिंपळनेरकर" अत्यंत परखड वृत्तीचे संत होते. तुकोबांचा मुलगा नारायणबुवा यांच्याकडून त्यांची महती ऐकल्यावर फक्त तुकोबांकडूनच अनुग्रह घेईन हा निश्चय निळोबारायांनी केला.
वास्तविक त्या वेळी तुकारामांचे वैकुंठगमन झाले  होते. तरीही हा हट्ट कायम ठेवून अखंड साधना सुरू केली. ४१ दिवसांनंतर देवाने स्वप्नात दर्शन दिले.
पण गुरू भक्ती/ श्रद्धा इतकी की प्रत्यक्ष देवाला तुम्ही का आलात? आम्ही तुकाराम महाराजांचा धावा करत आहोत असे ते परखडपणे म्हणाले. अर्थात त्यांची गुरूनिष्ठा बघून देवाने तुकोबांना दर्शन देण्यास सांगितले. स्वप्नातच तुकोबांनी अनुग्रह देन आपली तुळशीची माळ निळोबारायांना घातली व आता 'पंचोत्री' अभंगांची रचना करावी हा विचार सुचवला.

१६७६ मध्ये निळोबारायांचा जन्म झाला. शिरूर गावातील शिवभक्त मुकुंदपंत मकाशिर आणि सात्विक राधाबाई यांच्या पोटी दोन तपांनंतर साकडं घातल्यावर जन्म झाला. नीळकंठ नामकरण करण्यात आले पण निळोबाराय हेच नाव प्रसिद्ध झाले. अवघ्या ३ वर्षात बोबड्या बोलात रूद्र म्हणू लागलेल्या निळोबारायांची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती कमालीची होती. ५ व्या वर्षानंतर मुंज झाली आणि भावार्थ रामायण, नाथ भागवत, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ स्वहस्ताक्षरात नकलून काढले. शेषाचार्यांकडून संस्कृत शिकले. पंतकाकांकडून 'कुळकर्णी' कामकाज शिकले. प्रपंच ही नेटका केला पण हरिभक्तीत व्यत्यय आणणारं कुळकर्णीपणच नव्हे तर कुठलंच काम करायचं नाही असं ठरवून त्यांनी सर्व दप्तर पिराजी पाटलाकडे सुपूर्द करून पारनेरास प्रस्थान केले. 
तिथल्या "नागेश्वर" देवळात पुजारीपण स्विकारले. नित्य पूजाअर्चा, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण करताना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली. पौषातील सुमूहूर्तावर पंढरीस निघाले. पंढरपुरास पोचताच वृत्ती प्रफुल्लित होऊन काव्य पंक्ती स्फुरल्या. पांडुरंगाच्या चरणी प्रेमाश्रू अर्पण करीत 'सुकुमार साजिरे ध्यान। धरीले जघन दोन्ही करी॥ ' अभंग रचना झाली. पंढरपुरी ८ दिवस राहिल्यावर ते आळंदीस गेले व नंतर देहू येथे तुकोबांच्या कुटुंबियांच्या सहवासात ४० दिवस राहिले. तेव्हाच तुकोबांचा शिष्यत्व पत्करून त्यांचे स्वप्नोपदिष्ट शिष्य झाले. निळोबारायांनंतर होऊन गेलेल्या कोणत्याही कवीचे अभंग वारकरी कीर्तनात उद् धृत केले जात नाहीत यावरून वारकरी परंपरेतील या अखेरच्या संताचं महत्व किंवा अधिकार लक्षात येण्यास हरकत नाही.
निळोबारायांनी १२०० काव्य पंक्ती केल्या. त्यांच्या गौळणी व विरहिण्या विशेष गोड आहेत.

'सुखे करावे भोजन।
गाता गुण हरीचे॥
ल्यावे लेणे अलंकार।
असावे सादर हरिकथे॥
यथाविधी भोगिता भोग।
हृदयी पांडुरंग आठवावा।
'निळा' म्हणे न लिंपे कर्मा।
हरिनामधर्मा अवलंबिता॥

हरीचे गुण गाता गाता भोजन करावे. उत्तम म्हणजे नैतिक व्यवहाराने धन मिळवावे. त्याची उधळमाधळ न करता मितव्ययी रहावे, पण याचा अर्थ स्वतःची उपेक्षा करावी असे नाही. धर्माचे पालन करताना, देवाची भक्ती करताना योग्य आहारही आवश्यक आहे. कीर्तनाला जाताना देखिल गबाळेपणाने न जाता समारंभात जातात तसं नीटनेटकेपणाने, टापटीपीने जावे.
"विधीने सेवन, विषय त्यागाते समान" अशा पद्धतीने केलेलं कर्म कर्त्याला बाधत नाही. यालाच निळोबाराय हरिनामधर्म म्हणतात. हाच गीता - ज्ञानेश्वरीने सांगितलेला भागवत धर्म.

"होईल अंगी बळ। तरी फजित करावे ते खळ॥
जे का करूनिया पाखांड। लटिकेचि वाढविती बंड॥
भोंदिती भाविका। कथुनि परमार्थ तो लटिका॥
"निळा"म्हणे तोंडे सांगे। तैसे नाचरोनिया अंगे॥

अंगात बळ असेल तर तटस्थ न बसता खळांची फजिती करावी. विनाकारण लोकांना त्रास देणारे, त्यांच्या सौजन्याचा, भाबडेपणाचा गैर फायदा घेणारे यांना धडा शिकवावा. कर्म, ज्ञान आणि उपासना या ३ कांडामध्ये उपासनेला सर्वाधिक महत्व आहे. पण जे पाखंडी/ज्ञानी फक्त ज्ञानाला प्राधान्य देतात किंवा ज्ञानाच्या नावाखाली कर्माचा त्याग करायला सांगून भक्तीचे खंडन करतात, जे भोंदू, भाविकांच्या भाबड्या श्रद्धेचा गैरवापर करून खोटा परमार्थ सांगतात अशा सर्वांची फजिती करावी असं निळोबाराय परखडपणे मांडतात.
आयुष्याच्या अखेरीस भक्तांच्या आग्रहाखातर ते पिंपळनेरास राहावयास आले आणि 'पिंपळनेरकर' झाले. परमेश्वराच्या कीर्तनात, अभंग रचना करण्यात, नामस्मरणात दिवस सुखासमाधानात जात होते. वय परत्वे आपण पंढरीस जावू शकणार नाही म्हणून निळोबारायांनी पांडुरंगास साकडे घातले. " देवा, मला तुझ्या चरणी विलीन कर नाहीतर माझ्या गावी पिंपळनेरास ये" असे सांगितले. भगवंतांनी दृष्टांत दिला की, मी भीमा नदीच्या काठी तळेगावजवळ विठ्ठलवाडी डोहात आलो आहे. तेथून घेऊन जा"
त्या दृष्टांताप्रमाणे निळोबारायांनी भुलोजी पाटील आणि भक्तगण यांच्या समवेत तेथे जान डोहातून ' विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती पालखीतून पिंपळनेरास आणली. प्रतिष्ठापना होऊन मंदिर देखील बांधण्यात आले. स्वयंभू मूर्ती असल्याने पिंपळनेरास 'प्रति पंढरपूर" म्हणून ओळखले जाऊ लागले.

१७५३ च्या माही अमावस्येला वयोमानानुसार अवस्था गंभीर झाली. फाल्गून शुध्द प्रतिपदेला ' श्री हरी' चा त्रिवार उच्चार करीत निळोबारायांनी देह ठेवला. निळोबारायांच्या समाधी स्थानाचा शासनाने 'तीर्थक्षेत्र' म्हणून गौरव करत त्यांच्या कार्याची यथोचित.पावतीच दिली आहे.

"तुकोबाची अमृतवाणी भजन लिंक" 

ज्योती कुलकर्णी 


No comments:

Post a Comment