नरभक्षक कोरोना !

लॉकडाऊनच्या काळात वाचन हा एक मोठा आधार असतो. त्यातही हलकं-फुलकं वाचलं की अजून छान वाटतं. जिम कॉर्बेटच्या शिकारकथा वाचताना आपण त्या काळात हरवून जातो. यातल्या एका कथेत कॉर्बेट लिहितो की नरभक्षकाची एवढी दहशत होती की लोक दिवसेंदिवस काम धंदा सोडून घरात बसू लागले. कोणी चुकार जर बाहेर पडला तर तो सहजी नरभक्षकाच्या तावडीत सापडायचा.



आजच्या काळाला हे किती समर्पक वाटते. आजही अगदी अशीच परिस्थिती आलीये. आणि अदृश्य रूपातला नरभक्षक बाहेर फिरतोय. फिरू नकाघरात बसा आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करा असा कितीही धोशा सरकार आणि  पोलिसांकडून लावला गेला तरी असेही काही थोर महाभाग असतात जे ‘काहीं नाही होत...’, किंवा ‘इथेच तर जाऊन येतोय.’ अशी अक्कल वापरून सहजगत्या बाहेर उनाडत असतात.

असेच एक आजोबा जवळच राहणाऱ्या मुलाकडे वारंवार जायचे. त्यांची नातवंडे पण काका-काकूंकडे सारखी जायची. आसपासच्या लोकांनी सांगूनही नुसते ‘हो हो’ म्हणून त्यांचे उंडारणे सुरूच होते. आजोबांना दोन मुले. जवळजवळ राहणारी. प्रत्येकाचे चौकोनी कुटुंब. सुट्ट्या लागल्यासारख्या उनाडक्या सुरु होत्या. घरात जुनं दुखणं असलेली आजी आहेया संसर्गाच्या काळात हिंडू नये एवढी अक्कलसुद्धा या मंडळींना नव्हती. अदृश्य नरभक्षक परिसरात फिरत होताच. एके दिवशी आजींना बरे नाही म्हणून खासगी रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी त्यांना  कोरोनाचे निदान झाले. लगेच रवानगी नायडू रुग्णालयात. सरकारी यंत्रणा तपासणीला आल्या.

आजींच्या घरातल्या सगळ्यांच्या चाचण्या केल्या. हिंडणारे आजोबा आणि त्यांची सून पॉझिटीव्ह आले. आता मात्र यंत्रणा खडबडून कामाला लागल्या. आजोबा आणि सुनेचे रुग्णालयात विलगीकरण केलेत्यांचे राहते घर सील केलेसोसायटीची दारे बंद केली. सर्वत्र औषधे फवारली. आजोबांच्या दुसऱ्या मुलाची इमारतपण औषधाने धुवून काढली. सगळे मुलगा आणि नातवंडे दुसऱ्या मुलाकडे राहायला गेले. सगळीकडे काळजीचे वातावरण. दुसरीकडे राहायला गेल्यावर पण आजोबांच्या मुलाचे उंडारणे अधूनमधून सुरूच! सांगूनही ऐकेनात. इमारतीतले लोक वैतागले. पोलिसांनाआरोग्य अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांनी मग येऊन ‘सभ्य’ शब्दात समज दिली. आणि दुसऱ्याच दिवशी आजींचे पुण्य संपले. त्यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. घरी आणूच देत नाहीत. आजींच्या फक्त दोन मुलांना दर्शन घेऊ दिले. कागदपत्रांची पूर्तता केली आणि सरकारतर्फे अंत्यसंस्कार झाले. आता मात्र सन्नाटा. सगळेच सुन्न झाले. 



उंडारण्याची किंमत आजीच्या रूपाने मोजायला लागली. अजून काही दिवसांनी आजोबासून घरी येतील. पुढे काही दिवसांनी विषाणू प्रसार थांबेल आणि जग सुरळीत सुरु होईल. पण सांगूनही न ऐकल्यामुळे घरातल्या एका व्यक्तीचा जीव मात्र हकनाक गेला. जी व्यक्ती बाहेरही पडत नव्हती अशा व्यक्तीला आपल्याच माणसांच्या हट्टीपणाचा फटका बसला.

कॉर्बेट ९० वर्षांपूर्वी हेच सांगत होता. तुम्ही घरात बसामी बंदूक घेऊन बाहेर उभा आहे. अदृश्य नरभक्षक वेळजातपंथधर्म पाहून येत नाही. आजही तेच लागू आहे. जो चुकला तो संपला या नात्याने नरभक्षकाने झडप घातली. कोरोना असा येऊन गेला. आजींना घेऊन गेला. आता तरी लोकांनी शहाणे व्हावे. घरातच थांबाल तर सुरक्षित रहाल.
(ही सत्यघटना आहे.)


विनीत बापट



No comments:

Post a Comment