अहवाल
भारतीय संस्कृतीत आपण नद्यांना पवित्र मानतो. नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे
पापक्षालन होते असे मानतात तर नदीची परिक्रमा करण्याची देखील प्रथा आहे. रमेश व
वर्षा संगमनेरकर आणि अभिजित व मीनल टोणगांवकर या मित्रमंडळ सदस्यांनी यशस्वी
नर्मदा परिक्रमा केली. तेव्हा त्यांच्या अनुभवांचा लाभ इतरांना व्हावा या हेतूने
मित्रमंडळाने त्यांची ऑनलाईन मुलाखत आयोजित केली होती. स्वप्ना सोमण यांनी
मित्रमंडळाच्या वतीने त्यांची मुलाखत घेतली.
अभिजित व मीनल यांनी २८०० किलोमीटर्सची नर्मदा परिक्रमा १०३ दिवत संपूर्ण चालत पूर्ण केली. मागे कैलास यात्रा देखील त्यांनी तीन आठवड्यात चालून पूर्ण केली होती. परंतु जवळजवळ साडे तीन - चार महीने घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेणे कठीण होते. रमेशकाका आणि वर्षाकाकू यांनी बसने नर्मदा परिक्रमा १६ दिवसात पूर्ण केली. निवृत्तीनंतर गिरनार यात्रा, कर्दळीवन यात्रा अशा कठीण यात्रा पूर्ण केल्यावर त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. चालत किंवा बसने परिक्रमा केल्यास त्याचा मार्ग कसा असतो ते त्यांनी विषद करून सांगितले.
नर्मदा परिक्रमा, ही उचलायची असते हे
नव्यानेच कळले. बरे, परिक्रमेला चालायला सुरुवात कधी करावी,
बरोबर काय काय गोष्टी असणे आवश्यक आहे, पोशाख
कसा असावा, दंडाचे महत्त्व काय असते अशा बऱ्याच गोष्टी
कळल्या. जिथे वाटेत रात्री मुक्काम करायचा तिथले आश्रम, डोक्यावर
फक्त छप्पर असले की झाले अशा मानसिकतेपर्यंतचा प्रवास, एक
बाई म्हणून काय काय गोष्टींना सामोरे जायला लागले ते मीनल यांनी सांगितले. दिवसभर
२५-२७ किलोमीटर्स चालून दमल्यावर कधी कधी सदाव्रत घेताना दगड, सरपण गोळा करून, चूल मांडून, ती
पेटवून मग स्वयंपाक करणे, पहाटे चार वाजता इतर कुणी उठायच्या
आत गार पाण्याने आंघोळ उरकून घेणे असे अनेक अनुभव सांगितले. लोकांनी भरपूर प्रेम
दिले. परिक्रमावासी म्हणून लाडही केले. अभिजित म्हणाले की, कायम
आपण दात्याच्या भूमिकेत आयुष्य जगलेले असतो पण परिक्रमेत
कायम घेत असतो, याचक बनतो. लोक आपल्याला नव्हे तर नर्मदा
मैयासाठी देतात. अगदी ५ रुपये, पपई, विडी,
शाल असे जे काही देतील ते घ्यायचे असते, नाही
म्हणायचे नाही. आपणहून काही मागायचे नाही. अनेक लोकांशी नाती जुळली. रस्ता चुकलो
तरी मैया रस्ता दाखविते. भैरवबाबा म्हणजे एखादा कुत्रा
आपल्याला साथ देतो.
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!
मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
Interview on Narmada Parikrama
‘दोन बुद्धीवाद्यांची नर्मदा परिक्रमा’ e-book - अभिजित टोणगांवकर
पुस्तक वाचण्यासाठी इथे क्लिक करा:
दोन बुद्धीवाद्यांची नर्मदा परिक्रमा
‘नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा एक
अनुभूति’ e-book: वर्षा संगमनेरकर
पुस्तक वाचण्यासाठी इथे क्लिक करा:
नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा एक अनुभूति
रुपाली गोखले
No comments:
Post a Comment