निवांत


स्त्री जीवनातील कठीण काळाबद्दल थोडेसे ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या जीवनातला एक कठीण काळ. काहीजणींना खूप वेदनातूनही जावे लागते.
तर काहीजणींना फक्त शारीरिक नाही तर मानसिक बदलांना, त्रासांनाही सामोरे जावे लागते.
शेवटी आपण ह्या बदलांना कसे सामोरे जायचे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असते.
आपल्या एका मैत्रिणीने केलेली ही अतिशय सकारात्मक कविता. बघा आवडतेय का?



एक होते अबोध, बालिश वय,
रंगीबेरंगी स्वच्छंद, मुक्त, अवखळ,
अवचित एकच रंग होऊ लागला गडद,
तो होता आरक्त जास्वंदी,घेऊन एक मळभ!

मन बावचळले, शरीर अडखळले,
आणि उन्मुक्तपणे बहारास लागले,
या लालीचे पुढील वर्षांत मग,
अनेक उत्सवी सोहळे घडले!

जगण्यास लाभला अर्थ,
जाणले सृष्टीचे गर्भ,
चुकवले नेमाने निर्मितीचे देणे,
शारीरधर्माचे येणेजाणे!

आताशा तो रंग निरोप घेऊ म्हणतो,
जाता जाता अंमळ ज्यादाच छळतो,
विचार करून शिणले,
चित्त थोडेसे हरले!

उगवली एक आशेची सकाळ,
झुगारल्या शंका नि कुविचार,
आरशाशी हिशोब मांडला,
उजळले रूप, बदलले बरेच फार,

फिटत राहील निवांत निवृत्तीचे देणे,
नको वृथा काळजी, भ्रांत,
नित्य जगण्याचा मनवू आनंद,
आता राहणे निव्वळ शांत, निवांत!!!

अनिता मराठे

No comments:

Post a Comment