ओळख हिंदी साहित्याची - भाग ८


 हरिशंकर परसाई

कोणत्याही भाषेतील साहित्यामध्ये वैचारिक, हलक्या-फुलक्या, मनोरंजक साहित्याबरोबरच व्यंग्यसाहित्य ही तितकेच महत्वाचे असते. अशा रचनांचा वाचकवर्ग बर्‍याचदा मर्यादित आणि थोडा गंभीर प्रकृतीकडे झुकणारा असतो. समाजातल्या प्रसिद्ध व्यक्तिंच्या गुण-दोषांवर हसत-हसत बोट ठेवणे, कोणालाही न दुखावता त्यावर भाष्य करणे हेच व्यंग्य साहित्यकाराचे मुख्य काम आहे. ‘हरिशंकर परसाई’ हे असेच एक हिंदी व्यंग्य साहित्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व. व्यंग्यलेखनाला साहित्य प्रकाराचा दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.


१९२४ साली जन्मलेल्या हरिशंकर परसाई यांनी मुखत: व्यंग्य कथा आणि कादंबर्‍या लिहिल्या. त्यांचे व्यंग्यलेख ही तितकेच प्रसिद्ध आहेत. हरिशंकरजींच्या कित्येक कथा शालेय तसेच कॉलेजच्या अभ्यासक्रमात लावल्या गेल्या आहेत. त्यांचे लेखन फक्त हसवतच नाही तर समाजातील चुकीच्या रूढी-परंपरा, समाज धुरिणांनी सरसहा चालवलेली सामान्य जनतेची पिळवणूक आणि त्याबद्दल अनभिज्ञ असलेली जनता यांचेही दर्शन घडवते. ‘भोलाराम का जीव’, ‘सदाचार का ताबीज़’, ‘ठिठुरता हुआ गणतंत्र’ असे त्यांचे गाजलेले कथासंग्रह, लेखसंग्रह आहेत.

 

‘विकलांग श्रद्धा का दौर’ या लेख संग्रहासाठी त्यांना १९८२ मध्ये साहित्य अकादमी  पुरस्कार मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकूण कथा संग्रह, कादंबर्‍या आणि तब्बल १८ लेख संग्रह लिहिणार्‍या परसाईजींना त्यांच्या आयुष्यात फक्त हा एकच पुरस्कार मिळालेला आहे. खूप आवडीने वाचले जाणारे, समाजातील सर्व थरातील लोकांना एकाच पातळीवर आणणारे पण मान-सन्मानांपासून दुर्लक्षित म्हणजे व्यंग्यसाहित्य होय. म्हणूनच की काय हरिशंकर परसाईंना आजही मुख्य लेखकांमध्ये गणले जात नाही किंवा पुरस्कारांची पखरण त्यांच्यावर झाली नाही.

 

विविध विषयांची आवड असणार्‍या आणि सामाजिक प्रश्नांचे भान असणार्‍या वाचकांनी आवर्जून वाचावे असेच त्यांचे लेखन आहे.


मानसी नाईक




 

No comments:

Post a Comment