ओळख हिंदी साहित्यविश्वाची

 





धर्मवीर भारती

‘धर्मयुग’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी साप्ताहिकाचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले संपादक म्हणून ‘धर्मवीर भारती’ यांना संपूर्ण देश ओळखतो. पण यापलीकडे त्यांचे स्वत:चे एक विस्तृत साहित्य जगत देखील आहे. त्यांचीच आज आपण ओळख करून घेणार आहोत.




१९२६ साली जन्मलेल्या धर्मवीर भारतींनी स्वातंत्र्य चळवळ अर्थातच जवळून पाहिली तसेच बेचाळीसच्या आंदोलनात सक्रिय सहभाग ही घेतला. १९४७ सालीच ते प्रयाग विश्वविद्यालयातून एम.ए. आणि पुढे सिद्ध साहित्यावर संशोधन करून पी.एच.डी. झाले. याच दरम्यान कधीतरी त्यांच्या स्वतंत्रपणे लेखनाला ही सुरुवात झाली होती. भारतीजींचा पहिला कथासंग्रह १९४६ ला प्रकाशित झाला होता. तेव्हापासून १९९४ ला प्रकाशित झालेले त्यांचे यात्रा संस्मरण ‘यात्राचक्र’ पर्यंत ते अखंड लिहित होते. साहित्य क्षेत्रातील असा एकही प्रकार नाही जो भारतीजींनी  हाताळलेला नाही. कथा, कविता, कादंबरी, निबंध, रिपोर्टस, समीक्षा, नाटक, अनुवाद, संस्मरण, शोध निबंध अशा सर्व साहित्यप्रकारांवर त्यांची विलक्षण पकड होती.

‘गुनाहों का देवता’(१९४९) ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी. पुढे त्यावर चित्रपट आणि अगदी अलीकडेच एका मालिकेची देखील निर्मिती झाली. सकस कथाबीजामुळे ‘गुनाहों का देवता’ ही साहित्यकृती आजही वाचकांवर आपला प्रभाव टिकवून आहे. ‘सूरज का सातवाँ घोडा’ (१९५२) या कादंबरीवर देखील चित्रपटनिर्मिती झाली आहे. त्यांचे सुप्रसिद्ध नाटक ‘अंधायुग’ एक वेगळ्या स्तरावरील नाट्य-काव्यप्रकार समजला जातो. महाभारताचे युद्ध संपल्यावर पुढे काय झाले? हे ‘अंधायुग’ चे मूळ कथानक आहे. परंतु त्यातील पात्रांच्या तोंडी असलेले काव्यमय संवाद कोणत्याही काळातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत. त्यामुळेच की काय ‘अंधायुग’ १९५४ सालची रचना असून देखील आजही आवडीने वाचले जाते आणि त्याचे नाट्यप्रयोगही होतात. भारतीजींचे गाजलेले यात्रा संस्मरण ‘यात्राचक्र’ हे १९७२ सालच्या पाकिस्तान-बांगलादेश युद्धात भारताने बांगलादेशाला जी मदत केली आणि पाकिस्तानचा पराभव केला त्याचा आँखो देखा हाल आहे. रिपोर्टिंग प्रकारातील हे लिखाण असूनही भारतीजींच्या लेखन कलेतील हातोटीमुळे संपूर्ण पुस्तक कुठेही कंटाळवाणे, नीरस होत नाही. एकूण १९७२-७३ ला गोष्टी जशा घडल्या तशाच ‘यात्राचक्र’ मध्ये वाचायला मिळतात, म्हणूनच त्याला ऐतिहासिक दस्तावेजाचे महत्व आहे.

अत्यंत गरीबीतून वर येऊन स्वत:च्या जिद्दीने आणि अंगभूत प्रतिभेच्या जोरावर धर्मवीर भारतींनी आपले पी.एच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हिंदी साहित्यक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड असणार्‍या प्रत्येकाने भाषेचा अडसर दूर सारून भारतीजींची पुस्तके जरूर वाचावीत.

*धर्मवीर भारतींची बहुतेक सर्व पुस्तके अमेझॅान तसेच हिंदी प्रकाशनांच्या वेबसाईटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच ती वाचनालयाच्या हिंदी विभागात देखील मिळू शकतात.*



मानसी नाईक




No comments:

Post a Comment