ओळख हिंदी साहित्यविश्वाची



 


निर्मल वर्मा

हिंदी साहित्यातील अत्यंत संवेदनशील लेखक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे निर्मल वर्मा. हिंदी कथा, कादंबर्‍यांना एक वेगळी दिशा देणारे निर्मल जी त्यांच्या हयातीतच ‘क्लासिक’ लेखक म्हणून ओळखले जात होते. असा गौरव फार कमी जणांना प्राप्त होतो.



         शिमला येथे १९२९ साली जन्मलेल्या निर्मलजींचे वडील तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या सिविल सर्विसेस मध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून अभिजात्यतेचे संस्कार झालेल्या निर्मलजींनी त्यांच्या लेखनातून मानवी जीवन अनेक कंगोरे आणि त्यातील विविध स्तरांवरील संवेदनशीलता प्रभावीपणे उलगडून दाखवली.

         ‘परींदे’ हा त्यांचा १९५९ साली प्रकाशित झालेला कथासंग्रह हिंदी वाङमयात नवीन चळवळ आणणारा ठरला. एका ठराविक साच्यातून जाणारी आणि बहुतेकदा काल्पनिक विश्वात रमणारी हिंदी कथा आता वास्तविक जीवनाचे रंग दाखवू लागली. ‘नई कहानी’ अर्थात नवीन कथा हिंदी वाङमयातील मैलाचा दगड समजली जाते, जो ठेवण्याचे श्रेय निर्मल वर्मा यांचे आहे. निर्मलजीं ची चिंतन क्षमता, त्यांची संपूर्ण सृजन प्रक्रिया या गोष्टी इतरांच्या अभ्यासाचा विषय होता. अफाट हिंदी, इंग्रजी वाचनाने आलेले बहुश्रुतता तसेच प्रत्येक गोष्टीचा अतिशय खोलवर विचार करण्याची सवय यामुळे निर्मलजींचे लेखन विद्वत्ताजड असल्याचा भास होतो. परंतु त्यांच्या साहित्याचे अधिकाधिक वाचन केल्यास त्यातील आशयघनता पाहून थक्क व्हायला होते. निर्मलजींच्यासाहित्यात फक्त परस्पर मानवी संबंधांचे विविध आयामच नाहीत तर बदलत्या समाजातील नवीन माणसाची सामाजिक, राजनैतिक भूमिका कशी असावी, झपाट्याने होत चाललेल्या आधुनिकीकरणात ‘मनुष्य’ ह्या आदिम संस्कृतीचे वहन करताना आपले आदर्श काय असावेत यावरही त्यांनी विचार केलेला दिसतो.

         एका जागी जास्त दिवस राहिल्यामुळे येणारी विषण्णता टाळण्यासाठी निर्मलजी सतत वेगवेगळ्या ठिकाणी रहात, आपला अधिकाधिक वेळ ते प्रवासात घालवत. अर्थातच प्रवासामुळे अनेक नवीन ठिकाणांना भेटी देणे आणि तिथली खरी परिस्थिती समजून घेऊन त्याबद्दल लिहिणे हे ओघानेच आले. तरीही मानसिक विषण्णता हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव दिसतो. ‘धुन्ध से उठती धुन’ या त्यांच्या डायरीवजा संस्मरणात त्यांनी भेट दिलेल्या सिंगरौली, प्रयाग, मणिपुर-नागालैंड, मॉस्को-बुडापेस्ट अशा अनेक जागांची संवेदनशील वर्णने वाचावयास मिळतात.

         निर्मलजींना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार(१९८५), ज्ञानपीठ पुरस्कार(१९९९), पद्मभूषण(२००२) असे अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्याचवर्षी भारत सरकारने त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले होते.

विविध विषयांची आवड असणार्‍या वाचकांने निर्मल वर्मांची पुस्तके मिळवून जरूर वाचावीत. एक वेगळा अनुभव येईल.

* निर्मल वर्मा यांची वे दिन, धुन्ध से उठती धुन, कव्वे और काला पानी, लाल टीन की छत इत्यादी अनेक पुस्तके अमेजॉन, फ्लीपकार्ट तसेच विविध प्रकाशनांच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.तसेच ती वाचनालयाच्या हिंदी विभागात देखील मिळू शकतात.* 


मानसी नाईक





No comments:

Post a Comment