मुक्तिबोध
गजानन माधव मुक्तिबोध हे मध्य
प्रदेशातील. त्यांचा जन्म, आयुष्यभर हिंदी क्षेत्रातील वास्तव्य आणि
हिंदी साहित्यिक रचना यांमुळे प्रसिद्ध पावलेले एक मराठी व्यक्तिमत्व. अनेक
दशकांपूर्वी मध्यप्रदेशात स्थायिक झालेल्या मराठी जनतेतील एक. ‘मुक्तिबोध’ यांचा
जन्म १९१७ साली आणि मृत्यू १९६४ साली झाला. उण्यापुर्या ४७ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी
निर्माण केलेली ग्रंथसंपदा थक्क करणारी आहे.
ब्रह्मराक्षस, चाँद का मुँह टेढ़ा
है, भूरी भूरी खाक धूल हे कविता संग्रह, काठ का सपना, सतह से उठता आदमी हे कथासंग्रह अनेक
निबंध, कादंबर्या आणि समीक्षा लिहिणारे ‘मुक्तिबोध’ हिंदी
साहित्य क्षेत्रात सुप्रसिद्ध आहेत. जयशंकर प्रसाद यांची प्रसिद्ध दीर्घकविता
‘कामायनी’ वर लिहिलेल्या समीक्षात्मक पुस्तक ‘कामायनी-एक पुनर्विचार’ ने त्यांना
साहित्य भारती पुरस्कार ही मिळवून दिला. हिंदी मधील गाजलेल्या ‘नई कविता’ आणि
‘तारसप्तक’ या काव्यचळवळींचे आधारस्तंभ म्हणून ही त्यांना ओळखले जाते.
मुक्तिबोधांची स्वत:ची ‘अँधेरे में’ ही दीर्घकविता मनुष्य जीवनाचे अनंत कंगोरे
दाखवणारी आशयघन कविता आहे. साहित्याचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आजही
अनाकलनीय अशी ही कविता मुक्तिबोधांनी आपल्या तारूण्यावस्थेतच लिहिली होती.
अशी अफाट रचनाक्षमता असणारे
‘मुक्तिबोध’ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र सतत आर्थिक, शारीरिक विवंचनांनी ग्रासलेले होते. रोजच्या
जेवणाची ही भ्रांत पडावी अशी कित्येक वर्षे त्यांनी काढली. वयाच्या बाविसाव्या
वर्षी त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. त्याकाळी त्यांनी
चरितार्थासाठी अनेक लहान-सहान नोकर्या केल्या. त्यांचा संसार सततच ओढग्रस्तीचा
राहिला. अतिशय संवेदनशील मनाचा हा लेखक जगण्याच्या धडपडीमुळे पूर्णवेळ साहित्य
रचना करू शकत नव्हता. तरीही दररोज ते काही ना काही लिहित असत. परंतु त्यांनी
लिहिलेले प्रगतिशील,
परिवर्तनशील साहित्य स्वीकारून ते प्रकाशित करायला एकही प्रकाशक
तयार नव्हता. एकूणच त्यांचे लेखन गंभीर प्रकृतीचे आणि काळाच्या पुढे होते.
तत्कालीन समाजाच्या, वाचकांच्या बुद्धिला न पेलवणारे.
त्यामुळेच की काय मुक्तिबोधांनी आयुष्यभर केलेले लिखाण त्यांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या जवळच्या काही मित्रांनी क्रमा-क्रमाने प्रकाशित केले.
(आता समग्र मुक्तिबोध साहित्य सहजगत्या उपलब्ध आहे.)
मानसी नाईक
No comments:
Post a Comment