मन्नू भंडारी
हिंदी साहित्यक्षेत्रातील अत्यंत यशस्वी अशा स्त्री लेखिकांमध्ये एक अग्रगण्य नाव आहे मन्नू
भंडारी. यांचे मूळ नाव महेंद्रकुमारी होते, पण लेखनकार्यासाठी त्यांनी 'मन्नू' हे नाव निवडले. मन्नूजींच्या कथा आणि कादंबर्या या बहुतांश स्त्री केंद्रित आहेत. एक प्लेट सैलाब, मैं हार गई, तीन निगाहों की एक तस्वीर, यही सच है, त्रिशंकु, श्रेष्ठ कहानियाँ, आँखों देखा झूठ, नायक खलनायक विदूषक हे
त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. तसेच आपका बंटी, महाभोज, स्वामी, एक इंच मुस्कान, कलवा, एक कहानी यह भी या काही गाजलेल्या कादंबर्या आहेत.
‘आपका बंटी’ ही
कादंबरी तर लोकांना एवढी आवडली की प्रख्यात
मासिक ‘धर्मयुग’ मध्ये देखील ती क्रमश: प्रकाशित केली गेली. मन्नूजींनी रजनी, स्वामी, दर्पण, निर्मला अशा काही चित्रपटांसाठी पटकथा लेखन देखील केले. काही नाटके ही लिहिली. अशी
सर्वांगाने विकसित असलेल्या मन्नूजी वैयक्तिक आयुष्यात अतिशय साधेपणाने रहात असत.
त्यांचे पती राजेंद्र यादव हे देखील मोठे लेखक होते. पति-पत्नी दोघेही लेखक असताना, तसेच मन्नूजींची कॉलेजमधील प्राध्यापिकेची नोकरी
चालू असताना त्यांनी जे साहित्य निर्माण केले आहे त्यावरून त्यांच्या लेखनक्षेत्रातील
सहजतेचेच दर्शन होते.
त्यांना कधीही लिहिताना फार कष्ट करावे किंवा बहुतांश लेखकांना जावे लागते
त्या सृजनप्रक्रियेतून जावे लागले नाही. एखादा प्लॉट मनात आला की त्या कॉलेजमधील एखाद्या रिकाम्या तासात देखील कथा लिहू शकत. त्यासाठी त्यांना वेगळा वेळ द्यावा लागत नसे. या सहज
रचनाक्षमतेमुळेच की काय, मन्नूजींचे लिखाण सामान्य लोकांना अधिक जवळचे वाटते. भाषेचे अवडंबर, अनावश्यक शब्द, फार उच्च साहित्यिक भाषा असे काहीही त्यांच्या लेखनात
वाचावयास मिळत नाहीत. अगदी साध्या-सोप्या, बोलीभाषेत त्यांच्या कथा आहेत.
नुकतेच नोव्हेंबर २०२१मध्ये मन्नू भंडारी यांचे निधन झाले. नव्वद वर्षांच्या मन्नूजींनी आपल्या
आयुष्यात अनेक सामाजिक, राजकीय चढ-उतार बघितले, ज्यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात जागोजागी पहायला मिळते.
सुरुवातीच्या काळातील त्यांच्या रचनांमध्ये संसारात गुरफटलेल्या गृहिणीच्या मनाचे
आलेख पहावयास मिळतात. या स्त्रिया पती, मुले, संसार आणि सांसारिक जबाबदार्या याच परिघात फिरताना दिसतात. पण उत्तरोत्तर त्यांच्या कथा-कादंबर्यांची नायिका
भावनात्मक तसेच व्यावहारिक पातळीवर स्वतंत्र होत जाताना दिसते.
मन्नू भंडारी यांना त्यांच्या
लेखनासाठी हिन्दी अकादमी, दिल्ली
का शिखर सन्मान, बिहार सरकार, भारतीय
भाषा परिषद-कोलकाता, राजस्थान
संगीत नाटक अकादमी, व्यास सन्मान आणि उत्तर-प्रदेश हिंदी संस्थानकडून सन्मान, असे अनेक पुरस्कार आणि मान-सन्मान मिळाले आहेत. एकूणच 'मन्नू भंडारी' हे नाव
आपल्या रचनांमुळे हिंदी साहित्यविश्वात एका वेगळ्याच उंचीवर पोचले आहे.
No comments:
Post a Comment