जैनेन्द्र
जगातल्या प्रत्येक भाषेतील साहित्याचे ढोबळमानाने दोनच
प्रकार असतात गद्य आणि पद्य. पुढे या दोन मुख्य प्रकारांचे असंख्य उपप्रकार
जन्माला येतात. हिंदी साहित्यात देखील गद्य साहित्याची सुरुवात झाल्यावर खर्या अर्थाने
ज्याला ‘कथा’ म्हणता येईल असे लेखन बरेच उशीरा सुरू झाले. परंतु एकदा सुरुवात
झाल्यावर कथांमधेही अनेक प्रकार आले. तत्कालीन बहुतेक लेखकांनी स्वत:च्या
शैलीनुसार एक-एक नवीन कथाप्रकार जन्माला घातला. आज आपण ज्यांची ओळख करून घेणार
आहोत ते लेखक ‘जैनेन्द्र’ यांना 'मानसशास्त्रीय
कथांचे जनक' म्हणून ओळखले जाते. जगप्रसिद्ध
विचारवंत सिग्मंड फ्रॉईड यांनी मांडलेल्या मानवी मनाच्या सिद्धांताचा आजवर
अनेकांनी अनेक प्रकारे उहापोह केला आहे. पण जैनेन्द्रजींच्या लेखणीतून उतरलेल्या
अगणित कथांतून होणारे मानवी मनाचे विविध कंगोरे पाहताना आपणास त्यातील जटिलता अजिबात
जाणवत नाही.
१९०५ साली
ब्रिटीश राजवटीत जन्मलेल्या जैनेन्द्रजींनी अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून आपले
शिक्षण पूर्ण केले. काही काळ ते कॉन्ग्रेसच्या ‘असहयोग’ आंदोलनाशी ही संलग्न होते.
वेगवेगळ्या लहान-मोठ्या नोकर्या, व्यापार करत-करत शेवटी ते पूर्णवेळ लेखक बनले.
जैनेन्द्रजींच्या एकूण प्रकाशित ९ कादंबर्या आणि ८ कथासंग्रहांमधून आपल्याला
त्यांच्या मनोवैज्ञानिक विचारक्षमतेची जाणीव होते. त्यांच्या लेखनात घटनांवर कमी
परंतु पात्रांच्या त्या घटनेवरील प्रतिक्रियांवर अधिक भर दिलेला आढळतो. एखाद्या
लहानश्या घटनेवर कथेतील पात्रांच्या त्यांच्या स्वभावानुसार होणार्या प्रतिक्रिया
आणि त्यातून निर्माण होणारी कथा हे जैनेन्द्रजींच्या लेखनातील मुख्य सूत्र म्हणता
येईल. परख, त्यागपत्र, मुक्तिबोध अशा सुप्रसिद्ध कादंबर्या आणि वातायन, दो
चिड़ियाँ, पाजेब असे कित्येक वाचनीय कथासंग्रह त्यांनी लिहिले. विविध विषयांवरील
त्यांचे निबंध संग्रह देखील तितकेच प्रसिद्ध आहेत. काही अनुवादित साहित्य देखील
त्यांनी लिहिले तसेच दोन निबंध संग्रहांचे संपादन ही केले.
जैनेन्द्रजींना त्यांच्या
साहित्यसेवेबद्द्ल १९७१ मध्ये पद्मभूषण तसेच १९७९ मध्ये साहित्य अकदमी पुरस्कार
प्राप्त झालेला आहे. थोड्याश्या चाकोरीबाहेरच्या, वैचारीक वाचनाची आवड असणार्या
वाचकांनी जैनेन्द्रजींच्या कथा-कादंबर्या जरूर वाचाव्यात. नक्कीच एक वेगळा अनुभव
मिळेल.
मानसी नाईक
No comments:
Post a Comment