कृष्णा सोबती
हिंदी साहित्यावर स्वत:ची म्हणून एक
छाप उमटवणार्या काही मोजक्या स्त्री लेखिकांमधील एक म्हणजे कृष्णा सोबती. १९२५ साली तत्कालीन ब्रिटीश साम्राज्याचा
भाग असलेल्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या, कृष्णा सोबतींवर आयुष्यभर पंजाबी
संस्कृती आणि भारत-पाकिस्तान फाळणीमुळे झालेल्या मानसिक यातनांचा पगडा होता.
त्यांच्या बर्याचशा लेखनात तो वेळोवेळी व्यक्त ही झाला आहे. १९८०मध्ये त्यांच्या ‘ज़िंदगीनामा’ या
कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना साहित्य
अकादमीची फेलोशिप आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
त्यांच्या लेखनकाळात नेहमीच
त्यांच्यावर अतिशय कमी रचना करत असल्याचा आरोप होत असे. आपल्या ९४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १ कथासंग्रह, ६ दीर्घकथा, ५ कादंबर्या, ७ संस्मरण, एक यात्रा संस्मरण
आणि काही थोडी अनुवादित पुस्तके एवढीच निर्मिती केली. परंतु यातील प्रत्येक रचना
एक-एक मास्टरपीस म्हणावा अशी आहे. कृष्णाजींना स्वत:चे लेखन जोपर्यंत अगदी
त्यातल्या विराम चिन्हांसहित निर्दोष
वाटत नसे,
तोपर्यंत त्या ते छापायला पाठवत नसत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा
लेखनकाळ ३-४ वर्षांचा असे. त्या दरम्यान त्या स्वत:च लेखनाचे कित्येक ड्राफ़्ट बनवत आणि
नष्ट करत, या प्रक्रियेमुळे
अर्थातच त्यांच्या हातून कमी लिहिले जाई. पण शेवटी जे छापले जाई ते सर्वोत्तम
असे.
१९६६ मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी
‘मित्रो मरजानी’ विवाहीत स्त्रीच्या लैंगिक जीवनावर आधारित होती तर ‘ज़िंदगीनामा’
भारतातील गावागावांमध्ये
एकोप्याने राहत असलेल्या विविध धर्मीय लोकांवर आधारित होती. ‘ऐ लड़की’ या दीर्घकथेत
मरणाची वाट पहाणारी वृद्ध स्त्री स्वत:च्या जीवनाचा आलेख सांगताना आपल्याला भेटते
आणि ‘डार से बिछुड़ी’ मध्ये किशोरवयातच अनेक कडवट अनुभव लादले गेलेली पाशो भेटते. ज्या
काळात कृष्णा सोबती लेखिका म्हणून कार्यरत होत्या त्या काळात अशा चाकोरीबाह्य
विषयांवर, तेही एका स्त्रीने
लिहिणे ही खरोखरीच धाडसाची गोष्ट होती. त्यामुळेच की काय, सुरुवातीपासूनच त्यांचा वाचकवर्ग
उच्चभ्रू आणि मर्यादित राहिला. जरी त्यांचे लेखन वास्तववादी, हृदयस्पर्शी होते
तरी ते सामान्य वाचकांच्या सहज पचनी पडणारे नव्हते.
अशा वेगळ्या वाटेवरची ग्रंथसंपदा
निर्माण करणार्या कृष्णाजींनी वयाच्या ७०व्या वर्षी लग्न केले हाही एक
वेगळेपणाच. अनेक पुरस्कार आणि चोखंदळ वाचकांचे प्रेम मिळवणार्या कृष्णाजींचा
वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला. हिंदी साहित्याला एका निराळ्याच
परिमाणाने समृध्द करणार्या कृष्णा सोबती आपल्याला नेहमीच लक्षात राहतील.
*कृष्णा सोबती यांची
बहुतेक सर्व पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत*
मानसी नाईक
No comments:
Post a Comment