नागार्जुन
एकोणिसाव्या शतकाच्या चौथ्या-पाचव्या दशकात आपल्या
मुक्तछंदी किंवा गद्यकाव्याने हिंदी साहित्य जगताला मोहून टाकणारे कवी म्हणजे
नागार्जुन. हे मूळचे वैद्यनाथ मिश्र, परंतु हिंदी साहित्य रचनेला सुरूवात करतानाच
त्यांनी ‘नागार्जुन’ असे नाव धारण केले आणि पुढे तेच प्रसिद्ध झाले. १९११ साली जन्मलेल्या नागार्जुन यांनी
त्यांच्या ८७ वर्षांच्या आयुष्यात एकूण १४ काव्यसंग्रह, २ प्रबंध काव्य, ११ कादंबर्या, संस्मरण, कथासंग्रह, आलेख संग्रह, बाल-साहित्य
असे प्रचंड साहित्य निर्माण केले. मैथिली आणि बांगला भाषेतही त्यांनी निर्मिती केली.
उच्चभ्रू रसिकांचे तसेच सामान्य वाचकांचे सारखेच प्रेम लाभलेल्या नागार्जुनांच्या
साहित्यावर आज अनेकजण संशोधन करतात. संशोधन करावयास लावणारा त्यांच्या रचनांचा मुख्य
गुण म्हणजे विषयांचे वैविध्य.
नागार्जुनांच्या कवितांमध्ये जवळपास
संपूर्ण भारतीय काव्य परंपरा आढळते. त्यांचे काव्य भारतीय मातीशी निगडीत तरीही
आधुनिक आहे. सामान्य जनतेशी जवळीक आणि न्यायपूर्ण, समान समाजव्यवस्थेचे स्वप्न हा त्यांच्या
रचनांचा पाया आहे. मैथिली, हिंदी, संस्कृत
या मुख्य भाषांव्यतिरिक्त पाली, प्राकृत, बांगला,
सिंहली, तिबेटी इत्यादी भाषांवरही त्यांची पकड
होती.
कवी नागार्जुन यांच्या ‘अकाल और उसके बाद’, ‘शासन की बंदूक’, ‘बादल को घिरते देखा है’, ‘खुरदरे पैर’, ‘दंतुरित मुस्कान’ यासारख्या एक-एक कविता म्हणजे मास्टरपीस समजल्या जातात. सरळ, सोपी, ओघवती शब्दरचना, पण सोबतच अतिशय खोल अर्थ ही त्यांच्या कवितांची खासियत आहे. सहज बसल्या-बसल्या समोर दिसणार्या दृष्यांवर नागर्जुनांची कविता तयार होत असे. एकदा त्यांना एक मजूर अनवाणी सायकल चालवताना दिसला,
त्याच्या भेगाळलेल्या टाचा पाहून
त्यांना मजूरांचे कष्टदायी आयुष्य उलगडून दाखवणारी अजरामर कविता सुचली ती म्हणजे
‘खुरदरे पैर’.
नागार्जुन यांच्या साहित्याच्या सन्मानार्थ त्यांना साहित्य अकादमी, भारत-भारती पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप ही देण्यात आलेली आहे. साचेबद्ध कवितांपेक्षा वेगळ्या विषयांची आवड असणार्या वाचकांनी नागार्जुन यांचे साहित्य जरूर वाचावे. एक सभोवतालच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा अनुभव मिळेल.
(समग्र नागार्जुनसाहित्य सहजगत्या ऑनलाईन उपलब्ध आहे.)
मानसी
नाईक
No comments:
Post a Comment