काशीनाथ
सिंह
हिंदी साहित्या मध्ये संस्मरण साहित्य हा प्रकार नव्याने जन्माला आलेला. त्यामुळे या नवीन साहित्यप्रकाराला नवीन लेखकांनीच आपल्या लेखनाने समृद्ध केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . त्यांच्यापैकीच कथासंग्रह, कादंबरी, नाटक, समीक्षा आणि मुख्यत्वेकरून संस्मरण अशा सर्वच साहित्यप्रकारांना लीलया हाताळणारे लेखक म्हणजे काशीनाथ सिंह होत. बनारस जिल्ह्यातील जियनपुर या लहानशा गावात 1937 साली जन्मलेल्या काशीनाथ सिंह यांनी काशी हिन्दू विश्वविद्यालयातून हिंदी साहित्यात एम.ए., पी.एच.डी. करून मोठीच मजल मारली.
आयुष्यभर
हिंदी साहित्याचेच अध्यापन आणि लेखन त्यांनी केले. खरे तर काशीनाथ सिंहांचे मोठे
भाऊ नामवर सिंह हे त्यांच्या लेखन, राजकारण, डाव्या
विचारसरणीचा पुढाकार इत्यादी गोष्टींमुळे अधिक सुप्रसिद्ध आहेत. नामवर सिंहांसारखे
‘लार्जर दैन लाईफ़’ व्यक्तिमत्व प्रत्यक्ष घरात असताना काशीनाथजींचे व्यक्तिमत्व,
करिअर निश्चितच झाकोळले गेले असते. पण सुरुवातीपासूनच त्यांनी
स्वत:च्या लेखनावर इतर कोणाचाही प्रभाव पडू न देता स्वत:ची अशी एक स्वतंत्र शैली
निर्माण केली. त्यांचे आतापर्यंत अनेक कथासंग्रह, नाटके, समीक्षा,
कादंबर्या आणि असंख्य संस्मरणे प्रकाशित झाली आहेत.
‘काशी
का अस्सी’ ही त्यांची सर्वाधिक चर्चित कादंबरी आहे. काशीचा अस्सी घाट आणि त्याच्या
आसपासची संस्कृती एवढाच या कादंबरीचा मूळ विषय आहे, परंतु संपूर्ण मानवजातीतले स्वाभावविशेष तिथे
एकवटलेले दिसतात, आणि एका लहानश्या भूभागावर बेतलेल्या
कथानकात विश्वरूप दर्शन घडून जाते. ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट याच कादंबरीवर
आधारित आहे.
हिंदी भाषेवर असाधारण प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि
भाषेला प्रत्येक शब्दागणिक गिरक्या देत-देत व्यंगात्मक लिहिण्याची स्वतंत्र शैली
यामुळे काशीनाथजींनी लिहिलेली प्रत्येक रचना वाचक, समीक्षक,
संपादक तसेच त्यांचे समकालीन साहित्यिक सगळ्यांच्याच प्रशंसेला
पात्र ठरते.
‘लोग
बिस्तरों पर’, ‘सुबह का डर’, ‘आदमीनामा’,‘नई तारीख’,
‘पत्ता-पत्ता बूटा-बूटा’ असे त्यांचे अनेक गाजलेले कथासंग्रह आहेत
ज्यातून विविधरंगी मनुष्यस्वभावाचे आणि वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत वेगवेगळ्या
प्रकारे प्रतिसाद देणार्या पात्रांचे दर्शन घडते. काशीनथजींची प्रत्येक गोष्ट
वाचताना जणू ती आपल्या आसपास घडणारीच गोष्ट आहे असे वाटते, त्यामुळे
त्यांच्या कथा आदर्शवादी किंवा काल्पनिक न वाटता जास्त
नैसर्गिक आणि वास्तववादी वाटतात.
समृद्ध भाषेचा अनुभव घेण्यासाठी, तसेच सामाजिक कथांची आवड असणार्या
वाचकांनी वयाच्या 85 व्या वर्षी देखील वाचन-लेखनात गढून गेलेल्या या ऋषितुल्य
लेखकाचे साहित्य आवर्जून वाचावे असेच आहे.
No comments:
Post a Comment