पद्माताईंना आठवताना...


पद्माताईंची आणि माझी ओळख १९८५ पासूनची.हिल्या भेटीतच मला त्या खूप आवडल्या. त्या नेहमी सर्वांना खूप प्रोत्साहन देत असत, त्यामुळे काहीही केले की आधी त्यांना  दाखवायचे हे ठरलेले. कागदाची फुले करणे, क्रॉसस्टीच एम्ब्रॉयडरी वगैरे मी त्यांच्याकडून शिकले.

माझ्यापेक्षा माझी मुलगी त्यांच्याकडून खूप काही शिकली. तिला लहानपणी ड्राइंग खूप छान काढता येत होते, पण तिच्या अंगात पेशन्स नव्हता. मनासारखे नाही झाले तर ती कागद  चुरगळून फेकून देत असे. जेव्हा मी ही गोष्ट पद्माताईंना सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, माझ्याकडे पाठवून द्या तिला आणि ती शनिवार-रविवार त्यांच्याकडे जाऊ लागली. त्या तिच्याशी खूप गप्पा मारत आणि तिला शिकवीत असत. तेव्हापासून पद्माताई तिची मैत्रीणच झाल्या होत्या. त्यांनी तिच्यामधे पेशन्स आणि आवड दोन्ही निर्माण केले आणि आज तिच्याजवळ फाईन आर्टची डिग्री आहे.

अशा अनेक गोष्टी ती पद्माताईंकडून शिकली. आम्ही घर बांधत असताना त्यांनी तिला स्केल प्रमाणे मॉडेल करायला शिकवले आणि आमचे घर होण्यापूर्वीच तिचे मॉडेल तयार होते. त्यावरून आम्हाला आमच्या घर बांधण्यातील खूप चुका कळून आल्या.

पद्माताईंनी तिला शिकवलेले निसर्गचित्र तर खूपच छान होते. ते तिने अजूनही जपून ठेवले आहे.
ती जेव्हा दक्षिण अमेरिकेला गेली तेव्हा ती तेथुन तिचे अनुभव पद्माताईंना पाठवत असे. त्याचे मराठी भाषांतर पद्माताईंनी स.. वि. वि.मध्ये दिले होते. त्यांना तिचे खूप कौतुक होते.

एक दिवस मी त्यांच्याकडे जरा उशिरा गेले तेव्हा त्या म्हणाल्या, का हो,शीर का झाला?

मी म्हणाले, अहो, घरातली कामेच संपत नाहीत. तेव्हा त्या म्हणाल्या, एक लक्षात ठेवा - घर आपल्यासाठी आहे, आपण घरासाठी नाही. आणि ते मला खूप पटले. आजही घरातल्या कामामुळे उशीर होऊ लागला तर मला त्यांचे ते वाक्य आठवते!

३४ वर्षांचा  त्यांचा सहवास मला आणि माझ्या मुलीला खूप काही शिकवून गेला

आता त्या नाहीत हे मानायला मन तयार नाही, पण स्नेहधारातली त्यांची रिकामी खुर्ची हे सत्य मानायला भाग पाडते आहे. आणि सारखे वाटते की पद्माताईंना देवाने अमर का नाही केले?

आरती रानडे

No comments:

Post a Comment