पालकत्व - भाग १५


चेहरे : खरे की खोटे?


आपल्या आयुष्यात स्क्रीननं पहिलं पाऊल टाकलं टीव्हीच्या रूपात! आणि बघता बघता अनेकच गोष्टींची पिलावळ जन्माला आली- मोबाईल फोन, कॉम्प्युटर, टॅबलेट आणि असे अनेक. बालपण स्क्रीनशिवाय गेलेली मंडळी अजूनही आजूबाजूला अस्तित्वात आहेत ही जमेची बाजू. मी ही त्यांच्यातलीच एक. स्क्रीन नाही ते भरपूर स्क्रीन ते स्क्रीनची स्वयंशिस्त या प्रवासातून जाताना त्याचे फायदे-तोटे उपभोगत इथपर्यंत पोहोचलेले. आता एका दुसर्‍या जीवासाठी स्क्रीनविषयीचे निर्णय घ्यायची वेळ आल्यावर मात्र माझ्यातला स्क्रीन टेररीस्टच जागा झालेला आहे. गेले साडेचार वर्षं सुहृदला स्क्रीनच्या व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी अनेकविध गोष्टी कराव्या लागल्या. खरेतर त्या एकदा करायच्या ठरल्या की आपण खूप काही करतो आहोत असं वाटत नाही. पण तसं ठरवलेलं नसलं तर मात्र अगदी पावला पावलाला आपलं, खास करून बाळांना सांभाळणार्‍या लोकांचं अडू शकतं.

मातृत्वाची सुट्टी चालू असतानाच एकदा माझ्या ऑफिसमध्ये गेले होते. आमचं ऑफिस छोटेखानीच असलं तरी माझा पिंड आतून जाणणारे आणि तो तसा न जाणणारे असे ऑफिसमधल्या लोकांचे दोन भाग साहजिकच करता येतात. बाळ प्रथमच ऑफिसमध्ये आल्यानं सारं ऑफिस त्याच्याभोवती गोळा झालं होतं. बोलता बोलता विषय बाळांच्या खाण्यावर घरंगळला. एक सहकारी भारी कौतुकानं सांगत होता की मोबाईलवर लहान मुलांची गाणी लावली की त्याची भाची काय मस्त जेवायची! मला आणि स्क्रीनला ओळखणार्‍या दुसर्‍या एकाने त्याला हळूच खुणावलं. तो विषय अर्धवटच राहिला. पण हे चित्र आताशा इतकं सर्रास दिसतं की त्यात कुणालाच काही वावगं वाटेनासं झालंय.  

 
प्रेम आंधळं असतं हे मला पहिल्यांदा जाणवलं ते असाच एक प्रसंग प्रत्यक्ष पाहताना,आई मुलाला भरवत होती. तीन वर्षांच्या अर्जुनने किती खायचं हे तिनेच ठरवून टाकलं होतं. आणि तेवढं अन्न काहीही करून त्याच्या घशाखाली उतरवायची तिची तयारी होती. अर्जुनला भूक लागलेली होतीच. सुरुवातीला तो छान जेवला. पण शेवटचा काही भाग तो संपवायला तयार नव्हता. पोट पूर्ण भरल्यावरही खात राहण्याची विशेष कला आपण प्रौढांनाच अवगत असते. आणि पुढच्या पिढीला ते कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो. आता घास आत जात नाहीत म्हटल्यावर मोबाईल आणण्याचं फर्मान सुटलं. नवर्‍यानेही पारंगतासारखं नुसत्या नजरेनं ते ओळखलं. योग्य त्या गोष्टी त्यावर चालू करून फोन अर्जुनसमोर ठेवण्यात आला. पुढचे घास घशाखाली सरकत राहिले. हे बघताना माझा घास मात्र घशात अडकला. आपण म्हणू ते आणि तेवढं मुलांनी खाल्लंच पाहिजे हा मोठ्यांचा अट्टहास माझ्या पचनी पडत नव्हता. मनाविरूद्ध आणि शरीराच्या साथीशिवायचं ते अन्न आत गेल्यावर विष झालं तरी चालेल, पण ते आत गेलंच पाहिजे! ताट स्वच्छ! आई खूश! मुलाचं तोंड पुसून तोच मोबाईल त्याच्या हातात देऊन त्याची रवानगी झोपायला. मोबाईलवर कुठले तरी व्हिडिओ,गाणी बघत बघत,गेम खेळत खेळत तो इतका मस्त झोपतो! विजयाच्या आनंदात जेवता जेवता त्या आईने पडद्यामागचं चित्र आमच्यासाठी पूर्ण केलं.

तिचं प्रेम नव्हतं की काय अर्जुनवर? अर्थातच होतं. तिला स्क्रीनचे तोटे माहीत नाहीत का? अर्थात माहीत आहेत.तरीही स्क्रीनचा एवढा वापर का बरं तिनं स्वीकारला असेल? मोठ्यांची सोय. आपल्या वेळापत्रकात लहानग्यांचं वेळापत्रक बसवण्याची धडपड. समोर स्क्रीन नसेल तर लहान मुलं अनेकदा बोलत राहतात. अखंड बोलणं, एकच गोष्ट परत परत सांगणं, सांगायला लावणं, प्रश्न विचारणं हे सगळं सतत चालू असतं. आणि हा त्यांच्या अविरत शिक्षणाचा भाग असतो. आपल्याला मात्र काय ही बडबड' वाटते. स्क्रीनची बडबड सुरू झाली की ही जिवंत बडबड बंद पडते. स्क्रीनच्या बडबडीला प्रतिसादाची गरज नसते. आपल्या मेंदूला जरा शांतता. पण हीच शांतता आपल्या मुलांना आणि पर्यायाने आपल्याला महागात पडणार असते. मुलांना सांभाळणं हे आनंददायी काम असलं तरी ते चांगलंच दमवणुकीचंही काम असतं. बर्‍याचदा आपल्या चिकाटीचा अंत पाहणारं. यासाठी मदतीची गरज आहेच, त्याबद्दल दुमत नाही. पण ती या खोट्या चेहर्‍यांची घ्यायची की खर्‍या चेहर्‍यांची, हा तो कळीचा प्रश्न आहे.

स्क्रीन ही एक भौतिक वस्तू आहे. त्यातून येणार्‍या प्रकाशलहरी, त्याचा आपल्या डोळ्यांवर होणारा परिणाम, त्यामुळे मेंदूवर होणारा परिणाम, स्क्रीनवरच्या गोष्टी बघत बसल्यामुळे येणारी निश्चलता, त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम हा भौतिक भाग. आणि स्क्रीनवर दाखवलेल्या विविध दृक्-श्राव्य गोष्टींमधला प्रत्यक्ष ‘content’, तो दाखवण्याच्या पद्धती, त्यातून निर्माण होणारा भावनिक गदारोळ हा त्यातला मानसिक भाग. दोन्ही तितकंच खोलवर हलवून टाकतात माणसाला. आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा म्हणजे सामाजिक भाग.

ऑरोव्हिलमधल्या एका गटामध्ये काही काळ राहण्याचा योग पूर्वी आला होता. यांच्या कम्युनिटी हॉलमध्ये मोबाईल, लॅपटॉप किंवा तत्सम गोष्टी वापरण्यास पूर्ण बंदी होती. तुम्ही तिथे लोकांशी बोलायला, लोकांना भेटायला आला आहात तर तेच करा. समजा, तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला कोणाला भेटायचं नाहीये, पण तिथे बसायचं मात्र आहे तर तुम्ही शांत बसू शकता, पुस्तक वाचू शकता पण स्क्रीन मात्र नाही. पुस्तक चालेल पण स्क्रीन नाही, असं कसं? असं एकदा तरी मनात येऊन जातं. आपलेच अनुभव आठवून पाहू या. पुस्तक वाचणार्‍या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर काय घडतं आणि स्क्रीन वापरत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर काय घडतं? आठवतंय...?

माझा अनुभव असा आहे की स्क्रीनच्या समोरचा माणूस तुमच्या बोलण्याला हं..हं... करत असला तरी त्याला ऐकू मात्र काही जात नसतं,त्याचे डोळे स्क्रीनवरून तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ घेतात. स्क्रीन पुरेसा मोठा असला आणि त्यावरची गोष्ट लक्षवेधी असली तर त्या दरम्यान आपलंच लक्ष तिकडे जातं आणि आपण आपलं संवादाचं उद्दिष्ट नकळत बाजूलाच सोडून देतो. याउलट पुस्तक/पेपर वाचणार्‍यापर्यंत पोहोचायला कमी वेळ लागतो. वाचत असलेला भाग किती रंजक आहे त्यावर तो किती वेळ घेईल हे ठरेल, पण त्याशिवाय इतर काही मध्ये येणार नाही. संवाद सुरू व्हायची शक्यता तरी निर्माण होते.

स्क्रीनच्या फायद्यांची जंत्री मी इथे मुद्दामच देत नाहीये. आपल्याला ते ठाऊकच आहेत. पण कुठल्या फायद्यांसाठी कुठले तोटे सहन करायचे ही ज्याने त्याने विवेकबुद्धीने ठरवायची गोष्ट आहे. या सगळ्यावरची कडी आहे, ‘ब्लू व्हेल’. असं काही अस्तित्वात आणणारीही माणसंच आहेत, खेळणारीही माणसंच आहेत आणि त्याच्या परिणामांना बळी पडणारीही माणसंच आहेत.

आईच्या पोटात असल्यापासून स्क्रीनचं बाळकडू मिळालेले अभिमन्यू जन्माला आल्याच्या काही तासांमध्ये दूर देशी असलेल्या सख्ख्या नातेवाईकांबरोबर व्हिडिओ कॉलिंग करू लागतात. फोटो आणि सेल्फीशिवाय तर आम्हाला बाळजन्मासारखा निर्भेळ आनंदही साजराच करता येत नाही. या स्क्रीनच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूंना ब्लू व्हेलच्या जाळ्यातून मात्र सुटता यावं एवढीच प्रार्थना!

प्रीती पुष्पा-प्रकाश



No comments:

Post a Comment