आमच्या
छोट्यानं ‘काय खायचं नाही’ ते
आम्ही ठरवत होतो, पण ‘काय
खायचं, किती खायचं, कधी
खायचं’ हे मात्र
ठरवायची त्याला पूर्ण मुभा होती आणि आहे.
पालक म्हणून
आपण आपलं मूल खूप जवळून बघत असतो. निरीक्षणानं अनेक गोष्टी माहीतही होतात. पण या माहीत
झालेल्या गोष्टी अखंड बदलत राहणार आहेत हे आपल्या मनातून कधी निसटून जातं आणि कधी आपण
‘मला माहितीए... त्याला काय आवडतं, काय आवडत नाही…’ या सापळ्यात
अडकतो आपलं आपल्यालाच कळत नाही. ‘बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे’, असे सुविचार
लिहिणारे आपण, विसरून जातो की बालपण तर प्रचंड बदलाचा काळ!
बालपणातले
हे बदल सर्वच बाबतीत होत असतात. पण माणसाचं खाण्यापिण्यावर विशेष प्रेम! फक्त एवढंच
नव्हे तर ‘खायला प्यायला
घालणे’ ही कित्येकदा
आपली प्रेम दाखवायची पद्धत होऊन जाते. आई आणि मूल या नात्यात तर हे खासच खरंय असं
मला स्वानुभवानं आणि आजूबाजूच्या उदाहरणांवरून वाटतं. नको असताना खायला देणं, खायचा
आग्रह करणं, ‘माझ्यासाठी खा!’ म्हणणं
हे फक्त जाच नसून आरोग्यास घातक आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
सहा महिन्यांपर्यंत
आईचं दूध हाच बाळाचा पूर्णाहार आहे हे मागे आपण पाहिलंय. एकदा शरीराने आणि मनाने
बाळाला पाजणं जमलं की खरंतर त्याइतकी सोपी आणि सुंदर गोष्ट नाही. प्रवास करताना,
घराबाहेर पडताना, अन्नाची काळजीच
नसते. आई आणि मूल सोबत आहेत ना म्हणजे झालं! सहा महिने संपत आले की आता ‘मी
माझ्या बाळाला काय खाऊ घालू आणि काय नको’ असं
होऊन जातं! सगळ्याच आयांचं होतं असंही नाही, पण आपली
संस्कृतीच खायला घालण्याची असल्यामुळे कुटुंबात कोणी ना कोणी तरी असतंच खायला
घालणारं!
‘द वुमनली
आर्ट ऑफ ब्रेस्टफीडींग’ या
पुस्तकाचा आधार घेत आम्ही आमच्यासाठी काय सोयीचं आहे, काय योग्य
वाटतंय हे ठरवत होतो. आम्ही आमच्यासाठी काही नियम घालून घेतले होते,
- जे काही पाकिटात भरून (पॅकॅज्ड फूड) येतं ते खायला द्यायचं नाही. घरचं, ताजं, कमीतकमी प्रक्रिया केलेलं अन्न खायला द्यायचं. महाराष्ट्रीयन कुटुंब असल्यानं वरण भात, भाजी पोळी हे मुख्य अन्न. जोडीला फळं. चॉकलेट, बिस्किटं, बेबी फूड अर्थातच कटाप झाले.
- एक वर्षापर्यंत साखर अजिबात द्यायची नाही. मीठ कमीत कमी वापरायचं. नंतरही घरी तयार केलेलं आणि गुळाचं गोड द्यायचं. कशातही घातलेली साखर आणि नुसती साखर जेवढी लांबवता/ टाळता येईल तेवढी टाळायची.
- बाळासाठी वेगळं अन्न तयार करायचं नाही. आपल्या रोजच्या जेवणातलेच काही पदार्थ ते खाऊ शकतं. उदा: वरण भात, दही भात, पोळीचा छोटा तुकडा हातानेच थोडा कुसकरून इ. भात अजून गुरगुट्या करून खाऊ घालायची अजिबातच गरज नसते. बाळाला दात आले आहेत की नाहीत याने खूपसा फरक पडत नाही, कारण हिरड्या कडक होणं खूप आधीपासून सुरू झालेलं असतं. बाळांची ही ‘ओरल’फेज चालू असते, त्यामुळे खरंतर त्यांना सगळ्याच गोष्टी तोंडात घालून पाहायच्या असतात. इतके कडक ‘टीदर’ते चघळत बसतात आणि चावत बसतात तर त्याहून मऊ असे कुठलेही पदार्थ ते चघळून चघळून खाऊच शकतात. अर्थात, त्याला वेळ जास्त लागेल एवढंच.
- बाळाच्या कुठल्याच पदार्थांसाठी मिक्सर वापरायचा नाही. सुरुवातीच्या काळात थोडंफार हाताने कुसकरून द्यावं लागेल. पण तेवढं भरड बाळ सहज खाऊ शकतं.
- ज्या गोष्टी बाळ ‘बसून’ खाऊ-पिऊ शकेल तेच द्यायचं. सहा महिन्यांचं बाळ नीटच बसू लागलेलं असतं. बाळाला झोपवून द्यायची सवलत फक्त स्तनपानाला. इतर कुठलेही पदार्थ बाळाला आडवे करून द्यायचे नाहीत. यामागे विचार हा आहे की, आडव्या बाळाला एखादा खाद्यपदार्थ, खास करून पातळ पदार्थ नको असेल तर नकार देण्याची संधी मिळत नाही. तोंडातून बाहेर काढण्यावर मर्यादा येते. ‘फोर्स फीडींग’कडे आपला प्रवास सुरू होतो.
- कुठल्याही परिस्थितीत फोर्स फीडिंग करायचं नाही.
- स्तनपान ते वरचं अन्न हा प्रवास हा मोठा बदलाचा काळ आहे. तो बदल घडवून आणायला पालक म्हणून आपण जेवढे उत्सुक असतो तेवढंच किंबहुना त्याहून अधिक आपली मुलं त्यासाठी उत्सुक असतात. तेव्हा ‘एकदाच काय तो घाव घालून स्तनपान थांबवायला लागतं’ हे काही खरं नाही. आपण कोणी पाहिलंय का दहाबारा वर्षांची मुलं स्तनपान करताना! नाही ना! हा बदल घडून येणं हा निसर्गक्रमच आहे. तेव्हा ते घडून येणारच आहे. अर्थात, स्तनपानाचा निर्णय हा आईचा. कारण त्याचा जो काही भार आहे तो तिला एकटीलाच उचलावा लागतो. कुटुंबातले इतर फारतर तिला बाकीची मदत करू शकतात. पण प्रत्यक्ष स्तनपान तिलाच करवावं लागतं. त्यामुळे तिने ठरवायचं, तिला करायचं आहे की नाही ते.
- सगळ्याच गोष्टी पालकांनी भरवणं आणि सगळ्याच गोष्टी मुलांनी स्वतः हातानं खाणं या दोन्ही टोकांकडे न जाता त्याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणं. पदार्थांनुसार त्याचा सोपेपणा ठरवता येतो.
आम्ही अजून एक गोष्ट करायचो... आम्ही तिघंही, आई, बाळ आणि आमची कुत्री, एकत्र जेवायला बसायचो. प्रत्येकाचा एकेक घास. यामुळे मला बरेच फायदे जाणवले, प्रत्येकाला घास संपवायला वेळ मिळायचा, त्यामुळे भरवणार्या मला ‘कधी हे काम संपणार’ असं व्हायचं नाही. त्याचं जेवण माझ्या आधीच संपायची शक्यता जास्त असल्याने अन्न वाया गेलं किंवा वाया जाऊ नये म्हणून मला खायला लागलं असं व्हायचं नाही. त्याच्या मागे मागे फिरत भरवण्याचा प्रश्नच नव्हता कारण खूप भूक लागली आणि समोर असलेलं अन्न त्याला खायचं असलं तर तो स्वतःहूनच येऊन बसायचा. तो उठून गेला, त्याच्यामागे आपल्याला फिरावं लागतंय याचा एक अर्थ असा निश्चितच होतो की बाळाला भूक नाहीये, दुसरा असा की त्याला हा पदार्थ कुठल्या तरी कारणास्तव आत्ता खायचा नाहीये, त्याला भूक आहे पण वरचं अन्न आत्ता खायचं नाहीये तर स्तनपान करायचंय.
कधी कधी मुलं
करत असलेल्या गोष्टींमध्ये इतकी मशगूल असतात की आपण जर तोंडी विचारलं, ‘भूक लागलीये
का?’ तर उत्तर ‘नाही’ असं येतं. पण आपल्याला माहीत असतं, त्याने
शेवटचं कधी खाल्लंय, याचा अर्थ किती भूक लागलेली असणारे. अशा वेळी आपल्या जेवणाचं ताट
त्याच्यासमोर घेऊन बसल्याने (आणि अर्थातच खाऊ लागल्याने) त्यांनाही भुकेची जाणीव होते.
आणि लगेच खायला तयार होतात. अशा वेळी शब्दांपेक्षा ‘व्हिज्युअल्स’
जास्त परिणामकारक ठरतात. तशी तर नेहेमीच ठरतात, पण खाण्याच्या बाबतीतही ती काम
करतात.
आईपणाच्या
या प्रवासात मला काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात, एक म्हणजे या लहानग्यांनी खूप खाल्लं
म्हणजे ‘छान’ असं अजिबात नाही. दुसरं, आपण अनेक अपायकारक गोष्टी
खात असतो, पण आपल्याला त्या गोष्टींची एव्हाना चटक लागलेली असते, त्यातून सुटणं अशक्य
नसलं तरी अवघड निश्चितच असतं. तेव्हा आपल्या पिलांच्या निमित्ताने आपल्या अन्नाकडे
सजगपणे बघण्याची एक संधी आपल्याकडे चालून आलेली असते. त्याचा उपयोग करणं आणि बाळाच्या
निमित्ताने आरोग्यदायी सवयी स्वतःलाही लावून घेणं हे आपल्या हातात असतं.
प्रीती ओ.
No comments:
Post a Comment