मागचा लेख वाचून एका मैत्रिणीने जळजळीत प्रतिक्रिया पाठवली. त्या प्रतिक्रियेने माझी
झोप काही काळासाठी तरी उडवली. ती म्हणत असलेल्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या. फक्त त्या मी एका अंतरावरून
नेहेमी पाहते, त्या माझ्या अनुभवविश्वाचा भाग नाहीत. ती म्हणत होती, ‘कष्टकरी लोकांना या सगळ्यात
कुठे बसवायचं? पुरेसा पैसा नाही, नोकरीची शाश्वती नाही, घरातल्या मंडळींकडून हिंसाचार, बाहेर पडलो तर तिथेही नीट
वागणूक नाही, ऊर फाडून टाकणारी कामं! मग अशा वेळी एकत्र येऊन दर्शवलेला निषेध, निदर्शनं उपयोगी पडतात, असं वाटतं. रागाचा निचराही होतो आणि
त्या एकजुटीतून कमकुवत असलेल्यांना शक्ती मिळते जगण्याची. मग या रागाचं काय? गेल्या काही दिवसात घडलेल्या
टोकाच्या आणि अमानवी घटनांच्या निषेधार्थ आम्ही इतके मोर्चे काढले आणि त्यात अनेक स्त्रिया
आणि पुरुष आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन सामील झाले. असं कुटुंबाने एकत्र येऊन
आपला त्रागा व्यक्त करण्याबद्दल काय वाटतं?’
आपण मध्यम वर्गाबद्दल बोलतो आहोत हे मला आणि तुम्हांलाही नीटच माहीत आहे. ही माझ्या लिखाणाची आणि माझ्या
आयुष्याची मर्यादा आहे. आपण सगळेच जण एका मानवी आयुष्यात अनेक मानवी आयुष्य
जगू शकत नाही. तेव्हा कसं जगायचं हे कुठल्या ना कुठल्या आधारावर आपण सगळेच ‘ठरवत’ जातो. समाजातल्या खूप छोट्या गटाबद्दल
बोलत असलो, तरीही तो गटही संख्येने खूप मोठा आहे. आणि माणूस आहे तर प्रश्न
आहेतच. ज्यांना असं वाटतं की ‘माझे स्वतःचे प्रश्न कमी आहेत आणि मी इतरांचे प्रश्न
समजूनही घेऊ शकते/तो आणि ते सोडवण्याची माझ्यात मानसिक आणि शारीरिक ताकद आहे’ ते इतरांचे प्रश्न आपलेसे
करून सोडवू पाहतात. प्रश्न निर्माण करणे आणि असलेले सोडवणे हे जणू मानवी दुष्टचक्रच आहे. आपण सगळेच त्यात अडकलोय. कोणीच माणूस प्रश्नांपासून
वाचलं नाही. किंवा असं म्हणू या की यातच तर खरी गंमत आहे आयुष्याची! प्रश्नच नसते आणि काही संघर्षच
नसता तर आज आहे तेवढा तरी आनंद मिळाला असता का आपल्याला?
अगदी मनापासून सांगते की समाजात आत्ता घडत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं
माझ्याकडे नाहीत. काही प्रश्नांची इतरांनी दिलेली उत्तरं आवश्यक वाटत असली तरी मी त्या
उत्तरांचा भाग होऊ शकेन असं मला माझ्या प्रवृत्तीकडे बघून वाटत नाही. कधी इतरांनी दिलेली उत्तरं
पटतही नसतात आणि स्वतःची सुचतही नसतात. पण अशावेळी आपल्याकडून होईल तेवढे करावे आणि या विश्वातले
आपण अगदीच छोटे कण आहोत हे लक्षात ठेवावे, असं मी करते. आणि त्यामुळे संवेदनशील असूनही
रात्रीची झोप मात्र उडत नाही माझी.
मानवी समाजात विचारांची विविधता आहे आणि कृतींचीही, हे मला खूप आश्वासक वाटते. खरं तर आपण करत असलेल्या
गोष्टी सगळ्यांनी कराव्या असंच आपल्याला अनेकदा वाटत असतं. पण तसं असतं तर प्रश्नांची
उत्तरं सापडण्याची शक्यता अजूनच कमी झाली असती बहुधा. तेव्हा निसर्गातली विविधता
मानवी समाजात उमटली आहे हे चांगलंच आहे. या मोर्चा वगैरे चर्चेतून
मला संदीप खरेचं गाणं आठवलं, ‘मी मोर्चा नेला नाही...’. ते गाणं पहिल्यांदा ऐकलं
तेव्हा आपण या वर्णनात आपण नेमकं कुठे बसतो असं शोधण्याचा प्रयत्न झाला होता. नंतर असंही वाटलं होतं की
कृतीहीन, घाबरट लोकांचं वर्णन असलं तरी अशीही लोकं समाजात हवीच ना! स्वतःच्या नाकासमोर चालणारी, दुस-याच्या अध्यात ना मध्यात! म्हणजे कोणाचं वाईटही करणार
नाहीत आणि वाईट झालं तर तेही सुधारायला जाणार नाहीत. सगळ्यांनीच कुठल्या ना कुठल्या
परीने ‘हाय प्रोफाईल’ राहायचं ठरवलं तर चांगल्या वाईटाचा किती गदारोळ उठेल.
मध्यम वर्ग म्हणजे खरंतर विचार करायला पुरेसा अवधी मिळणारा वर्ग! म्हणजे आजच्या (आणि कदाचित पुढच्या काही
महिन्यांच्या) जेवणाची चिंता नसलेले! तेव्हा आपापल्या परीने विचार करत घडणा-या गोष्टींना फक्त प्रतिक्रियाच
द्यावी असं नाही तर पुढाकार घेऊन हवा असलेला बदल घडवून आणण्याचाही प्रयत्न करावा असा
हा वर्ग! आणि मला तर स्वभावाचे हे दोन भाग वाटतात. काही जण ‘proactive’ असतील तर काही जण ‘reactive/responsive’. म्हणजे काही लोक वाईट गोष्टी घडू नये यासाठी आधीच पावले उचलतील (preventive). पण तेवढी ती पुरणार नाहीतच. काही ना काही वाईट घडत राहणार
तेव्हा ते सुधारत राहणं (curative) हे ही ओघानेच येणार. दोन्हीही गोष्टी अगदी गरजेच्या! एकमेकांच्या हातात हात घालून
जाणा-या. कधी कधी तर प्रतिसादातून नवी कृती घडून येते. त्यात अजून भर म्हणून काही
लोक
‘एकला
चलो रे’ असंच काम करत राहणार! तर काही गटाला उद्युक्त करण्यात वाकबगार! काही नेते तर काही चांगले
अनुयायी.
पालक म्हणून आपल्या पाल्याला काय शिकवायचं? मुद्दाम असं काही शिकवायची
गरजच नाही. आपल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून ते उचलतच राहतील. आणि त्यांना त्यातलं काय
योग्य, अयोग्य वाटतं हे ठरवतच राहतील. काही काळात त्यांना आपण पालक
अगदीच चुकीचे वाटणार आहोत तर त्यांच्याच आयुष्याच्या इतर काही काळामध्ये त्यांना आपण
अगदीच योग्य वाटणार आहोत. आणि या त्यांच्या प्रवासामध्ये आपण तसेच्या तसेच राहिलेले
असू असं अजिबातच नाही. आपणही बदलत जाणारच ना? निसर्गनियमांनुसार.
अशी इतकी अलिप्त, तटस्थ भूमिका खरंच घेता येते का आपल्याला पालक म्हणून? खरंतर नाही. कायद्याने सुद्धा अठरा वर्षांपर्यंत
तर आपणच जबाबदार आहोत ना त्यांच्या प्रत्येक कृतीसाठी. आणि त्याच्या आधी आणि नंतर
सुद्धा समाज तर म्हणणारच आहे ना, ‘आई बाबांनी शिकवलं नाही वाटतं!’
तेव्हा परत एकदा शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण त्यांना काय
शिकवण्याचा प्रयत्न करतो यापेक्षा आपण स्वतः काय शिकण्यावर/करण्यावर भर देतो यातून आपली
मुलं अधिक शिकणार आहेत. तेव्हा शिकवायचीच असेल तर विविधतेबद्दलची सहिष्णुता
शिकवू शकू आपण त्यांना, स्वतः अधिकाधिक सहिष्णू होत जाताना! अजूनही काही गोष्टी करता
येतील. स्वतःचा पिंड मुलांवर न लादणं आणि ज्या गोष्टी आपण स्वतः नक्कीच करणार
नाही असं वाटत असेल त्याही गोष्टी करून बघायला मुलांना मुभा देणं, अर्थात ज्या त्या गोष्टी
करताना, मुलांचं वय योग्य आहे ना ते करण्यासाठी हे लक्षात घेऊनच.
अगदीच साधं, सोपं उदाहरण देते, अगदी कोणाच्याही घरात घडू
शकेल असं. ९ वर्षांच्या इराला वरती टेरेसवर झोपायला जायचं होतं. सोबत काकूही असणार होती. पण आज्जीने निक्षून सांगितलं, जायचं नाही. आईला या सगळ्याचा पत्ताच
नव्हता. पण तिची परवानगी काढायची तर न मिळण्याचीच शक्यता जास्त. कित्ती साधी सोपी वाटणारी
गोष्ट. पण त्यात मोठ्यांकडून नकार आला. आत्तापर्यंत कधीच न केलेली ही
गोष्ट करण्याबद्दल इराला केवढं थ्रील वाटत होतं. आणि नाही करता येणार म्हणून
किती हिरमोड झाला तिचा. असं काहीतरी नवीन करायचं असेल तेव्हा यापुढे ती न
विचारताच करण्याची शक्यता आता जास्त! करून झालं की सांगेल, पण आधी सांगून कशाला मोडता
घाला. मोठ्यांचाही काही एक विचार असतो हे खरंय. पण अनेकदा त्यांच्या भीती
मुलांवर लादल्या जातात. डासांची काय ती सोय लावून एकदा का होईना टेरेसवर झोपता
आलं असतं. मग पुढचं पुढे ठरवता आलं असतं. ‘अवघड वाटतंय, पण करून बघ. मदत लागली तर जरूर माग. जमेल तेवढी नक्की करेन.’ असा दृष्टीकोन असला तर आपल्या
भीती, मनाचा साचेबंदपणा यातून बाहेर पडण्याची पालकत्व ही अजून एक संधी असते. मुलांना संधी नाकारून खरंतर
आपणच आपली दुसरी संधीही गमावणार असतो. म्हणूनच ‘(मुलांना) संधी द्या आणि (स्वतःही) संधी मिळवा’
No comments:
Post a Comment