पालकत्व भाग - १७

परत एकदा शिक्षण!

मागच्या लेखात आपण वाघूला भेटलो. प्रत्येक मूल वेगळं, तसं प्रत्येक प्रौढ माणूसही निराळं. त्याच्या घरातली आणि आजूबाजूची परिस्थिती निराळी. त्या व्यक्तिच्या स्वतःच्या आशा-आकांक्षा, प्राधान्यक्रम आणि अंगी असलेली कौशल्यं निराळी. खरे तर, ‘मला करता येतं, तर तुम्हाला जमलंच पाहिजे’, हे वाक्यच बाद करायला हवं, असे टोकाचे विचार मनात येतात कधी कधी. ही तुलना, त्यावर आधारित शिक्षणपद्धती आणि त्यातील मूल्यमापन हे सगळंच मन भेदरवून टाकणारं आहे.

पूजा, एक सुशिक्षित आई. ‘फर्स्ट जनरेशन इंग्लिश लर्नर’. म्हणजे तिच्या कुटुंबातली तिची पहिली पिढी इंग्रजी शिकणारी. त्यामुळे इंग्रजी येतंय पण भाषेवर प्रभुत्व नाही. ‘पुस्तकं इंग्रजीत आहेतहा वाचनामधला मोठा अडथळा वाटावा, पण बोलणार्याचं साधं इंग्रजी कळेलही आणि चार उत्तरही देता येतील अशी परिस्थिती. फेसबुक, वॉट्सअॅप . मुळे एक गोष्ट झाली, इंग्रजी हवेत पसरली. अगदीच देवादिकांची भाषा, आपल्याला काहीच कळत नाही असं आता तिच्याबद्दल काही राहिलं नाही. ‘देवला वाढवताना ती स्वतःहून पुस्तकं वाचून अभ्यास करत नव्हती. पण आजूबाजूच्या लोकांकडून तिला सांगितल्या जाणार्या गोष्टी आणि तिला सद्सद्विवेकबुद्धीने कळत असलेल्या गोष्टी आणि त्यातली फारकत तिला लक्षात येत होती. ह्यातून निर्माण होणारी द्विधा मनस्थिती ती जागरूकपणे बघत होती आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते प्रयत्नही करत होती.
तिच्या शेजारच्या बाळाची आई बाळाशी इंग्रजीमधून बोलायला लागली, तसं तिला कळेना आता आपण काय करावं? इंग्रजीमुळं तिचं अडलं नसलं, तरी स्वतःच्या मर्यादा तिला जाणवायच्या. त्या मर्यादादेवला येऊ नयेत असं तिला वाटणं स्वाभाविक होतं. मग काय, शब्दांची सरमिसळ किंवा चक्क भेसळ करत बोललो की पुरे होईल का? घरात मातृभाषेत बोलताना व्याकरण फक्त बोली भाषेचं आणि शब्द इंग्रजीमधले यातून नेमकं काय निर्माण होईल? किंवा आज्ञार्थक, एका शब्दाची वाक्यं इंग्रजीमधून आणि मोठी वाक्ये आली की मातृभाषा.
ॅपल खायचंय का तुला? कम, मी देते तुला ॅपल!”
भाषा प्रवाही असते. सतत बदलत राहते. भाषांची सरमिसळही होत राहते. पण आपण नेमकी कुठली भाषा बोलतो आहोत हेच कळू नये एवढी भेसळ नसावी. म्हणजे शक्यतोवर एकावेळी एकच भाषा, त्याचंच व्याकरण आणि त्यातलेच शब्द असे वापरले गेले तर ती भाषा मुळातून रुजते. मग जेव्हा इंग्रजी बोलावं वाटतंय तेव्हा फक्त आणि शुद्ध इंग्रजी बोललं तर मूलही नीट इंग्रजी शिकेल. भाषा शिकणं ही मोठी प्रक्रिया आहे आणि त्यातला पहिला टप्पा हा ऐकण्याचा आहे, हे विसरून चालणार नाही. मातृभाषेच्या बाबतीत वाट बघू शकणारे पालक, शिक्षक इंग्रजीपाशी आले की मात्र त्यांची सहनशीलता संपते. घाईची शू लागलेली असताना बालवाडीच्या मुलांनी इंग्रजीतून परवानगी घेण्याचा हट्ट धरणार्या शिक्षकाची कीव येते



भाषा कानावर पडत असली पाहिजे तरच ती शिकली जाईल. कोण किती वेगाने शिकेल हे ज्याच्या त्याच्या शिकण्याच्या ऊर्मीवर अवलंबून असेल. याचा अर्थ मुलांनी इंग्रजी शिकावं असं वाटत असेल तर घरात इंग्रजी बोललं गेलं पाहिजे, फक्त मुलाशीच नव्हे, तर कुटुंबातल्या इतर सदस्यांमध्ये देखील. हे नेहेमीच शक्य असतं असं नाही. आणि असं केलं तर मातृभाषेला गाशा गुंडाळून ठेवावा लागेल. मुलाच्या दृष्टीने हे काही हितकारक नाही. तेव्हा याला पर्याय काय? एक माणूस एक भाषा! किंवा इंग्रजीसारख्या भाषेसाठी दिवसातला थोडा वेळ ठेवणं आणि त्या वेळात आपण मुलांशी पूर्णपणे इंग्रजीतून बोलणं, सोप्या इंग्रजीतली पुस्तकं वाचणं. आपण काय बोलतो आहोत हे मुलांना कळण्यासाठी भाषांतराची मदत घेण्याऐवजी आपला चेहराच अधिक बोलका करायला लागेल. चित्रं, प्रत्यक्ष वस्तू यांची मदत घेत भाषा बोलता येते आणि हळू हळू बोलली तर ती मुलांना कळतेही. इंग्रजीच्या बाबतीत आपण स्वतःला बोलण्याचा, वाचून दाखवण्याचा आग्रह करू शकतो पण मुलांनीही लगोलग बोललंच पाहिजे असा हट्ट नसावा. नाहीतर यातून नवीन भाषेविषयी प्रेम निर्माण होण्याऐवजी दुरावाच निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.

ज्या घरात बाळाशी बोलायला अनेक व्यक्ती उपलब्ध आहेत आणि त्यांना विविध भाषा अवगत आहेत, अशावेळीएक व्यक्ती एक भाषाउपयोगी पडतं. मूल आपोआपच त्या त्या व्यक्तीशी ती ती भाषा बोलतं. सायली मराठी भाषिक पण स्पॅनिशची शिक्षिका. घरात हिंदी बोलणारा बाबा. मराठी बोलणारे आजोबा आणि स्पॅनिश बोलणारी आई यामुळे निया तीन भाषा एका वेळी शिकली. मुळात भाषा शिकण्याचं कौशल्यच आत्मसात झाल्यावर इंग्रजीचं एवढं काही वाटत नाही. हे इतक्या टोकाचं उदाहरण दिलं असलं तरी हीच गोष्ट आपल्या एकाच भाषेतल्या विविध बोलीभाषांनाही तेवढीच लागू पडते.
खरंतर आपण बोलत होतो शिक्षणाविषयी पण विषय भाषेवरच अडकून पडलाय. त्याला कारणंही तशीच आहेत. शिक्षण हे काही फक्त भाषेचं नाही, इतर अनेक गोष्टींचं आहे आणि ते शाळेत जाण्यापूर्वीच, जन्माला आल्यावरच (काहींच्या मते जन्माला येण्यापूर्वीच) सुरू होतं. पण भाषाविकास ही त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची आणि खूप लवकर सुरू होणारी गोष्ट. या अविरत चालू असलेल्या शिक्षणामध्ये शाळेमुळेच कधी कधी खंड पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. त्यातशाळेचं माध्यमही मोठी भूमिका निभावतं. आणि आपल्याकडे दोनच पर्याय असतात: मातृभाषा आणि इंग्रजी, आपल्या उदाहरणात मराठी आणि इंग्रजी.

इंग्रजीला आपण खूप महत्व दिलंय कारण आपल्याकडे उच्च शिक्षण इंग्रजीतून घ्यावं लागतं. अगदीच काही मोजके विषय असतील जे घेतले तर पूर्ण शिक्षण इंग्रजीविना पुरं करता येईल, अन्यथा इंग्रजीला पर्याय नाही. ‘मग पुढे जाऊन शिकायचं तर आत्ताच का नको?’ असं वाटू शकतं. पण त्यातली मेख ही आहे की प्राथमिक शिक्षण तरी मराठीत किंवा बहुभाषिक शाळेत झालं तर मुलं अधिक चांगल्याप्रकारे इतर विषय शिकू शकतील. ज्या घरांमध्ये इंग्रजीचा अजिबात गंध नाही त्या घरातील मुलंही मराठी शाळेत गेली, तर त्यांनी इंग्रजी शाळेत जाणं स्वाभाविक वाटतं. त्यांच्यासाठी ही मोठ्ठी उडी असेल आणि ती पूर्णपणे फसूही शकते. ‘इंग्रजी शिकणार्या पहिल्या पिढीचा स्वतःचा फायदा कमी झाला तरी नंतरच्या पिढीसाठी ती एक मोठी आणि महत्त्वाची पायरी ठरते.
ज्या घरांमध्ये थोडंतरी इंग्रजी बोललं जातं तिथल्या मुलांनी, आधी मराठी माध्यम आणि नंतर इंग्रजी माध्यम करणं श्रेयस्कर वाटतं. अर्थातच नंतर इंग्रजी माध्यमामध्ये जाण्यासाठीची भाषेची तयारी करत राहायला लागेल.
ज्या घरांमध्ये दोन्हीही भाषांवर प्रभुत्व आहे तिथल्या मुलांनी निश्चितच मराठी माध्यमात जावं. याचं कारण इंग्रजीचा प्रचंड रेटा आणि घरात उपलब्ध असलेले भाषा कौशल्य. त्यामुळे मुलं इंग्रजी शिकतीलच यात काही शंका नाही. पण जर ती इंग्रजी माध्यमात गेली तर मात्र ती मराठी शिकतील का याबद्दल शंका वाटते. अशी मराठी कुटुंबातली मराठी येणारी आणि फक्त इंग्रजी येणारी मुलं पाहिली, की वाटतं की ज्यांना निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, भक्कम आर्थिक पाया आहे, त्यांनी तरी आपली मुलंभाषाश्रीमंतहोतील याची काळजी घ्यायला हवी.



प्रीती पुष्पा-प्रकाश


No comments:

Post a Comment