मेघा,तिथे चढायचं नाही. पडशील...
मेघा,पाण्यात खेळू नकोस. सर्दी होईल...एकदाच स्वतःला विचारून बघूया,एक प्रौढ व्यक्ती (जे की आपण सर्व जण आहोत) एका दिवसात किती ‘नाही’ सहजपणे ऐकून घेऊ शकते? आणि ऐकून झाल्यावर,ते ‘नाही’ सहजपणे मान्य करू शकते का? मग लहानांनी एवढे नकार का सहन करायचे? ही झाली आपण त्यांना नकार द्यायची गोष्ट.
त्यांनी आपल्याला दिलेला नकार आपल्याला मान्य असतो का? एखादी गोष्ट करण्याला त्यांचा नकार असू
शकतो आणि त्यांच्या दृष्टीने तो अत्यंत रास्त असतो. पण असे नकार द्यायला आपण त्यांना संधी तरी
देतो का? मुळात मोठ्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या आणि लहानांवर प्रत्यक्षपणे परिणाम
करणार्या गोष्टींची आपण त्यांना पूर्वकल्पना देतो का?
दहा महिन्याच्या अर्चिसला त्याच्या आयुष्यात मी 5-7 वेळा भेटली असेन. ते ही 1-2 तासाच्या वर नाही. याचा अर्थ माझा चेहरा
त्याला माहित असला तरी मी त्याच्या रोजच्या चेहर्यांपैकी नव्हते. आम्ही भेटल्यावर
थोडा वेळ माझ्याकडे येऊन झाल्यावर आता निघण्याच्या तयारीत तो होता. आई ‘बाय’ म्हणायच्या बेतात असताना मी त्याला
विचारलं, माझ्याकडे येतोस एकदा?
पुरेसं बोलता येत नसलं
तरी काही शब्द आणि त्यांचे अर्थ त्याला नीटच ठाऊक होते. त्याच्या मृदू “नाई..”सोबतचे त्याचे न येण्यासाठीचे हावभाव मला सुखावून गेले. मी त्याला म्हटलं,“नकार देता येणं ही एक कला आहे.
ती आत्ता जमत्येय तशीच पुढेही जमू देत.”
त्याला घ्यायचा मी ही
आग्रह केला नाही आणि त्याच्या आईनेही त्याला भरीस घातले नाही. आम्हा दोघींना
त्याचा हा नकार मान्य होता. आणि त्यामुळे आम्ही तिघेही आनंदाने एकमेकांना ‘बाय’ म्हणू शकलो.
हे झालं दुसर्याच्या
मुलाचं! स्वतःच्या मुलाला तर आपण गृहीतच धरलेलं असतं. पण ज्या गोष्टींच्या नकाराने
आपल्या कामांमध्ये, नियोजनांमध्ये व्यत्यय येणार नाही अशा गोष्टी तरी जरूर त्यांना विचारून करता
येतील. अडीच वर्षाचा सुहृद काहीतरी खेळण्यामध्ये मग्न होता. त्याचं सगळं इतकं गोड
चाललं होतं की मला कौतुकाने त्याला मिठी मारावी वाटली. त्याला तसं विचारलं तर
त्याने ‘नाही’ म्हटलं. आणि मीही ‘बरं’ म्हटलं. याचा आमच्या पुढच्या मिठ्यांवर कुठलाही वाईट परिणाम झाला नाही. पण ‘कोणालाच गृहित धरू नये’ या गोष्टीचं माझं आणि त्याचं प्रशिक्षण मात्र सहज
जाता जाता झालं.
नकार द्यायचे नाहीत मग
काय करायचं असा पुढचा प्रश्न मनात रेंगाळत असेल तुमच्या. तो नकार का आहे हे
थोडक्यात समजावून सांगणं महत्वाचे. थोडी मदत करून नकाराचा होकार करता येणं शक्य असलं तर
तो मदतीचा हात पुढे करणं गरजेचे आहे. आपला स्वभाव,आपल्या सोबत असलेल्या पिल्लाचा कल आणि असलेली
परिस्थिती यानुरूप निर्णय घ्यायला हवा.
स्वयंपाक करताना आमच्या
कडेवर आणि उभं राहायला लागल्यावर ओट्यावर उभं राहून फोडणीचं नाट्य बघणं,त्यात मसाले घालणं हा सुहृदचा आवडता कार्यक्रम. आता
कोणी म्हणेल अशा असुरक्षित गोष्टी करायला हव्यात का? मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा भाग
आहे. आमच्या ओट्यावर उभं राहायला जागा आणि काही धोका झालाच तर जबाबदारी घ्यायची
आमची तयारी असल्याने आम्ही हे नेहमी करत आलो आहे. आणि स्वयंपाक ही शिक्षणाची
अपूर्व संधी अजिबात सोडू नये असं वाटत असल्याचाही हा परिणाम आहे. दुसरं असं की
त्यातल्या धोक्यांबद्दल बोलायचीही ती चांगलीच संधी असते.
त्यामुळे ‘करू ते सर्व काळजीपूर्वक करू,पण करू’ हा आमचा होरा राहिला आहे. त्यातला दुसरा भाग असा की स्वयंपाकघरातील सकाळची
गडबड करणारी, दहा हात असलेली दुर्गा माता आमच्याकडे अवतरत नाही. आमची गती संथ असते.
ज्यामुळे थोडीतरी सुरक्षितता अधिक वाढते.
असं सगळं असूनही एकदा नुकताच चहा करून झाल्यावर गॅस बंद असताना त्याला
सुहृदने हात लावला. चटका बसाल्यासरशी त्याने हात मागे घेतला. आजीने तिच्यापरीने
आणि मी माझ्या परीने परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं.
सुहृदा, अजिबात हात लावायचा नाही,बर्नरला- आजी
आपण आत्ताच चहा केला ना म्हणून तो बर्नर गरम होता-मी,या दुसर्या बर्नरला हात लावून बघ,हा गरम आहे का?
असं कशाला? कधीच बर्नरला हात लावायचा नाही म्हणजे नाही! -आजी
हा बर्नर गार आहे,पण लांबून आपल्याला कळतंच नाही,गरम कुठला आणि गार कुठला. त्यामुळे आपल्याला आत्ता बसला तसा चटका बसू शकतो.
म्हणून बर्नरला शक्यतो हात लावायचा नसतो.- मी
यात आजी चूक,मी बरोबर हा भाग नसून,वेगवेगळे दृष्टीकोन आणि मतं असलेल्या मोठ्यांच्यातही
आपल्या लहानग्याला विश्वासात घेऊन,त्याला धाडसी गोष्टी करण्याचा विश्वास देणं शक्य असतं,एवढाच मुद्दा आहे. आणि अर्थातच नकाराचा मुद्दा
महत्त्वाचा! शेवटी नकारच द्यायचा आहे पण ‘मी मोठी आहे आणि मी सांगते म्हणून’ नकार न देता कारणांसह नकार दिला तर तो नीट रूजेल असं वाटतं.
लहान मुलांना कोणी
मस्तीखोर,उद्योगी,उचापत्या करणारा म्हटलं की मला फार वाईट वाटतं किंबहुना रागच येतो. आपण मोठी
माणसं स्वतःला भारी अनुभवी आणि दूरदृष्टी असणारी म्हणवतो ना! मग आपल्याला एवढं कळू
नये का की लहान मुलांची ही मस्ती म्हणजे हे जग अनुभवून बघण्याची त्यांची भूक आहे, त्यांचे उद्योग म्हणजे त्यांची करून बघण्याची जिद्द
आहे, त्यांच्या
उचापत्या म्हणजे त्यांची सक्षमपणे मोठं होण्याची धडपड आहे. आणि त्यांच्या या
मस्तीमुळे,उद्योगांपोटी आणि उचापत्यांमध्ये जर का त्यांच्या किंवा कोणाच्याही जीवाला
धोका होणार असेल तर तो होऊ नये म्हणून एका सजग प्रौढाने त्यांच्यासोबत असणं गरजेचच आहे.
किंबहुना एक किंवा जरा
मोठ्या झालेल्या दोन लहानग्यांमागे असं कोणीतरी ‘बेबीसिटिंग’ करणारं असतंच आपल्याकडे. आता प्रश्न आहे तो फक्त त्या व्यक्तिने लहान होऊन
त्यांच्या ‘दंग्यात’ सामील होण्याचा!
प्रीती ओ.
No comments:
Post a Comment