।। विठ्ठल
विठ्ठल ।।
आषाढाचा मास । वारीची चाहूल
होई न होईल । शंका मनी ।।
न होई वारी । तरी चिंता नसावी
विठू येई द्वारी । प्रत्येकाच्या ।।
विठू येई द्वारी । आगळ्या रुपात
पण परीक्षा घेऊनी । पारखावा ।।
कामाविना वेतन । द्यावे कामगारां
विठूचरणी सेवा । पोचतसे ।।
शिधा अन् दवा । द्यावा याचकासी
स्वसुरक्षेचा वसा । समजवावा ।।
झाकोनिया मुख । ठेवी हात स्वच्छ
साबणाचा वापर । हेच सुरक्षा रिंगण ।।
सर्व योद्धे आजचे । ही विठूचीच रुपे
तयांचा गजर । पु्ण्य संकीर्तन ।।
वैश्विक संकट । असे जरी गडद
श्रद्धारुपी नौका पार । करी भक्तांसी ।।
भरकटोनी जाता । टिळा दावी वाट
विठूवरी विश्वास । असो द्यावा ।।
माऊलींचे अश्व । रोखती संकट
निश्चिंत रहावे । पश्या म्हणे ।।
।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।
No comments:
Post a Comment