पाऊस निनादत होता.....

 


खिडकीवर पावसाच्या थेंबांचा तडतड आवाज येऊ लागला आणि झोप मोडली....कॉफीचा मग घेऊन बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि हवेसरशी पाण्याचा मोठा झोत अंगावर आला. कितीतरी दिवसांनी असा पावसाचा फटकारा बसला होता....किती दिवसांनी बरं....कदाचित् कॉलेजनंतर पहिल्यांदाच! एरवी AC गाडीतून काचा बंद करून बाहेर पडणारा पाऊस बघायचा नाहीतर AC बेडरूमच्या बंद खिडकीआडून बरसणाऱ्या सरी बघायच्या....इतकाच काय तो पावसाशी संबंध.

पावसाच्या सरी अंगावर झेलत बसायला आवडलं असतं पण झेपलं असत की नाही कोणास ठाऊक. त्यापेक्षा काचेच्या दरवाजाआडून दिसणारा पाऊसच चांगला.....त्या बंद तावदानाबाहेर बाहेर बरसणाऱ्या सरी बघत, असा निवांत पाऊस शेवटचा कधी भेटला होता? किती वर्ष उलटली की युगं? युगं वाटावीत इतका तर काळ नक्कीच लोटलाय.....याचा विचार करतांना मन आठवणी तपासून बघू लागलं.

बऱ्याच वर्षापूर्वी....दहा वर्ष की पंधरा की त्याहून जास्त?...रत्नागिरीहून मुंबईकडे परतीचा प्रवास करत होतो. गणपतीची धामधूम नुकतीच आटोपली होती, त्यामुळे इतके दिवस प्रचंड काम करून थकलेले रस्तेही सुस्तावले होते. तुरळक गाड्या काय त्या रस्त्यावरून धावत होत्या. रस्त्याला लागून तासभरही झाला नसेल... अचानक आभाळ भरून आलं आणि बघता बघता आषाढासारखा धो धो पाऊस भाद्रपदात कोसळू लागला. इतकं अंधारून आलं की गाडी थांबविण्यावाचून पर्यायच नव्हता. एक छोटीशी टपरी बघून गाडी थांबवली तर खरी, पण त्या पावसात गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्यची हिम्मत नव्हती. हे समजल्यानेच बहुतेक त्या टपरीतून एक माणूस मोठी छत्री घेऊन आला.....त्या टपरीच्या आडून पावसाचा अगदी मनमुराद आनंद लुटला होता....तास-दोन तास पावसाचं तांडव सुरु होतं.....अशा पावसात जे काही गरमागरम अन्न समोर येईल त्यातलं सुख काय असतं ते अनुभवल्याशिवाय नाही कळणार. गरमागरम भाकरी आणि शेकटाच्या पाल्याची भाजी....यापुढे जगातील कोणताही अन्नपदार्थ तुच्छ होता....त्या टपरीवर अर्धवट भिजत अनुभवलेल्या पावसाची ती शेवटची आठवण.


त्याआधी कितीतरी वर्षे, पाऊस सुरु झाला की त्याला भेटायला गेल्याशिवाय करमतच नसे. दरवर्षी कधी सिंहगड तर कधी माळशेज, कधी माथेरान तर कधी थेट कोकण....नाहीतर नुसतंच नरीमन पॉईंटला कोसळत्या पावसात समुद्राच्या फुटणाऱ्या मोठाल्या लाटा झेलत बेफिकीर हिंडायचं..... पाऊस आपल्यापर्यंत येतो यावर समाधान न मानता त्याला भेटायला जायचंच!

आता अशा कोणत्याही ठिकाणी पावसाला भेटता येतच नाही. भेटते ती बेशिस्त, बेपर्वा गर्दी....दारू पिणं म्हणजे आनंद साजरा करणं आणि धांगडधिंगा घालणं म्हणजे आपला हक्क बजावणं इतकंच माहिती असणारी बेमुर्वत गर्दी. मग हळू हळू पावसाशी भेटायची ओढच कमी होत गेली....असाच एखाद्या निवांत क्षणी कधी अचानक पाऊस भेटलाच तर त्याची विचारपूस काय ती केली जाते.....गप्पांची मैफल जमवायला नाही जमत.... खूप दिवसांनी पावसाची हालहवाल अगदी फुरसतीत जाणून घेतली....त्याला भेटल्याचे क्षण आठवले....अनुभवले.....आता परत कधी असा निवांतपणा मिळेल न मिळेल कोण जाणे.

मनीषा सोमण





No comments:

Post a Comment