मिश्रण हळदी कुंकवाचे,
झळके पावित्र्य क्षणामध्ये |
बहरली वेल हिरवीगार
खुलली फुले जांभळी
घेऊनी कडुलिंबाचा आधार
ऋतू असो कोणताही, असतेस तू सदा उमललेली
म्हणूनच की काय, नाव मिळाले सदाफुली
मोहक रंगाने झाला आकर्षित मधुकर,
शोधतोय मकरंद
उघडून आपले दोन्ही पर
सौंदर्याला वाटतेच आरशात
एकदा डोकवावे,
आपल्या रूपाचे कौतुक
आपणच करावे
तरीच हे सुवर्ण पुष्प
आले पाण्याजवळी,
प्रतिबिंब पाहताना लाजून
चुर झाले मनी
गावाबाहेर एकांतात रंगला
खेळ लपाछपीचा
पाचपैकी चिडले दोघे,
मेळ जमला तिघांचा
ब्रम्हकमळाची जोडी फुलते
क्वचितच एखाद्या दिवशी
कोयरी घेऊन चालली सखी
पूजा करण्या मंदिराशी
मन होई प्रसन्न पाहता फुले कोणतीही
परी बघूनि पुष्पगुच्छ हा आठवण होते कोरोनाची
भरीस भर त्यात टीव्ही वरच्या बातम्यांची
सकारात्मकता ही जिथे हात जोडते अशी कमाल न्युज चॅनलची
असतात याच्या विविध रंगी छटा,
परी हा आहे थोडा वेगळा
पुत्र पौत्रासहित उभारून
दावी आपला रुबाब आगळा
धुंद होऊनि समीर आला
सुंदर लिलीला भेटायला
उंचाऊनी आपुल्या नाजूक
माना
लटकेच म्हणती ना ना
ना ना
स्वर्गीय
हे झाड लावले कृष्णाने सत्यभामेकडे,
फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणी पडे
मृदू मुलायम धवल पुष्पाला
केशरी देठाचा आधार मिळे
आयुष्य जरी एका दिवसाचे
सुगंध मात्र सर्वत्र दरवळे
फोटो संकलन:कौस्तुभ आणि शांतनू
चारोळ्या :सीमा आणि पुष्पा
No comments:
Post a Comment