ही तर आहे आपुली कर्दळ,ब्रम्हकमळाचा वाटे भास
कारण ते ना मी पहिले अजून, मनी आहे तीच आस
सांभाळिता तोल त्रिदल, पुढे करीती गरुडासन
पिवळे तांबूस अन केशरी, रंगांची असे रम्य उधळण !!
हिरवा चाफा लपवला तरी, सुगंध तयाचा लपत नाही
शुभ्र चाफ्याचे गुच्छ देखता, आनंदे मन भरून जाई
यंदाही मज माहेरी, असाच असेल चाफा फुलला
आठव येता त्या चाफ्याची, जीव माझा गलबलला !!
अथांग अशा आकाशाला, चौकटीच्या बंधनात बांधले मी
जो तो वंदन करी उगवत्या, मावळत्याला ना पाही कुणी
प्रकाश देतो तुम्हा सर्वा , तमाचा असे मी काळ
परी घेतो निरोप तुमचा, झाली असे संध्याकाळ !!
इटुकली पिटुकली पाहता फुले, वाटे आभाळच खाली आले
नीलवर्णी आकाशाच्या, मधोमध चांद खुले
घराच्या कुंपणावरती फुलांसव हि वेल झुले!!
हा हिरवा मखमली गालिचा, विणून गेला कोणी चेला
नाजूक साजूक श्वेत फुले ही , अलवार त्यावर ठेवून गेला
हिरवी पोपटी अन मेंदी अशी, रंगसंगती तयाची साधून
अल्पायुष्य जाणून त्याचे, मी ठेविला फोटो काढून!!
पूर्वी ग्रीष्माला ओळखायचे कसे, लालभडक पर्णहीन गुलमोहोर दिसे
पण आता कलियुग आले, पाने जास्त थोडीशी जांभळी फुले !!
गुलाबी हा रंग पाहता,मनी प्रीतीचा दाटे भाव
बोगनवेल ही कुंपणावरची गुलाबपरी खाते भाव !!
चालत असता मार्गावरती चिनी गुलाब ते नजरेस दिसले
दिसला ना मग स्पीड ब्रेकर तो , अडखळले अन मी पडले
अरे नतद्रष्टा चीन देशा, मला छळतो...
म्हणूनच हा चिनी गुलाब, संध्यासमयी कोमेजून जातो!!
निशिगंधापरी रूप माझे, परि मी नाही मायदेशाकडे
घेताच सुगंध माझा, होताल तुम्ही वेडे
जरी तुम्हा झाली मनीषा, घेण्यास माझी भेट
करोनि आकाशभ्रमण, यावे लागेल अमेरिका थेट!!
कतरा कतरा पाने माझी,हिरवा गर्द रंग
फुले सवे भडक केशरी , पाहता होशी दंग !!
छायाचित्रण : सीमा ढाणके
चारोळ्या : पुष्पा ढाणके
No comments:
Post a Comment