ह्या वर्षी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये
डॅफोडिल्स आणि ट्युलिप्स लावायचेच असे फार मनात होते. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये
त्यांचे कंद ऑर्डर केले. त्या बॉक्समध्ये ३-४ प्रकारचे डॅफोडिल्स आणि काही
प्रकारचे ट्युलिप्स असे भरपूर मिक्स कंद होते. आज लावू, उद्या लावू, ह्या शनिवारी काय तर
वेळच नाही, ह्या वीकेंडला काय तर बाहेर थंडी आणि वारा... जाऊ
दे, एखाद्या गार्डनरला बोलावून त्याच्याकडून लावून घेऊ.
अश्या नुसत्या विचारांमध्ये नोव्हेंबर निघून चालला होता. नेटवर थोडीफार जी माहिती
गोळा केली होती त्यानुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला तरी हे कंद
जमिनीत लावले पाहिजे असतात. मग मनाचा हिय्या केला आणि स्वतःच हे काम करायचे ठरवले.
नुसती बागेची आवड आहे असे म्हणण्यापेक्षा आता ते दाखवायची वेळही आली होती. मग सलग
दोन शनिवार- रविवार कामाला लागले. जमीन जरा एकसारखी करून, खत
टाकून, कंद सॉर्ट करून कुठे काय काय लावायचे हे ठरवून
घराच्या मागच्या आणि पुढच्या अंगणात लावले. मार्च- एप्रिलमध्ये
डॅफो-ट्युलिप्स फुलणार ह्याचा खूप आनंद झाला होता, पण सोबत
थोडी धाकधूक होतीच. मी माझे काम केले होते. आता सगळे निसर्गाच्या हवाली होते.
थोडा फ्रॉस्ट आणि थोडा स्नो फॉल पडला तर
ही रोपे जोमाने वाढतील हे वाचले होते. त्याप्रमाणे हिवाळा ऋतूने त्याचे काम केले.
इथले थंड आणि पावसाळी हवामान पूरक होतेच. फेब्रुवारीमध्ये डॅफोडिल्सला कोंब फुटू
लागले आणि माझ्या मनात आनंदाचे भरते!! हळूहळू डॅफोडिल्सने डोके वर काढले. पाने
फुटली, कळीचे देठ वर येऊ लागले, रोपटे मजबूत
होऊ लागले. आणि बघता बघता तीन प्रकारचे सोनसळी डॅफोडिल्स फुलू लागले.
पूर्ण फेब्रुवारीमध्ये आमचे गार्डन फक्त गर्द हिरवी लॉन आणि पिवळे धमक डॅफो अशा दुहेरी रंगांनी सजले होते. फार विलोभनीय दृश्य होत ते.
रोजचे रुटिन सुरू होतेच, बाहेरच्या जगातही उलथापालथ होत होती, मन उदास होत होते, पण रोज सकाळ-संध्याकाळ डॅफोचे फुलणे आणि ट्युलिप्सच्या रोपट्यांची निरोगी वाढ होताना पहाणे हा फार सुखद आणि रम्य अनुभव होता.
मार्चच्या मध्यापासून एकेक ट्युलिप्स फुलू लागले. त्याचे सुंदर सुंदर रंग उमलू लागले. आम्ही रंगपंचमी जरी खेळत नसलो तरी निसर्ग रंगांची उधळण करत होता, त्याची रंगपंचमी चालू होती. हळूहळू गुलाबी, पिवळा, केशरी, आम्रखंडी, जांभळा, लाल असे एकाहून एक सुंदर रंगाचे ट्युलिप्स उमलू लागले.
मागचे आणि पुढचे गार्डन विविध रंगांनी भरून गेले. माझी सगळी मेहनत फळाला, नाही नाही फुलाला आली. ह्या फुलांकडे पाहिल्यावर बाहेरच्या जगातल्या विषाणूनिर्मित थैमानाचा थोडा काळ का होईना विसर पडत होता.
कंद लावणे, त्याची
निगा राखणे, त्यांना जोपासणे, गोंजारणे,
डोळ्यात आणि कॅमेऱ्यात त्यांना साठवणे ही सगळी प्रोसेस मी मनापासून
एंजॉय केली. एका छोट्याश्या करड्या दिसणार्या कंदामध्ये एक सुंदर फुलझाड उमलून
दुसर्यांना निर्मळ आनंद द्यायचे किती सामर्थ्य आहे, ताकद
आहे. नतमस्तक त्या निसर्गापुढे!
आमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या भाषेत
एखादा प्रोजेक्ट बग-फ्री आणि सक्सेसफुल डिलिव्हर करण्यात जो आनंद मिळतो ना तसा
माझा हा डॅफो-ट्युलिप्सचा प्रोजेक्ट फार फार आनंदात पार पडला.
साधारण एक-दीड महिन्याचा काय तो छोटासा
डॅफो-ट्युलिप्सचा मोसम, पण काय सुख देऊन गेला!
आता डॅफोची सगळी फुले गेली, ट्युलिप्सच्याही पाकळ्या गळत
आहेत, त्यांचा मोसम संपत आलाय, थोडे
वाईट वाटतेय; पण निसर्ग थोडीच नाराज करणार आहे?
मंजुषा कुलकर्णी
No comments:
Post a Comment