प्रवास नात्यांचा


कर्कलॅन्डला लेकीच्या घरामागेच मार्क ट्वेन नावाचे विस्तीर्ण पार्क आहे. जुलै-ऑगस्ट मध्ये आम्ही गेलो होतो. तो तिथला उन्हाळा. बाहेर फिरता येण्यासारखा ऋतू. हिरव्या रंगाच्या छटांनी नीटनेटकं अंथरलेले लॉन. फुलांचे अनेक प्रकार. उंचच उंच वृक्ष. सफरचंदानी लगडलेली झाडे, ब्लू बेरीज असे बरेचसे ... सायकलिंग जॉगिंग ट्रॅकछोट्यांसाठी अत्याधुनिक खेळणी इ.


सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही दोघेही त्या पार्कमध्ये फिरायला जात असू. रोज एखाद्या वेगळ्या गेटमधून बाहेर पडून कॉलोनीतले वेगवेगळे रस्ते बघत असू. त्या दिवशी आमची ४ वर्षाची नात अन्वयी बरोबर आली होती. निघताना तिच्या आईने त्रास देऊ नको, आजीचा हात सोडू नको इ. आईपणाच्या सूचना दिल्या होत्या. 

अन्वयीला बाग खूप आवडते. जाताना तिची अखंड बडबड चालू होती,तिथे गेल्यावर तिने घसरगुंडीझोपाळ्याचा जो ताबा घेतला तो निघेपर्यंत. तिचा पाय निघतच नव्हता. कसंबसं आम्ही तिला तिच्या विश्वातून बाहेर काढले. बागेतून निघताना 'आपण आता दुसऱ्या गेटने जायचे का?' असं तिच्या आजोबांनी विचारताचतिने एकदम 'No no, this is the only way to go home.' म्हणून माझा हात घट्ट धरला. इतका घट्ट की मला तिच्या मनातली अनामिक भीती जाणवली.

मला म्हणाली, 'मॉमने सांगितलेय आजीचा हात घट्ट धर म्हणून. आजोबा तिकडे जातोय तर जाऊ दे. आपण याच (म्हणजे तिला माहित असलेल्या) गेटमधून जाऊ. माझा हात सोडू नकोस हं आज्जी'. मग आम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे गेलो. जाताना पुन्हा तसेच डॉगी, ससे फुलं पहात रमत गमत जात होतो. घर दिसायला लागले तशी आपण होऊन तिने हात सोडला आणि who wins the race म्हणून धूम ठोकली. तिला पहिलं घरात पोहचायचं असतं. ..हे नेहेमीचंच.

मी मात्र तिने घट्ट हात धरणं, तू हात सोडू नकोस म्हणणं, आणि घर दिसताच आपण होऊन हात सोडून घराच्या दिशेने पळणे हे पाहून माझ्याच विचारात हरवून गेले. मनात आले, तुझ्या आईनेही असाच हात धरला होता ... किती दिवस ... किती वर्षं ...मग तिलाही तिचे घर दिसले .... आणि अलगदपणे माझा हात सोडवून, एका नवीन साथीदाराच्या हातात हात घालून ती पुढे वाटचाल करतेय.
आम्ही एकेक करून घरात पोहचत होतो तसे एकेक विचार बाहेर येत होते. माणसाचेही असेच असते ना, त्यालाही कुणाची ना कुणाची सोबत हवी असते. मग ती नात्याची असेल किंवा मैत्रीची असेल. एक दृढ विश्वासाची सोबत असते ती. पशु-पक्षांचीही सोबतच होते. अनकंडिशनल लव्ह!
लहानपणापासून असे कितीतरी हात धरलेले असतात .... आईवडील किंवा पालकअसे मोठ्यांचे, मग समवयस्क नंतर पुढची पिढी! असा एका आयुष्याचा प्रवास.
प्रत्येक वेळी हात धरणं आणि योग्य वेळी सोडणं मात्र जमायला हवं. मानवी जीवनात असे पुष्कळ प्रवास आहेत. त्यांचे पंथ आहेत. पण इंद्रियापासून सुरु होणारा आणि ह्रदयस्थ आत्म्यापाशी संपणारा आतील प्रवास अधिक लांबचा आहे. 

उल्का कुलकर्णी




No comments:

Post a Comment