मित्रमंडळ बंगलोर गेली अनेक वर्षे आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे मराठी रसिकांच्या मनात रुजलेले आहे. दरवर्षी नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गणेशोत्सव, संक्रांत, वार्षिक सहल, ई-मासिक कट्टयाबरोबरच या वर्षी त्यांनी आबालवृद्धांसाठी आनंदमेळा घेतला. चित्रकला, पाककला, स्मरणशक्ती इत्यादी अनेक विषयांना स्पर्श करून सभासदांना आपल्यातील सुप्त गुण दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली.
किल्ला बनविण्याच्या स्पर्धेने अनेकांना आकर्षून घेतले. २-४ जणांच्या गटाने मिळून किल्ला बनवायचा होता. त्यासाठी माती व इतर सामान मित्रमंडळाने उपलब्ध करून दिले होते. सुशोभित करण्याचे सामान मात्र प्रत्येक गटाने आपापले आणले. स्पर्धेत दहा गटांनी भाग घेतला. यात विशेष म्हणजे मुलांनी किल्ला रचनेचा अभ्यास केलेला जाणवला. गडावरचा किल्ला, टेकडीवरचा किल्ला, जमिनीवरचा किल्ला असे विविध प्रकार यात होते. त्याच्या दृष्टिकोनातून केलेले बांधकाम आणि सुशोभन, वाया गेलेल्या वस्तूंचा केलेला उपयोग हे सारेच लक्षणीय होते. विशेषत: पर्यावरण, झाडे, पाणीव्यवस्था या सर्वांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला विचार अतिशय कौतुकास्पद वाटला. अतिशय वेगळ्या अशा या स्पर्धेने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही खिळवून ठेवले एवढे खरे. मित्रमंडळातर्फे आयोजनाची जबाबदारी आनंद वैशंपायन यांनी उचलली होती. स्पर्धेचे परीक्षक सारंग गाडगीळ व चित्रा सप्रे हे होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक कैवल्य निबंधे याला, द्वित्तीय पारितोषिक चैतन्य देशपांडे याला तर तृतीय पारितोषिक गंधार गोखले व वैष्णवी नंदे यांना मिळाले.
बाजूलाच प्रत्यक्ष कुंभार त्याचे चाक व माती घेऊन आला होता आणि मुलांना छोटी छोटी मातीची भांडी व वस्तू करायला शिकवत होता. बालगोपाळ मातीमाखल्या हातांनी समोर बसून वेगवेगळ्या कलाकृती बनवत होते. आजच्या धकाधकीच्या काळात हे दृश्य फारच विलोभनीय वाटले. एरवी मातीत खेळून हात आणि कपडे खराब करू नकोस म्हणून रागावणारे आईवडील या वेळी कौतुकाने पहात असल्याने मुलांनाही विशेष मज़ा आली असणार.



यासोबतच लोकांच्या पोटपूजेची व्यवस्थासुद्धा पावभाजी, मिसळ, पाणीपुरी, केक असे स्टॉल लावून मित्रमंडळाने केली होती. प्रेक्षकांना आकर्षण म्हणून छोटीशी लॉटरीही होती.
अशा भरगच्च पण निवांत, आपापल्या सोयीने वेळ घालवत करता येत असणाऱ्या अॅक्टिव्हिटीजमुळे भेट देणाऱ्या सभासदांना जराही कंटाळवाणे न वाटता हसतखेळत सकाळ मजेत घालवता आली. यात नियोजना इतकाच भाग होता तो अतिशय सुंदर अशा कार्यक्रमांच्या जागेचा. डॉक्टर मगदूम, सौ. मगदूम यांनी मध्यवर्ती निसर्गरम्य ऐसपैस अशी जागा कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच मनाला, बुद्धीला चालना देणारे असे कार्यक्रम करायला मंडळाच्या कार्यकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
मीरा धाराशिवकर
प्रतिसाद -
नमस्कार,
मी नुकताच मित्रमंडळ बंगळुरूचा सदस्य बनलो आहे. बंगळुरूमध्ये आल्यावर मला
इथे एक खूप चांगला मराठी लोकांचा समूह (ग्रुप) मिळाल्यामुळे खूप बरं वाटत आहे. मी नुकताच
"आनंद मेळावा" कार्यक्रमात अत्यंत आवर्जून उपस्थित होतो. महत्त्वाचे म्हणजे नुसता उपस्थित नव्हतो, तर त्यात उत्साहाने भाग घेतला. मी आणि माझ्या
कुटुंबातील प्रत्येकाने "टुमदार किल्ला" या स्पर्धेत भाग घेतला.
खरं म्हणजे खूप वर्षांनी आम्ही सर्वांनी किल्ला बनवला. माझ्या दोन्ही मुलांनी आणि पत्नीने मातीचा पुरेपूर आनंद लुटला. माझे आईवडीलसुद्धा या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनासुद्धा
खूप मज्जा आली. माझे बाबा खूप उत्तम चित्रकार असल्याने त्यांनी सुद्धा T-shirt वर दोन्ही मुलांच्यासाठी
छान चित्रं काढली. त्यामुळे मुलांनासुद्धा एक छान भेट मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन एकदम उत्तम केले होते
आणि मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते एकदम उत्साही आणि खूप छान मनमिळाऊ आहेत. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की या पुढे मित्रमंडळाच्या सर्व कार्यक्रमांना
आवर्जून जायचे आणि शक्य तेवढे तुम्हा सर्वांबरोबर काम करायचे.
धन्यवाद !
मित्रमंडळाचा सदस्य,
पराग सतीश कर्वे
No comments:
Post a Comment