आज सकाळपासून खूपच शांत वाटत आहे. का कुणास ठाऊक?
पक्षांचा किलबिलाट, खारूताईचे कीणकीणही जास्त ऐकू येत नाहीये. मलाच भास होतोय का
काय?
माझ्या मुली लहान असतानाचे दिवस आठवले. त्यांच्या बरोबरीचे त्यांचे
मित्र होते. तेंव्हा गोंधळ घालायचे सगळे. त्यांच्या आरडा ओरडी,
मारामाऱ्या सगळ्या आठवतात. त्या लहान असतांना आमचं घर म्हणजे
कॉलनीतल्या मुला मुलींचा खेळण्याचा अड्डा होता. आम्ही दोघेही नोकरीनिमित्ताने बाहेर
जाणारी – त्यामुळे मुलांना रान मोकळं. त्यातून, घरात पसारा केला म्हणून मी कधीच ओरडले नाही – त्यामुळे मुले
बिनधास्त खेळत. मला आठवतं – एकदा माझ्या धाकट्या मुलीचं शेजारच्या मैत्रिणीशी झालं
भांडण. ती पळत घरी येऊन तिच्या ताईला शोधायला लागली. मी म्हटलं –‘अगं,
काय झालं? मला सांग!’. तर म्हणते – ‘तू तर रागवत पण नाही. कृष्णाला मारायचय,
त्याला ताईच पाहिजे’. अशी मजा.
आम्ही रहायला आलो तेव्हा कॉलनी शहरापासून जरा लांबच होती. कॉलनीतले
रस्ते कच्चे. नाल्यांची व्यवस्था नाही. जरा उतारावर कॉलनी असल्याने; पाउस पडला की अगदी कमरेइतकं पाणी साचायचं. मग सगळी मुलं मुली
त्या पाण्यात खेळायचे. खेकडे पकडायचे. त्यांच्या नांग्यांना दोरे बांधून मुलींना भीती
दाखवायचे. काय काय प्रकार चालायचे. आता या सोफीस्टीकेटेड मुलांना पाहिलं की वाटतं,
हीच का ती पोरं! काळाचा महिमा – दुसरं काय?
गणेश उत्सव आणि होळी हे तर अगदी आवडीचे सण. धिंगाणा करायला माय-बापांकडून
लायसन्स मिळायचं. मग गोंधळ विचारूच नका. गणपती, सजावट, वर्गणी, त्यातले रुसवे फुगवे, सांस्कृतिक कार्यक्रम – धमाल यायची. होळीला तोच प्रकार. सकाळी
आठ वाजल्यापासून रंग खेळणं चालू ते दुपारी २ ते ३ पर्यंत. मुलं मोठी झाली तशी कॉलनि
बाहेरच्या मुलांना यायला बंदी होती. मुलांनीच आपणहून केलेला तो नियम होता. अनंत चतुर्दशीला
आणि होळीला खिचडी-भजे हा ठरलेला बेत असायचा आणि भजी तळण्याची जबाबदारी माझ्या पतींवर
होती. घरातच हा कार्यक्रम असायचा. आम्ही बायका खिचडी कढी करायचो तर हे आणि पोरं भजी.
पैजा लावून पोरं भजी खायची.
हळू हळू मुलं मोठी झाली. शिक्षणासाठी बाहेर पडली. मुली लग्न
करून बाहेर पडल्या. कॉलनी शांत होऊ लागली. आता मुलं बाहेरगावी नोकऱ्यांसाठी;
मुली सासरी, तर आई-बाप मुलांच्या भेटीसाठी सणाची वाट पहात – कॉलनीत. पूर्वीचं
चैतन्य,
उत्साह नाही. पण आहे त्या परिस्थितीत आनंदी रहायला आम्ही सिनियर
शिकलो. किमान आपलं एकटंपणाचं दु:ख जगाला न कळू देण्याइतपत शहाणी झालो.
मुलं लांब गेली तरी कॉलनीची नाळ अगदी तुटली नाहीये. आई वडिलांनी
बोलावलं तर रजा नाही, सुट्टी नाही, म्हणणारी पोरं – माझ्या धाकट्या मुलीचा अपघात झाला
तेव्हा मुंबई, पुणे,
हैदराबाद – कुठून कुठून धावत आली. सांत्वन करायचं म्हणजे काय
हे कळत नसताना निस्तब्ध आमच्या जवळ बसली होती.
मध्यंतरी आमच्या शेजारच्या भक्तीचं लग्न झालं. लग्नाच्या आदल्या
दिवशी आम्ही दोघे रात्री १०.३० / ११ च्या सुमारास भक्ती कडून यायला निघालो. जमलेल्या
चिमण्यांपैकी एक म्हणाली – “काकू झोपू नका. आम्ही येतोय गप्पा मारायला.” हे
झोपायला गेले पण मी TV लावून काही बघत बसले. रात्री बाराच्या सुमारास भला मोठा केक घेऊन सगळे आले.
मला कळेचना काय ते. त्यात भक्ती – नवरी मुलगी पण सामील. ती म्हणते – “काकू,
१२ वाजून गेले – काकांचा वाढदिवस सुरु झाला.” इथपर्यंत गोंधळ
ऐकून हेही बाहेर आले होते. घर परत मुलांच्या गोंधळाने गजबजून गेलं. मी काही करायला
आत वळले तर पोरं म्हणतात – “काकू, इतकी वर्षं काकांच्या हातची मिरची भजी खाल्ली. आज योगायोगाने
त्यांचा वाढदिवस साजरा करायची संधी मिळतेय तर का सोडा?”. माझे डोळे भरून आले. हे सुद्धा गहिवरून गेले. नेहाच्या अपघाताच्या
पार्श्वभूमीवर, ह्यांचा हा लक्षात ठेवून केलेला वाढदिवस काळजात घर करून गेला. घर परत जिवंत झालं.
आज या सगळ्या गोष्टी आठवायचं कारण म्हणजे,
मयूर – हा अजून एक शेजारी – त्याच्या बायकोला आणि तीन महिन्याच्या
मुलीला पहिल्यांदाच घरी घेऊन आला. औक्षण करायला आजीबरोबर आम्ही काही शेजारणीही होतो.
वहिनीनी घर सुरेख सजवलं होतं. चित्रासारखं. पण त्यात खरंच चित्राची स्तब्धता होती.
कुठे गडबड नाही. गोंधळ नाही. एकमेकांची टांगखिचाई नाही. शांततेत काम चालू होतं. मला
माझ्या मुलीचं लग्न, त्यातला आवाज आठवला; आणि मन विनाकारण उदास झालं. मनात आलं –
आता ही शांतता अपरिहार्य आहे. कॉलनीतील चैतन्य लांब गेलं. आणि म्हणतात ना - रम्य ते
बालपण – किती खरं आहे. मग ते आपलं असो की आपल्या मुलाचं!
No comments:
Post a Comment