नोव्हेंबर महिना उजाडला की प्रथम डोळ्यासमोर
आठ तारीख येते.आपल्या लाडक्या पु.ल.देशपांडे यांचा या दिवशी वाढदिवस आहे ही जाणीव
मनात जागी होते.त्यांना आपल्यातून जाऊनही आता वीस वर्षांचा काळ लोटला.नव्या पिढीला
ते साहजिकच कमी परिचित आहेत. पण आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली पिढीने पु.ल.
नावाचं गारुड चांगलंच अनुभवलेलं आहे. मराठी माणसाच्या भावजीवनाला समृद्ध आशय
देणारे जे मोजकेच कलावंत होऊन गेले त्यात पु.ल. हे नाव अग्रेसर आहे.
ते स्वतः आनंदयात्री होतेच. पण मराठी
माणसाला त्यांनी भरभरून कसं जगायचं ते शिकवलं. आनंदाने जगणं,
कलांचा
आस्वाद घेणं यात काही पाप नाही हे त्यांनी त्यागाचा महिमा गात अनेक प्रकारची सुखं
विनाकारण नाकारणाऱ्या मराठी समाजाला स्वतःच्या निर्मितीतून शिकवलं.
त्यांनी
नेहमी सुखावणारा विनोद केला. कोणाचे मर्म काढणे,
कोणाला
दुखावणे किंवा अश्लीलतेचा आधार घेऊन समाजाला हसविण्याचे काम त्यांनी कधीच केले
नाही. त्यांचा विनोद नेहमीच निर्मळ आणि नीतिमान होता. समस्त मानवजातीवरच त्यांचं
विलक्षण प्रेम होतं. पु.लं नी आपल्या एका मुलाखतीत सांगितलंय,
"जत्रेमध्ये आनंदाने हिंडणारी माणसे,
सभागृहात
खळखळून हसणारे प्रेक्षक, एकत्र
गाणारी शंभर पोरं, आनंदाने आपले चित्र
जमावाला दाखवणारा चित्रकार असा समाज मला पाहायला आवडतो. मला कोणत्याही माणसाला
कुठलेही लेबल लावून बाजूला टाकायला आवडत नाही"
खरंच सामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा पु
लं नी कधी कमी लेखलं नाही आणि अत्यंत गुणवान व्यक्तीचं मनभरून कौतुक करताना
त्यांनी कधी लेखणी आवरती घेतली नाही. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत ज्यांना
ज्यांना पुलंच्या लेखणीचा स्पर्श झाला तिथे आनंदच फुलला.
नाच रे मोरा आंब्याच्या वनात सारखं मोहक
बालगीत खास पुलं चा स्वरसाज घेऊन आलं आणि लहानपणीच अनेकांना आनंदात भिजवून गेलं.
पु. लं च्या नाटकातून तरुण वर्गाला जीवनाचे धडे मिळाले. सतत हाऊस फुल ची गर्दी
खेचणार्या त्यांच्या सबकुछ पुलं असणाऱ्या एकपात्री प्रयोगांनी भल्याभल्यांना
आश्चर्य चकित करून टाकलं.
पुलं नी काय गाजवलं नाही?
त्यांनी
चाळीस च्या वर पुस्तके लिहून साहित्य क्षेत्र गाजवलं. यातसुद्धा खूप विविधता
विनोदी लेख, नाटक,
व्यक्तिचित्र,
एकांकिका,
प्रवासवर्णने,
चरित्र,
विनोदी
कथा या शिवाय त्यांनी अनेक चित्रपटांचे पटकथा संवाद लिहिले. गीतांना संगीत दिले.
अभिनय केला.आकाशवाणी, दूरदर्शन देखील त्यांनी
गाजवलं. दिल्ली दूरदर्शनवर पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे पुलं च पाहिले मुलाखतकार.
तश्या पुलंनी घेतलेल्या अनेक मर्मभेदी मुलाखती गाजल्या. आपल्या देशात आणि
परदेशातही त्यांनी अनेक सभा संमेलने आपल्या अध्यक्षिय भाषणांनी गाजवली. अनेक
लेखकांना नवा उत्साह देणाऱ्या प्रस्तावना लिहिल्या. आणीबाणीच्या काळात घणाघाती
भाषणं करून त्यांनी राजकारणही गाजवलं. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या
उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईतील एन सी पी ए (राष्ट्रीय संगीत नाट्य
केंद्रचे) तर पुलं १९८४ पासून
मानद संचालक होते.पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीसाठी त्यांनी फार
मोठे योगदान दिले.
समाजाबद्दलचे आपले प्रेम आणि कळकळ पुलंनी
समाजासाठी फार मोठ्या देणग्या देऊन व्यक्त केले. या दानामागची प्रेरणा पुलस्वामीनी
सुनीताबाईंची होती. समाजजीवनाच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कितीतरी
संस्थांना पुलं देशपांडे प्रतिष्ठान कडून देणग्या मिळाल्या. एक कोटी रुपयांचे दान
वेगवेगळ्या संस्थाना करणारे पुलं आणि सुनीताबाई यांनी समाजासमोर आगळा-वेगळा आदर्श
ठेवला.
खरंच जिथे-जिथे पुलंचा परीसस्पर्श झाला
तिथे-तिथे सोनं झालं. पुलं स्पर्शाने कितीतरी स्तरांवर अनेकांची आयुष्य उजळून
निघाली. दिग्गज कवी मंगेश पाडगावकर यांनी चारच ओळीत फार समर्थतेने वर्णन केलंय,
"पुलं
स्पर्श होताच दुःखे पळाली
नवा
सूर आनंद यात्रा मिळाली
निराशेतुनी
माणसे मुक्त झाली
जगू
लागली हास्यगंगेत न्हाली"
शर्मिला फाटक
No comments:
Post a Comment