दरवर्षी १२
जून आला की फेसबुक, व्हाट्सएप ह्या सामाजिक माध्यमांवर पुलंच्या स्मृतींची आनंदयात्रा
सुरू होते. ज्या दिवसाची सरकार दरबारी ‘पु.ल. देशपांडे ह्या लेखकाची पुण्यतिथी’ ह्या ३-४ शब्दांत उपचार म्हणून बोळवण करता आली असती, तो दिवस,
जगभरातले मराठी लोक आपल्या आठवणी एकमेकांना सांगण्यात घालवतात. या वर्षी तर पुलंच्या
जन्मशताब्दीचे वर्ष लोक आपणहून कार्यक्रम करून साजरे करीत आहेत. एक विशिष्ट भाषिक समाज
त्याच्या अनेक लेखकांपैकी एका लेखकाच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्वयंप्रेरणेने
एक दिवसच नव्हे तर आठवडाभर मनाने एकत्र येतो आणि त्या लेखकाला आदरांजली अर्पण करतो,
ही गोष्ट मराठी भाषा आणि पु.ल. सोडून अजून कुठल्या भाषेच्या आणि लेखकाच्या बाबतीत होत
असेल का, ते मला तरी ठाऊक नाही. जो मान आजपावेतो संत, महात्मे, समाजसुधारक, ह्यांनाही
क्वचितच मिळाला असेल, तो एका लेखकाला दोन दशके मिळतच रहावा, नव्हे त्यात वृद्धीच व्हावी,
अशी काय जादू असावी ह्या लेखकाच्या लेखणीत, हे चटकन उमजणे कठीण आहे. काय असावे बरे
हे गारुड?

प्रवास वर्णने

मैत्र पु.लं.चे
प्रवासवर्णने
झाली की मग पु.लं.ची आणि त्यांच्या लेखणीची वेगळी धाटणी शोधायची उत्सुकता लागते. कारण
हे प्रकरण विनोदाच्या पलीकडचे आहे ह्याची तोवर खात्री पटलेली असते. ओळखीचे वा केवळ
नाव ऐकलेले असे अनेक जण इथे पु.लं.च्या स्नेहसूत्रातून इथे भेटतात आणि आपलेही स्नेही
होतात. मनस्वी आपुलकी आणि ह्या साऱ्यांच्या गुणांविषयी असलेले प्रेम यातून एक वेगळीच
शब्दपूजा, लौकिक अर्थाने एका नास्तिक म्हणवणाऱ्या व्यक्तीने इथे मांडलेली असते. ‘निर्मळ
मन’ हा ह्या पूजेचा स्थायीभाव. तोच भाव त्यांच्या लेखनातूनही
स्वाभाविकरित्या प्रकट होतो. शब्दचातुर्याची (आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अहंकाराची)
पुटे चढवलेले लेखक इथून कोसो दूर असतात. निर्मळ मनातून आलेली पु.लं.ची निर्मळ दृष्टी
त्यांच्या लिखाणालाही निर्मळ बनवते. दिव्यत्व दिसले की तिथे कर जोडणाऱ्या पु.लं.च्या
पुढे मग त्यांचा व्यक्तिगत दृष्टिकोन आडवा येत नाही. त्यामुळेच समाजवाद जवळचा वाटणाऱ्या
पु.लं.ना सावरकर हिंदुत्ववादी नेते म्हणून न दिसता एक स्वातंत्र्यवीर म्हणून दिसतात
आणि त्यांचे आख्यान ते कीर्तनकारासारखे मांडतात. अहंकाराचा आणि खऊटपणाचा वारा न लागू
देता पु.ल. त्यांच्या वैचारिक विरोधकांचीही मोकळेपणाने स्तुती करतात आणि आपल्यालाच
सवयीने कानकोंडे झाल्यासारखे वाटते. पण हा स्थायीभाव आपणही आपल्या मनात जिरवायचा प्रयत्न
केला की आनंदाच्या रस्त्यावर आपण पहिले पाऊल पु.लं.च्या साक्षीने टाकतो.

पु.लं.च्या
व्यक्तिगत आयुष्याची सुरुवात एक शालेय शिक्षक म्हणून जरी झाली असली तरी पुढचे आयुष्य
जगण्याचे सूत्र पु.लं.नी त्याआधीच ठरवून ठेवले असावे. 'आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा'
इतके साधे दिसणारे पण योग्यांनाही आचरायला महाकठीण असे हे सूत्र. आनंदी राहायचे ठरवले
की मग नकारात्मक विचार, अहंकार, काम-क्रोध-मद-मत्सरादि षड्रिपू यांच्याशी काडीमोड घेतल्याशिवाय
गत्यंतर नाही. एकदा हे जमले की मग सुरू होते ती एक आनंदयात्रा. किती अनेक प्रकारे आपण
आनंद घेऊ आणि देऊ शकतो ते ध्यानात आले की जीवनातील प्रत्येक क्षण त्या आनंदाचेच लेणे
लेऊन येत असतो. एकट्याने तो आनंद भोगण्यापेक्षा अजून चार लोकांमध्ये तो वाटून देऊ या,
असे म्हणत तो आनंदयात्री आपल्यासारखेच आजूबाजूला गोळा करत असतो, नव्हे गोळा झालेल्या
गोतावळ्याला आपल्या आनंदाच्या ठेव्यात मुक्तपणे सहभागी करून घेत असतो.
असा एक मुक्तिभोगी माणूस आणि कलावंत म्हणजे पु.ल.. अशी आनंदाची मुक्ती मिळाली की अध्यात्माचा वेगळा अभ्यास करण्याची आणि जाडजूड ग्रंथ वाचण्याची गरज राहत नाही, कारण अध्यात्माचेही ध्येय 'सत-चित-आनंद' एवढेच असते. मग एकदा ते मिळाले की वेगळी धडपड करण्याची गरजच उरत नाही. हा आनंदयात्री कुठल्याही स्थळ-काळाच्या कोणत्याही बंधनात न अडकता एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा आनंद वाटत जातो. एखादी मोठी गोष्ट हातून घडली तरी त्याचा बडेजाव न मिरवता चिदंबर वृत्तीने हा आनंदाचा प्रवासी दुसऱ्या मुक्कामाला निघालेला असतो. पु.लं.चे आयुष्य हे असेच एका आनंदयात्रीचे आयुष्य आहे. हा आनंदयात्री जाईल तिथे आनंद पसरवत असतो.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा: पु.लं.चे संचित (संपूर्ण लेख)

No comments:
Post a Comment