अजून कन्नड समजत नाही. इथल्या लोकांना हिंदीसुद्धा
येत नाही.
मोलकरणीला निरोप द्यायला ‘माध्यान्हे बरबेकू' एवढं सासूबाईंनी शिकवलंय.
MNC तला नवरा उशिरा घरी येतो.
इथे वीकेंडशिवाय घराबाहेर जायची पद्धत नाही. बाहेर गेलं तरी कानावर अनोळखी शब्द
येतात. परक्या प्रांतात असल्याची जाणीव होते.
महाराष्ट्रातून येणाऱ्या बहुतेक सगळ्यांची हीच अवस्था
होती. सुनांना तक्रारीला जास्त वाव होता. ज्या मुलांना नोकरी लागली होती, ते चांगल्या संधीच्या नादाने बायकोचा त्रागा सहन करायला
तयार होते. हळूहळू संसार सुरू झाला. 'येन बेकू’, ‘येष्टु?’
' ओंबत्तु वरे बनी' हे रुटीन झालं. मग मुलं,
नोकरी आणि घर ही कसरत चालू ठेवत
थोड्याफार हौशी पुरवून घेणं झालं. अधून मधून बर्थडे, लग्न, मुंजी
ह्या निमित्ताने होणाऱ्या भेटींत थोड्या आठवणी आणि थोड्या गप्पा असं
समाधान मिळायला लागलं.
मावशीच्या जागी अम्मा आल्या. रिक्षावाल्यांचं कन्नड
आणि आपलं हिंदी गरजेप्रमाणे समजायला लागलं. M.K. Retail मध्ये मराठी आवाज़ ऐकू यायला लागले. 'अगं तू इथे कशी?’
'मॅडम तुम्ही बंगलोरला शिफ्ट झालात का?' असे अचानक आलेले
प्रश्न आनंद द्यायला लागले. शनिवार - रविवार पुढच्या आठवड्याचे बेत करण्यामध्ये संपायला लागले.
मॉल संस्कृती वाढली. भेटी तुटक व्हायला
लागल्या. ‘मुलांना मराठी येत नाही’ हे आता आपणच कौतुकानी सांगायला लागलो. पुण्याच्या
चकरा हळूहळू कमी झाल्या. मुलांच्या परिक्षा, न मिळणारी सुट्टी ही कारणं वाढायला
लागली.
'आताच बेंगलोरला आलो' पासून 'आम्ही आता बेंगलोरचेच’ असंही झालं. पण या सगळ्या प्रवासात कशाची
तरी उणीव तीव्रतेने जाणवत होती. 'काहीतरी करायचं राहून जातंय' हे पार्श्वभूमीवर सतत डोक्यात चालू असायचं.
मुलं मोठी झाली - आपल्या ‘शाळा - अभ्यास -
क्लासेस - मित्रमैत्रिणीत’ रमली.
नवऱ्याचे नोकरीचे व्याप
वाढले. वेळ घेणाऱ्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि नोकरी
करुनसुद्धा ‘आपल्याला आणखी काहीतरी करायचं होतं'चं वेड पुन्हा
डोकं वर काढायला लागलं.
रॉबिन शर्मा, स्टीव्हन कोव्हे कोळून पिऊन झाले. पण
मुखवटा बदलला तरी ‘खूबसूरत’मधल्या रेखाला मिळालेला 'निर्मल आनंद' जवळपासही फिरकत नव्हता.
“मला लिहायला खूप आवडतं. पण इथे मराठी
वाचणार कोण ?”
“समाजकार्य करायला आवडतं पण बेंगलोरला भाषा आड येते.”
“शाळेत शिकवायला आवडलं असतं पण मला नं कन्नडा नीट येत नाही.” आळस करायला निमित्तं खूप होती आणि नाकर्तेपणाला पुष्टी द्यायला आजूबाजूचं वातावरणही पोषक होतं.
मग अचानक श्रुती पत्कींकडून East Bangalore मित्रमंडळाची
लिंक आली. सभासदांची संख्या हळूहळू वाढत गेली. स्वतःहून initiative घेवून मराठी मनांना एकत्र आणण्याचा ध्यास बाळगणारे सुधीर ब्रम्हा, यतीन सामंत ह्या दिग्गजांशी तोंडओळख झाली (खरे तर WhatsApp ओळख!). दैनंदिन व्याप आणि बेंगलोरचं वेळखाऊ traffic यामुळे आपण active
member नसलो तरी येणाऱ्या messages मध्ये
गप्पांचं, आपलेपणाचं नातं तयार होत गेलं.
'महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर ईस्ट’ हा खरोखरीच एक स्तुत्य
उपक्रम आहे. आपलं मराठीपण अजून जिवंत आहे याची तीव्रपणे जाणीव करून दिली ती ह्याच ग्रुपने. पावसाच्या सरींसारखंच
इथल्या messages नी शुष्क
झालेल्या मराठी मनांना भिजवून टाकलं.
Social media चे addict आपण सगळे आहोत हे खरं. पण धकाधकीच्या जीवनात याचा उपयोग घर, मित्र-मैत्रिणींना एकत्र आणतो आहे हे मान्य करावेच लागेल.
अनेक वर्षं कन्नड येत नाही म्हणून केलेल्या आळसाला ‘माणिकताई पटवर्धनां’सारखा शिस्तप्रिय, प्रेमळ आणि निरपेक्ष गुरू लाजवून
जातो. एका मदतीची साद आठ-दहा प्रतिसादांनी भरून जाते.
मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या छोट्या छोट्या अतृप्त
इच्छा पुन्हा स्वप्न बघायला लागतात. आणि मग click होतं - 'अरे
हीच तर उणीव होती' - आपले लोकं, आपली
भाषा, आपली चव, (आणि आता आपले चितळेसुद्धा!). आता कसं
परिपूर्ण वाटतंय...
तेवढ्यात रश्मी साठे 'मित्रमंडळ बेंगळूरु कट्टा’
forward करतात. आणि चारोळीकार चंद्रकांत गोखल्यांची मुलाखत वाचताना
एका वाक्याशी मी थबकते- 'व्यक्त होण्यात आनंद आहे.'
अचानक जाणीव होते - आता बालपण संपलं. जबाबदारी घेण्याची वेळ आलीय. २० वर्षांपुर्वी ज्या भावना आपल्या होत्या त्याच
किंवा तत्सम असणाऱ्या अनेकांची मनं आता आपल्याला सांभाळायची आहेत. त्यांच्यातलं मराठीपण जपायचंय आणि जोपासायचंय.
मग हातात वही पेन येतं;...पुन्हा नव्याने अंतर्मनाशी संवाद साधला जातो!
No comments:
Post a Comment