पुन्हा एकदा "चाळिशी"


तशी आमची कागदोपत्री अधिकृतरीत्या चाळिशी उलटून जवळजवळ चार वर्षे व्हायला आलीत. जेव्हा चाळिशी उलटली त्यावेळी असे काही झाले हे खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे, तसेच कार्यालयीन आयुष्यातील अति-व्यग्रतेच्या आणि जबाबदारीच्या कालखंडामुळे लक्षात आले नाही. तसे आमच्या शाळेच्या Whats App ग्रुपवर तेव्हा "चाळिशी म्हणजे नवी सुरुवात किंवा नवे तारुण्य" असे पटवणारे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. पण आपली चाळिशी आली हेच मुळात न समजल्यामुळे आम्ही त्या मेसेजेसकडे "दुसऱ्यांसाठी असावेत" असे समजून दुर्लक्ष केले. तोपर्यंत आमच्या वर्गमित्रांपैकी काही जणांचे केस जाण्याने बऱ्यापैकी वेग पकडला होता, पण कदाचित आमचे आडनाव "केसकर" असल्यामुळे आमच्या बाबतीत तसे काही घडले नसावे (PJ - माफी). अर्थात नाही म्हणायला एव्हाना डोक्यात पांढऱ्या केसांनी बस्तान बसवले होते, पण ह्याची सुरुवात बंगलोरला असताना आमच्या तिशीतच झाल्यामुळे त्याचे खापर बंगलोरच्या अति-क्लोरीनयुक्त पाण्यावर फोडून आम्ही ऑलरेडी मोकळे झाले होतो. 


त्यामुळे अधूनमधून डोक्याला मेंदी चोपडायची हा आधीचाच शिरस्ता असल्यामुळे त्यात अधिकृत चाळिशीने विशेष फरक पडला नाही. पण चाळिशीने काही फरक पडायला पाहिजे याची जाणीव आमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांनी प्रामाणिकपणे आम्हाला चार वर्षांपूर्वीच करून दिली. तसे पाहिले तर चष्मा हा गेल्या जवळजवळ तीस वर्षांपासून शरीराचा अविभाज्य भाग आहे.

दहावीत असताना आमच्या वर्गप्रमुख-वर्गभगिनी स्नेहश्रीने तयार करून फळ्याच्या बाजूला टांगलेले टाईमटेबल जेव्हा शेवटच्या बेंचवर काड्या करता करता बघितले आणि नीट वाचता आले नाही, तेव्हा आमच्या शेवटच्या दोन बाकांवरील सहापैकी तिघांना एका आठवड्याच्या आत चष्मे लागले. चौथ्याला (म्हणजे स्वरूपला) आधीच होता, दोघे सुटले. स्वरूपनेच "तुम्हाला असं कसं वाचता येत नाही" असं म्हणून आम्हाला डॉक्टरकडे जाण्यास (अंतस्थ आनंदाने) भाग पाडले होते. चष्मा लागला की आपण हुशार दिसतो, असा आमचा त्या वेळी (गैर)समज असल्यामुळे आम्हीही डॉक्टरकडे नाचत नाचत गेलो आणि नंबर काढून आलो. त्यानंतर दर वर्षी डोळे तपासण्याची सवय लागली. सुरुवातीला कुमार वयामुळे दूरचा नंबर वाढत गेला आणि एकविशीनंतर स्थिरावला. तरीही दर वर्षी तपासणी करण्याची सवय सुटली नाही. मग २-३ वर्षांतून ०.२५ ने कमी-जास्त (जास्तच) व्हायचा पण ते चालायचेच, म्हणून दुर्लक्ष केले. चार वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा जास्त न बोलणाऱ्या आमच्या कुलकर्णी डॉक्टरांनी डोळ्यांच्या तपासणीच्या वेळी, "अच्छा, चाळिशी आली वाटते" असे म्हणून पटकन एका खर्ड्यावरचे जवळचे वाचायला सांगितले. ते तेवढ्याच पटकन वाचून दाखवल्यावर त्यांना वाईट वाटले की काय असा भास झाला. त्यानंतर लागोपाठ चार वर्षे आमचे डॉक्टर "अजून कसा जवळचा नंबर निघत नाही", अश्या आविर्भावात हात धुवून मागे लागल्यासारखे प्रत्येक वेळी "हं वाचा" म्हणून तो खर्डा वाचायला द्यायचे आणि चारही वेळी डॉक्टरांना निराशा पत्करायला लागली, यातच आम्हाला आपला विजय झाल्यासारखे वाटायला लागले होते. 


या वेळी मात्र वार्षिक तपासणीला जायला काही महिने उशीर झाला, तेवढ्या वेळात आमचा ट्विटर अकाउंट निघाला आणि घात झाला. डॉक्टरांकडे जायच्या महिनाभर आधीच थोडा अंदाज आला होता की थोडी गडबड झालीये आणि वाचायला थोडा त्रास होतोय. त्यामुळे डॉक्टरांनी "काही त्रास होतोय का?" असा सवयीचा प्रश्न टाकला आणि मी जेव्हा "थोडं वाचायला त्रास होतोय." असे म्हटल्यावर "आता कसा सापडला भिडू!" असा भाव डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आला की काय असे वाटले. खर्डा वाचायला दिल्यावर अर्थातच शेवटची ओळ वाचता आली नाही. मग नेहमीची तपासणी, "हे चांगले की ते चांगले" वगैरे प्रकार झाला आणि शेवटी जवळचे वाचण्याचा चाळिशीचा नंबर निघाला. कुलकर्णी डॉक्टरांनी काढलाय म्हणजे बरोबरच असेल अशी खात्री होती, म्हणून तिथे काही बघितले नाही आणि विचारूनही काही फायदा नव्हता. (कारण माझ्या एका कार्यालयीन भगिनीने काही दिवसांपूर्वी जवळच्या नंबरचा चष्मा नाही घातला तर चालणार नाही का, असे त्याच कुलकर्णी डॉक्टरांना विचारले असता, "चालेल ना, नका घालू. मग काही महिन्यांनी वाचायला येणे पूर्णपणे बंद झाल्यावर ऑपरेशन करून टाकतो आणि जास्तीचे पैसे कमावतो." असे डॉक्टरांकडून उत्तर आले होते.) 
आता उत्तर माहित असताना प्रश्न विचारू नये हे मास्तर असल्यामुळे चांगलेच माहित आहे, त्यामुळे गपचूप बसलो आणि चुपचाप चष्मा तयार करणाऱ्या आमच्या नेहमीच्या ऑप्टिशियन मित्राकडे बायको-मुलीसोबत आलो. कारण बायको आणि मुलीचीही डोळ्यांची वार्षिक तपासणी डॉक्टर कुलकर्ण्यांकडून करवून घेतली होती आणि त्यांचाही वाढीव नंबर करून घ्यायचा होता.

हा वयाने माझ्याच एवढा, त्यामुळे आमचे अरे-तुरेचे बोलणे. माझा जवळचा नंबर निघाल्यावर त्यालाहीआनंदझाला (त्याचा जवळचा चाळिशीचा नंबर आधीच निघाला आहे.) पण त्याच्या आनंदाचे अजून एक महत्त्वाचे कारण होते. आता ब्रँडेड प्रोग्रेसिव्ह काच मला देऊन तो (माझ्याकडचे त्याच्या समजुतीप्रमाणे जास्तीचे असणारे) पैसे वसूल करणार होता, हे मला नंतर समजले. मग त्याने मला प्रोग्रेसिव्ह काच बायफोकलपेक्षा (महाग असूनही) कशी चांगली आहे, हेव्यवस्थितपटवले. मग जो टेक्निकल एक प्रश्न मी डॉक्टर कुलकर्ण्यांना विचारायला पाहिजे होता, तो त्याला विचारला. त्यानेही डोळ्यांचा डॉक्टर असल्यासारखे डोळ्यांचे चित्र वगैरे काढून मला समजावून दिले.


 शेवटी प्रोग्रेसिव्ह काच मान्य झाली. माझ्याकडे राखीव (किंवा बदली) अजून दोन चष्मे होते. मग ऑप्टिशियन मित्राने "१ के उप्पर १ फ्री"ची ऑफर दुसऱ्या चष्म्यासोबत दिली. तिसऱ्याचे काय करू म्हटल्यावर "याच्या काड्यांना तुझ्या केसांची मेंदी लागली आहे, त्यामुळे कचऱ्याच्या डब्यात फेकून दे!" असे बिनदिक्कतपणे सगळ्यांसमोर उत्तर देऊन त्याने आमची उरली-सुरली इज्जतही कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिली. बायको आणि पोरीचे हसणे थांबेना. आता असते असे काही लोकांचे नशीब, सगळे जोरदार लोकंच भेटतात, त्याला कोण काय करणार, असो. (पण खरे सांगायचे तर चोपडं बोलणाऱ्यांपेक्षा असे डायरेक्ट बोलणारे लोक आवडतात, थोडा इगो बाजूला सारून एन्जॉय केले म्हणजे झाले, मग मजाच मजा.)

तर अश्या रीतीने आम्हाला दूरच्या चष्म्यासोबत आता जवळचा असा "प्रोग्रेसिव्ह" चष्मा लागला, (प्रोग्रेसिव्ह म्हणायला छान वाटते नाही? काहीतरी प्रगती झाल्यासारखी वाटते ;-) गम्मत जाऊ देत, पण या चष्म्यामुळे अधिकृतरित्याच नव्हे, तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा चाळिशी आल्याची नव्याने जाणीव झाली. आधी जेव्हा चाळिशीचे वय जाणवले होते ते बुद्धीला होते, चाळिशीवर एक लेखही लिहून झाला होता, काय करायला हवे ते बुद्धीने सांगितले होते, पण मन मानायला तयार नव्हते. नवीन चष्मा येऊनही आता दोन दिवस झालेत, थोडी "प्रोग्रेसिव्ह" असण्याचीही सवय होतेय.

मनात "चाळिशीचा" थोडा सल होता खरा, पण गोंदवलेकर महाराजांचे एक वाक्य आठवले आणि मन शांत झाले : "ज्या वयात जी गोष्ट व्हायला पाहिजे ती झाली म्हणजे सगळे चांगले सुरू आहे असे समजायचे आणि मनात श्रीराम जयराम जयजयराम म्हणायचे!"
  




रवींद्र केसकर




No comments:

Post a Comment