टीम निवांत - अंधत्वावर मात




खूप दिवसांनी चांगलं पुस्तक हातात आलं आणि मी ते एकाच बैठकीत वाचून संपवलं. संपल्यावर ते माझ्याच मनात पुन्हा सुरू झालं. कधी गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या होऊन ते मला हसवत होतं तर कधी अवेळी आकाश भरून यावं तसं अश्रूरूपाने डोळ्यातून ओघळत होतं. 

'टीम निवांत - अंधत्वावर मात' असं नावातही वेगळेपण असणारं हे पुस्तक म्हणजे जीवनचरित्र आहे त्या मीराताई बडवे यांचं! त्यांचा खरोखरनिवांत ते टीम निवांतचा प्रवास आहे.

संसारात स्थिरता आल्यावर सहजच पती आनंद यांच्या वाढदिवसानिमित्ताने देणगी देण्यासाठी त्या अंधशाळेत गेल्या. परत आल्यावरही मनानं त्या शाळेतच होत्या. मग त्यांनी त्या शाळेत शिकवायला जायचे ठरवले, जाऊ लागल्या. हळूहळू तिथल्याच झाल्या. तिथल्या मुलांशी सर्वार्थाने एकरूप झाल्या. मुलांनाही त्या आपल्याश्या वाटू लागल्या. काही कारणानं तेथून बाहेर पडल्या, पण मुलांच्या मनात मात्र त्या होत्याच.

शाळेच्या नियमाप्रमाणे अठरा वर्षांचा झाल्यामुळे सिद्धाला शाळेतून बाहेर पडून रस्त्यावर यावं लागलं. दोनतीन दिवस उपाशीतापाशी काढल्यानंतर कसाबसा तो मीराताईंकडे पोहोचला. कलती संध्याकाळ, दारात सर्वार्थानं गळून गेलेला सिद्धा! मीरा ताईंनी त्याला जवळ घेतलं, ठेवून घेतलं. आणिनिवांतचा दरवाजा बारा महिने तेरा काळ मुलांसाठी उघडा राहू लागला.

निवांतमधून आजपर्यंत तीन हजार अंध मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत, स्वावलंबी झाली आहेत आणि सन्मानानं स्वतःचं आयुष्य जगत आहेत. मीराताई आणि आनंद यांनी त्यांना शिकवून, प्रोत्साहन देऊन  तयार केलं आहे, वेगवेगळी क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली केली आहेत.  गेली पंधरा वर्षे त्यासाठीच अखंड परिश्रम घेताहेत.

आजनिवांत’ मध्ये दहा कम्प्युटर्सवर अंध मुले 'टेक व्हिजन' नावाची कंपनी चालवित आहेत. आनंद बडवे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही कंपनी नुसती चालवत नाहीत, तर नवीन येणाऱ्या मुलांनाही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देऊन तयार करतात.

चॉकलेट बनवणे हासुद्धा एक उद्योगनिवांत’ मध्ये चालतो. सुरुवातीला साधं रॅपर बांधणंसुद्धा ज्यांना कठीण वाटत होतं ती अंध मुलं आता मुंबईला एकटी जाऊन कच्चा माल खरेदी करतात, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स बनवतात आणि मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या ऑर्डर्स पुऱ्या करतात, वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावतात.

एवढ्यावरच थांबतील त्या मीराताई कसल्या! त्यांना मुलांना नुसते सुशिक्षितच करायचे नव्हते तर चांगला माणूसही बनवायचे होते. त्यांनी या मुलांमधील सुप्त गुणही हेरले. विजय साळुंके या कवीला प्रोत्साहन दिलं. त्याच्या कविता निवांत ग्रीटिंग कार्डसवर छापल्या, ग्रिटिंग कार्डसचं डिझाइनसुद्धा मुलांचंच!

फूल मी काट्यातले
मज वेदनेची खंत नाही
गंध माझा अडविणारी
एकही भिंत नाही

'निवांत'च्या कार्डावर या कवितेला मानाचं स्थान मिळालं. जगभरात अनेक भाषांत त्याच्या कविता भाषांतरित झाल्या. इथे फक्त झलक दाखवली आहे. बाकी पालवी, सूर्य, मौन, घर, पाऊस अशा अनेक कविता प्रेमात पडाव्या अशा.  विजय साळुंखेच्या कवितांवर उत्तम मर्गजने चित्रे काढली. दोघेही अंध. आतला मजकूर ब्रेलमध्ये. अशी अनेक ब्रेल कार्डस निघाली. विकली जाऊ लागली.

रोज शंभर ते दीडशे विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यासाठी प्रवेश फ़ी नाही, शिक्षण फी नाही. निवांत नावाचं एक घर असतं त्यांच्यासाठी. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे सगळे विषय शिकवले जातात पण या सोबतच अगदी डान्स, क्राफ्ट, चित्रकला, चॉकलेट मेकिंग सगळे विषय शिकवले जातात. मुलांच्या गरजेनुसार ब्रेल, लायब्ररी, रायटर्स क्लब असे क्लब्स निर्माण झाले आहेत.

अंध मुलांचे शरीर, मानसशास्त्र यांचा बारकाईने केलेला अभ्यास, वरील सर्व गोष्टींसाठी केलेले कष्ट, ध्यास सारंच अचंबित करणारं.  एम्ब्रेयरने ब्रेल प्रिंटिंग सुलभ झालं. मुलं त्यांचे पेपर लिहू लागली. ही तर क्रांतीच.  मुली तर सैपाकापासून सर्व गोष्टी शिकल्या. 
अंध असूनही मुलांना जगाचा अनुभव मिळावा म्हणून बागेत हिंडवलं, किल्ले दाखवले, विमानतळ दाखवलं.

या सगळ्याच्या पडद्यामागील कलाकार आहेत त्यांचे पती आनंद आणि कन्या उमा. दोघंही झोकून देऊन काम करणारे. काम कुठलंही आणि कसलंही असो, मीराताईंच्या मागे ठामपणे उभे राहणारे संयमित, शांत, लोभस व्यक्तिमत्त्वाचे! निवांत’ मधील त्यांचे योगदान फार मोलाचे आहे.

स्वातंत्रवीर सावरकर पुरस्कार २००८, बाया कर्वे पुरस्कार २०१२, राजमाता जिजाऊ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मीराताईंची खरी ओळखमीरामाय!त्यांच्याच भाषेत लिहायचं तर

कुणी पेरली बीजे अन् कुणी पेरली माणसे।
मी पेरली लेकरे, अन् संस्कृतीचे अंगण सजले॥

मीरा धाराशिवकर


No comments:

Post a Comment