रामकालीन शासन व्यवस्था

चित्र -सीमा ढाणके 
मार्च महिना सुरु झाला की वेध लागतात ते गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचे. गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजे चैत्री नवरात्र किंवा रामाचे नवरात्र. गुढीपाडव्याला घराघरावर गुढ्या उभारून, घरात गोडधोड करून विजयोत्सव साजरा केला जातो. पुढे नऊ दिवस अनेक घरांतून रामायणाचे पाठ केले जातात. काही जण 'श्रीराम जयराम जयराम'चा जप करतात. रामायण हा आपला प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे. आपली सर्वांचीच त्यावर श्रध्दा आहे. वाल्मिकी ऋषींच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले वाल्मिकी रामायण म्हणजे सर्वच अर्थानी एक आदर्श ग्रंथ आहे. म्हणूनच आपण सर्वजण त्याची पूजा करतो.

 


आपल्याकडे असे म्हणतात की घरात रामायण ठेवले तर घरात सुख,शांती नांदते. मला नेहमीच एक प्रश्न पडतो की आज आमच्या देशात रामायणाच्या कितीतरी प्रती असतील अन तरीही आमच्या देशात रामायणातील नायकावरूनच 'महाभारत' घडते. थोडा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की आपणा सर्वांना रामायण परिचित आहे. त्यातील राम, सीता, हनुमान, लक्ष्मण या सगळ्यांनाच आपण आपले वेगवेगळ्या कारणांकरता आदर्श मानतो. पण आदर्श मानण्यापेक्षा आपण त्यांना परमेश्वर मानतो. रामायणाचे पाठ केल्याने किंवा राम नामाचा जप केल्याने आपल्याला यश, कीर्ती, संपत्ती मिळेल अशी आपली श्रद्धा आहे. पण नुसती फुले वाहून किंवा पूजा करून आपण रामायण शिकू शकत नाही, आत्मसात करू शकत नाही. रामायण हे एक असे रसायन आहे की ते आजही वाळवंटात नंदनवन फुलवू शकेल. पण त्याकरता त्यातील प्रत्येक पानाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. त्यातील तत्त्वे आणि मूल्ये समजून घेतली पाहिजेत. त्यातील प्रत्येक पानावर कौटुंबिक शांती आणि समृद्ध समाजाचे रहस्य सांगितलेले आहे. अनेक जटील समस्यांची उकल आहे पण त्याकरता या ग्रंथाचा अभ्यास आवश्यक आहे. पूजा नाही.

 

आज रामाला न मानणारे नास्तिक ही रामराज्याची अपेक्षा करतात. पण अपेक्षा करताना आपण आपली कर्तव्ये मात्र हेतुपुरस्सर विसरतो. रामराज्य अतिशय प्रभावी होते. युगानुयुगे त्याचा आदर्श राज्यकर्त्यांनी डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार केल्यास आपला देश लवकरच समृध्द आणि संपन्न देश होईल.

 

रामायणातील प्रत्येक पात्र कर्तव्यनिष्ठेने आणि स्वयंप्रेरणेने कार्य करत होते. त्यातील प्रत्येक गोष्टच अलौकिक होती. वाल्मिकींची आत्मनिष्ठ, वसिष्ठांचे अविरत श्रम, भरताचे अमर्याद भ्रातृप्रेम व निर्लोभी वृत्ती, हनुमानाची अनुपम निस्सीम भक्ती, बिभीषणाची असाधारण धर्मनिष्ठा, सुग्रीवाची अलौकिक मैत्री, लक्ष्मणाचा समर्पित भाव तर सीतेची पतीनिष्ठा या सर्व गोष्टींनी आदर्शांचे उच्चतम शिखर गाठलेले होते. असे रामराज्य हवे म्हणताना आम्हाला मात्र दांभिकता आणि पराकोटीचा स्वार्थ सुटलेला नाही. रामराज्याची अपेक्षा करताना आम्ही लक्ष्मण किंवा हनुमान व्हायला तयार नाही.

 

रामायण हे काही एका रात्रीत तयार झाले नाही. राम जन्माला आला आणि रामराज्य अवतरले असे काही झालेले नाही. अर्ध संस्कृत वानर साम्राज्याच्या मदतीने राक्षसी शक्तींचा पराभव करून धर्माचे राज्य स्थापण्याकरता राजा दशरथाच्या आधीच्या चार चार पिढ्यांची अविरत जागृती आणि परिश्रम त्या मागे आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. जेंव्हा आजपासून आपण सुरवात करू तेंव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये रामराज्य अवतरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आज आपल्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव, नैतिक मूल्ये इतकी रसातळाला गेली आहेत, की जे रामराज्य अवतरायला चार पिढ्या जाव्या लागल्या त्याकरिता आपल्याला आपल्या दहा पिढ्या खर्ची घालाव्या लागतील. रामकालीन समाजव्यवस्था, शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, कुटुंब व्यवस्था अशा अनेक अंगांवर ओझरती नजर टाकली तर आपल्याला त्यांचा उत्कृष्ट दर्जा व मूल्य सहज लक्षात येतील.

 

मूल्यांची जबाबदारी -------

 

माणूस जमावाने रहातो आणि जितक्या वृत्ती तितक्या प्रवृत्ती. म्हणून समाज बांधणी साठी अशा प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. मानवी प्रवृत्तींचे नियंत्रण करण्यासाठी काही विशिष्ठ व्यक्तींची निवड केली जाते. याचेच नाव शासन व्यवस्था. पण आज समाजात असाही एक प्रवाह आहे की ज्यांचा या शासन व्यवस्थेवर विश्वास नाही. त्यांना स्वयंशासित समाजाची अपेक्षा आहे. पण समाजातील प्रत्येक व्यक्ती आपली नैतिक जबाबदारी ओळखून आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व जाणून वर्तन करील तरच हे शक्य आहे. समाजात त्याग, सहिष्णुता आणि बौद्धिक विकास यांची जरुरी आहे. बौद्धिक विकास झाला तरच नैतिक मूल्यांचे महत्त्व वाढेल आणि मग आपोआपच आपल्या आचार विचारांत फरक पडेल. सत्य युगात अशा तऱ्हेने समाज विकसित झालेला होता.

 

पण आज आपणाला नैतिक मूल्ये सहजासहजी पायदळी तुडवायला काहीच वाटत नाही. आम्ही स्वतःशिवाय दुसऱ्याचा विचार सुद्धा करत नाही. मग आपल्याला रामराज्याची अपेक्षा करण्याचा काय हक्क आहे? युवराज पदावर रामाची नेमणूक करण्याआधी राजा दशरथाने राज्यातील विद्वान लोकांना बोलावून त्यांचे मत विचारात घेतले होते. (पण आज आपल्याकडे अशिक्षित, सामाजिक बांधिलकीची अजिबात जाणीव नसणारे लोक निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे रहातात आणि निवडून सुद्धा येतात.) त्या काळी राज्याची घटना सुध्दा अलिखित होती. अहो घटना काय लिहायची असते? आपल्याच घरात कसे रहायचे याचे काय कधी लिखित नियम असतात का? राज्याचा अधिकारी होण्यासाठी उत्कृष्ट चारित्र्य ही पहिली पात्रता होती आणि आज. ?

 

राम राज्यात फक्त राज्याचे अधिकारीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांच्या चारित्र्यासंबंधी शंका सुध्दा घेतलेली चालत नसे. आणि म्हणूनच सामान्य नागरिक असलेल्या अशा धोब्याच्या शंकेवरुन रामाने सीतेचा त्याग केला होता. शासन व्यवस्थेत चुकीला क्षमा नव्हती किंवा कायद्याची पळवाट सुध्दा नव्हती. मग ती चूक कोणी केली याला महत्त्व नव्हते. आणि म्हणूनच लक्षमणाच्या एका छोट्याशा चुकीकरता रामाने स्वतःच्या छोट्या भावाला देहदंडाची सजा सुनावली.

 

सीतेचा त्याग करताना किंवा लक्ष्मणाला देहदंडाची सजा देताना रामाच्या मनाला काहीच का यातना झाल्या नसतील? खरे तर लक्ष्मण हा अतिशय उदात्त, चारित्र्यसंपन्न महापुरुष होता. लक्ष्मणाने राज गादीवर अनेक उपकार केले होते. सर्वांनाच त्या भव्य दिव्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची गरज होती. प्रभू रामचंद्रांचे अस्तित्वच लक्ष्मणामुळे होते. हे सुध्दा सर्व जण जाणून होते आणि म्हणूनच राज्यातले लोक व अमात्य मंडळाची इच्छा होती की लक्ष्मणाला देहदंडाची शिक्षा होऊ नये, परंतु वसिष्ठांनी सांगितले की राज गादीच्या प्रतिमेसाठी लक्ष्मणाला शिक्षा झाली पाहिजे. आणि रामाने कुठलीही पळवाट न काढता ते मान्य केले. कारण त्या काळी वैयक्तिक संबंधापेक्षा सामाजिक स्वास्थ्य अधिक महत्वाचे होते.

 

रामकालीन शासन व्यवस्थेत अमात्य मंडळ प्रजेचे नियमन करीत असे. त्यावर राजसत्ता होती आणि त्याही वर अष्टऋषीमंडळ होते आणि त्यावर शाश्वत नैतिक मूल्ये होती. म्हणजेच अप्रत्यक्षपणे ही नैतिक मूल्येच राज्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवीत असत. त्या काळात प्रत्येक व्यक्ती राजा होती म्हणूनच रामराज्य अलौकिक होते.

 

आज पाश्चात्य तत्वज्ञ राजनितीज्ञसुध्दा रामायणावर संशोधन करीत आहेत. त्याचे महत्त्व समजून घेत आहेत. पण आपण मात्र रामायणाची काय अवस्था केली आहे ? ते मूळचे आपले असून सुध्दा त्याचे मूल्य आपण ओळखलेले नाही. आपण फक्त 'श्रुतं हरति पापानि' असे समजूनच पाने उलटत असतो.

 

म्हणून असे म्हणावेसे वाटते की रामराज्यासारखी शासन व्यवस्था झाली नाही आणि पुढे होईल की नाही याची पण शाश्वती नाही. आपण फक्त ह्या आदर्श व्यवस्थेच्या जवळपास जाण्याचा सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. एवढे ध्येय मनात ठेवले तरीही आपली व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून प्रगतीच होत राहील. 

 

वैजयंती डांगे 




No comments:

Post a Comment