श्रीमती पुष्पाताई द्रविड एक विनम्र, प्रेरणादायी,
कर्तुत्ववान, आदर्श व्यक्तिमत्व. मित्रमंडळ
बंगलोरच्या आधारस्तंभ. त्यांचीच मुलाखत मित्रमंडळ बंगलोरने घेण्याचे ठरवले.
८ नोव्हेंबर २०२० ला, म्हणजेच महाराष्ट्राचे
लाडके व्यक्तित्व पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी, श्रीमती
शर्मिला फाटक यांनी पुष्पाताईंची मुलाखत घेतली आणि ती ऐकून पुष्पाताइंविषयीचा आदर
आणखीनच वाढला. योगायोग असा की बेंगलोर महाराष्ट्र मंडळाच्या हॉलमध्ये लावलेल्या,
पुष्पाताईंनी केलेल्या बालगंधर्वांच्या चित्राचे उदघाटन पुलंनीच
केले होते व ते चित्र जिवंत आणि बोलके आहे व रंग संगती फार सुंदर आहे असे उद्गार
काढले होते. या चित्रापासून पुष्पाताईंचा बेंगलोर मधील कलाप्रवास सुरू झाला आणि तो
या वयातही सुरूच आहे.
त्यांच्या आयुष्याच्या कला प्रवासाची सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षी
रांगोळी काढण्यापासून झाली. कला महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी चपलांच्या
ढीगाचे चित्र काढून त्यांनी तारीफ मिळवली. एल.एस.राजपूत आणि सक्सेना सर यांच्या
मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळाला. डिझाईनिंगचा डिप्लोमा आणि कॉलेजची एम.ए.ची
डिग्री या दोन्हीचे अध्ययन त्यांनी बरोबरीने केले. दोन्ही एकदम करणे खूपच अवघड काम
होते. पण मनाची जिद्द, आवड त्यासाठी करायला
लागणारे कष्ट घेण्याची तयारी, आणि हातातील कला यामुळे ते
शक्य झाले. यासाठी अनेक वर्ष रोज सकाळी 7 ते रात्री 8
अशा त्या कॉलेजला जात होत्या. एम.ए. करत असतानाच त्या महाविद्यालयात
शिकवत पण होत्या. त्या महाविद्यालयात फाईन आर्टसची स्वतंत्र शाखा सुरू करण्यातही
त्यांचा सहभाग होता. फाइन आर्टस घेऊन एम.ए. करणाऱ्या त्या कॉलेजच्या पहिल्या
विद्यार्थिनी व ती परंपरा त्यांनी फाइन आर्टस मध्ये डॉक्टरेट मिळवताना पण कायम
राखली.
कर्नाटकातून फाईन आर्टस मध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला
ठरल्या. हे उत्तुंग यश त्यांनी निवृत्तीनंतर मिळविले हे विशेष. डॉक्टरेटच्या
प्रबंधासाठी त्यांना बेंगलोर चित्रकला परिषदेच्या श्रीमती चुडामणी यांचे
मार्गदर्शन लाभले. प्रबंधाचा विषय श्री निकोलस रोरिक यांची हिमालयातील चित्रे असा
होता. या डॉक्टरेट पदवीमुळे त्यांनी आपल्या आईची मुलीने डॉक्टर व्हावे ही इच्छा
देखील पूर्ण केली.
त्यांनी चित्रकलेचे अनेक प्रकार हाताळले जसे की मॉडर्न आर्ट, लँडस्केपस ,स्केचेस इत्यादी.
त्यासाठी अनेक माध्यमेही वापरली जसे की वॉटर कलर्स, जळलेले
प्लास्टिक, इंक इत्यादी. प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन
यांच्याबरोबर पण त्यांनी काम केले आहे. भारतभर अनेक आणि जगभरात लंडन अमेरिका
इत्यादी ठिकाणीही त्यांनी चित्रप्रदर्शने भरविली आहेत. या चित्रप्रवासादरम्यान
अनेक पारितोषिकेही पटकाविली आहेत. मुद्दाम उल्लेख करायचा तर हंगेरीच्या आर्ट व्हिलेज
मध्ये दहा दिवस राहण्याचे त्यांना निमंत्रण होते. तिथे जगभरातल्या अनेक नामवंत
कलाकारांसोबत त्या राहिल्या व तिथल्या स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले.
जहांगीर आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनामध्ये पत्रकारांनी त्यांच्या बोटांमध्ये
शिल्पकला असल्याचे नमूद केले आणि खरेच बेंगलोरच्या चिनास्वामी स्टेडियम मध्ये 4500 स्वेअर फुटाचे म्युरल बनवून त्यांनी ते सिद्ध केले.
त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. आणि बंगलोरचे क्रिकेट स्टेडियम मुलाने व आईने
गाजवायचा दुग्धशर्करा योग घडून आला. काळाच्या पडद्याआड गेलेल्या कर्नाटकातील क्रिकेट
खेळाडूंना त्यांनी या माध्यमातून जिवंत केले व कर्नाटकाच्या क्रिकेटचा भूतकाळ
वर्तमानकाळाशी जोडला. त्यांनी अनेक संस्थांसाठी अनेक प्रकारची व अनेक आकाराची
म्युरल्स बनविली. त्यासाठी संगमरवर, काच, वेगवेगळे धातू, टेराकोटा अशी अनेक माध्यमे वापरली.
स्वतःच्या घराच्या बाहेरच्या भिंतीवरही त्यांनी पंचमहाभूते, लक्ष्मी,
सरस्वती, गणेश इत्यादींचा समावेश असलेले
म्युरल बनविले आहे.
हा कलाप्रवास सुरू असताना त्या प्राध्यापक म्हणून नोकरीही करत होत्या. त्या
एक कलाकार आणि त्यांना शिकवायला लागले इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळे
त्यासाठीही त्यांना खूप मेहनत व अभ्यास करावा लागला. इंग्लिश बोलण्याचा पण सराव
करावा लागला. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे'
या म्हणीचे पुष्पाताई हे उत्तम उदाहरण आहेत.
हे सर्व करत असतानाच आपला संसार ही त्यांनी अत्यंत यशस्वीपणे सांभाळला. त्या
सुगरण पण आहेत. राहुल व विजय या दोन कर्तृत्ववान पुत्रांच्या त्या माता आहेत. आणि
मुलांच्या यशाचे श्रेय त्या मुलांनाच देतात. कुठेही त्या आपण होऊन मी राहुल
द्रविडची आई आहे असा उल्लेख करत नाहीत. पण स्वतःच्या यशासाठी मात्र आपले पती
कैलासवासी श्री. शरद द्रविड आणि पुत्र राहुल व विजय यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य
नव्हते असे म्हणून त्यांना अभिवादन करतात. या विनम्रपणातच त्यांचे मोठेपण जाणवते.
तसेच ईश्वराने शेवटपर्यंत असेच सुखी ठेवावे अशी प्रार्थना करतात. या वयातही
त्यांची आणखी चित्रप्रदर्शन भरविण्याची मनीषा आहे. अशा पुष्पाताई सुरुवातीलाच
म्हटल्याप्रमाणे सर्वांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहेत.
या त्यांच्या उज्ज्वल कला व आयुष्य प्रवासाची यथायोग्य ओळख श्रीमती शर्मिला
फाटक यांनी मुलाखत ओघवती ठेवून व पुष्पाताईंना बोलते करून आपल्याला करून दिली.
त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. या मुलाखती दरम्यान पुष्पाताईंची अनेक चित्रे व
म्युरल्स दाखविली गेली त्यामुळे डोळ्यांचे पण पारणे फिटले.
मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
रंगरेखा घेउनी मी
मनोरमा जोशी
No comments:
Post a Comment